आदल्याच दिवशी मावशीने माझ्या सासूबाईंच्या सांगण्या नुसार आपल्या मुलाचे नाव विवाह मंडळात घालायचे म्हणून शारदा बाईंना फोन केला होता. तेंव्हा मुलाची सगळी माहीती मिळवून तिने उद्या पैसे घेऊन नाव नोंदवायला या, माझ्या कडे १५-२० मुली आहेत ह्याला साजेश्या आणि १-२ उद्या दाखवते, संध्याकाळी ५ वाजता घरी या म्हणून फोन ठेवला होता.
ठक.. ठक.. आम्ही दारावरची कडी वाजवली. "कोण आलय आता तडमडायला? " आतून आवाज आला.
"आहो बाई आम्हाला तुम्ही फोन करून बोलावल होतत मुलगी बघायला, आम्ही आलो आहोत" मावशी म्हणाली.
आतून दार अर्धवट उघणून एक सावळी, मध्यम शरीराची, चष्मा घातलेली, बाई डोकावत होती.
"एवढेजण कशाला आलात? दोघींनीच आत या. मुलगी आत बसली आहे. घाबरून जाईल ती. बाकीच्यांनी खाली जाऊन थांबा. "
मावशी खुप रिक्वेस्ट करत होती, "अहो बाई ह्यांना ही बघायची आहे मुलगी. माझ्यापेक्षा जास्त ह्यांना चांगल निरखता येईल तिला आणि ह्या माझ्या अगदी भरवश्याच्या आहेत. ही माझी मुलगी, आणि ह्या दोन माझ्या सुना म्हणजे बहिणीच्या सुना". ह्यांना आजकालच्या मुलींना पारखता येईल माझ्यापेक्षा.
मावशीची रिक्वेस्ट तिने मानली आणि म्हणाली, थांबा जरा ५ मिनिटे बाहेर उभे राहा. घरात ६ पाहूणे आहेत, त्यांचा आधी निकाल लावते, मग तुम्हाला घेते आत" आणि त्या बाईने परत दरवाजा बंद केला. आम्ही काय बाई आहे ही? ह्या अर्थाने एकमेकांकडे बघून कुजबूज करू लागलो.
थोड्याच वेळात त्या बाईने दार उघडले आणि आम्हाला आत बोलावले. आणि हॉल मध्ये न बसवता थेट तिच्या बेडरुम मध्ये घेउन गेली. हॉल मध्ये एक जिन्स, टिशर्ट घातलेली मुलगी आणि एक म्हातारे गृहस्थ होते. दोघेही घरातल्यांच कपड्यात होते. म्हणजे ते पाहूणे नक्कीच नसणार. ही तिची मुलगी आणि नवरा असल्याचे आम्ही मनात पटवून घेतले. आम्ही संभ्रमात पडलो, दारातून तर कोणीच बाहेर नाही गेल मग पाहूणे गेले कुठे? बेडरूम मध्ये पण कोणीच नव्हते. किचन हॉलमधून बेडरुम मध्ये जाताना दिसले त्यात पण कोणीच नव्हते. गच्चीचा दरवाजा बंद होता. आतून कडीही लावलेली होती. खि़डकीतून गच्चीचा कठडाच दिसत होता. त्यामुळे ती गच्ची आहे हे ओळखता येत होत. ह्यांच्या ब्लॉक मध्ये भुयारी मार्ग वगैरे आहे की काय अस उगाचच माझ्या मनात शंका येऊ लागली. कारन ती बाई थोड्या वेळा पुर्वी म्हणाली होती की मुलगी आत बसली आहे. ती पण गायब होती.
बेडरुम मध्ये गेल्यावर त्या बाईने आम्हाला बसायला सांगितले आणि पाणी आणून दिले आणि सरळ म्हणाली. पाणी घ्या. चहा, सरबत मागितलत तरी मिळणार नाही कारण ते मला रोज एवढ्या माणसांना द्यायला परवडत नाही.
तेवढ्यात तिच्या घरातला फोन वाजला. " काकू -काकू काय करतेस कारटे? जरा धिर धर मी फोन करेन तुला १० मिनटांनी आणि तिने फोन धाडकन ठेवला.
हा, बोला आता, " ह्या कुठे राहतात? " तिने मावशीला विचारले. मावशीने सांगितले आमच्याच शेजारी राहतात. "तुमच्या नवऱ्यांची नाव काय आणि काय काम करतात? जावेने तिचा नवरा इंजिनियर असून पोर्ट मध्ये आहे सांगितले आणि मी माझ्या नवऱ्याचे नाव त्याच्या प्रोफेशन सकट सांगितल्यावर ती अगदी स्मित करत म्हणाली अग बाई, त्या वकिलाची बायको का तू? मला कधी पासून तुला बघायच होत. मी संभ्रमातच पडले. हिचा आणि माझा काय संबंध ५ वर्षा पुर्वीच माझ लग्न झालय. मी कुठल्या विवाह मंडळात पण नाव नव्हत घातल. आणि माझ नाव कुठल्या क्षेत्रात लौकीकात पण नाही. बर हिला मी पहिलाच पाहतेय आणि हिच्याबद्दल मी कधी ऐकल पण नव्हत, मग हिला मला कशाला पाहायच होत? मी आश्चर्याने विचारल का हो? मला ओळखता तुम्ही? कस काय? ती हसत म्हणाली असच ग. तुमच्या एरीयातली सगळी स्थळ माझ्याच कडे नोंद करून घ्यायला येतात. त्यांच्या बरोबर गप्पा मारता मारता निघतात विषय आणि तिने लगेच ती माझ्या जावेकडून बघून म्हणाली "ए, मला तुझ्या नवऱ्याला पण बघायचे आहे. आम्ही आवाकच झालो. आमचे चेहरे पाहून "असच ग. " म्हणाली. मी तुमच्या सगळ्या फॅमिलीला आता ओळखते, आता तुम्हाला बघितल, आता तुझा नवरा (जावेचा) बघायचा राहीला आहे. हिचा नवरा काय कधिही बघता येईल. नावाने मी ओळखते त्याला.
ती आमच्या सासुबाईंना आणि नणंदेला ओळखत होती हे आम्हाला माहीत होत, कारण आमच्या नणंदेच लग्न तिनेच जमवल होत. पण आमचा काहीच त्यात संबंध आला नव्हता. फक्त त्या दोघी नाव नोंदवायला गेल्या होत्या आणि नंतर फोनवरच त्यांचे संबंध आले होते.
मावशीने आता विषयाला हात घातला. "तुम्ही म्हणालात मुलगी आली आहे म्हणून. "
"आहो आली नाही अजून येणार आहे. तिचाच आत्ता हा फोन आला होता. पण म्हटल आधी तुम्हाला तिचा फोटो आणि माहीती द्यावी मग तिला बोलवावी, म्हणून तिला मी थांबवल आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडेल मी मघाशी घरात ६ पाहूणे आहेत म्हणून पण सांगितले, त्यांना मी गच्चीत कोंडून ठेवल आहे. " आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. आमचे चेहरे बघताच ती म्हणाली " अहो ते माझे ६ कुत्रे आहेत. ते नेहमी घरातच असतात. जेंव्हा तुमच्या सारखी माणस येतात तेंव्हा त्यांना मी गच्चीत बांधून ठेवते आणि एक जरा पण भुंकायचे नाही ही ताकीद देते. बिचारे ऐकतात सगळ माझ, बघा येतोय एकाचा तरी भुंकण्याचा आवाज? " खरच जराशी चुळबुळ पण ऐकायला येत नव्हती पण तिने सांगितल्यावर मात्र थोडा डेटॉल मिश्रीत कुत्र्यांचा वास घरात जाणवू लागला.
परत एक फोन आला, " कारट्या तुला सांगितल ना, संध्याकाळी ६ वाजता ये म्हणून, परत फोन केलास तर घरात नाही घेणार. बरोब्बर ६ ला ये. आत्ता माझ्या कडे दुसरी पार्टी आली आहे, मला वेळ नाही तुझ्याशी बोलायला". फोन परत खाडकन ठेवला.
"हं तर काय बोलत होतो आपण? हं पण मुलगा कुठे आहे तुमचा? लग्न तुम्हाला करायच आहे की मुलाला?
"तो बाहेर गेलाय आम्हाला सोडून, " न्यायला येईल परत.
"आहो मग जरा जाता जाता दाखवायचा ना काळा की गोरा, कुरूप की सुस्वरूप ते, म्हणजे मला मिळत्या जुळत्या मुली दाखवता येतात. "
मावशीने लगेच त्याचा फोटो पुढे केला. " तो लाजरा आहे हो, आणि माझ्या आज्ञेत असतो. तुच मुलगी बघ. तुला आवडली तर मला बोलव सांगून निघून गेला".
"ते सगळ ठिक आहे हो, पण लग्न त्याला करायचे आहे आणि फोटो काय हल्ली काळ्याचा गोरा फोटो सहज करून मिळतो. तो फोटो सारखाच आहे हे कशावरून? त्याला यायला पहिजे होत. ठिक आहे मी दाखवते तुम्हाला मुलीची माहीती आणि फोटो. "
बाईने लग्नाचे असतात तेवढे मोठे २ अल्बम कपाटातून काढले आणि त्यातला एक फोटो काढून आम्हाला दाखवला. "ह्या मुलीने तुमचे स्थळ पसंत केल आहे. ती तुम्हाला ओळखते, तिच आत्ता मी फोन केल्यावर येणार आहे. " फोटोच्या मागेच तिची माहिती लिहली होती. ही मुलगी आमच्याच परीसरातली आणि आम्हाला माहित असलेल्या तिच्या स्वभावामुळे आम्ही तिला स्पष्ट सांगितले की ह्या मुलीला बोलवू नका. तिने मावशीला नकाराचे कारण विचारले. का हो? चांगली तर आहे ही मुलगी, काय प्रॉब्लेम आहे? आणि तुमच्या अपेक्षा पण सांगा. मावशीने तिच्या मुलिला सांगायला सांगितले. ती म्हणाली "आमच्या आईला तिने निट सांभाळले पाहिजे आणि घरही निट सांभाळले पाहिजे. " हे ऐकताच ती जोरानेच ओरडली, " आहो घर आणि आई नंतर सांभाळेल, पहिला मुलाला नको का सांभाळायला, समजून घ्यायला? (माझ्याही मनात तेच आल होत तेंव्हा) तुम्ही मुलाला आणायला पाहिजे होते, म्हणजे त्याच्या आवडी निवडी, त्याच्या अपेक्षा मला समजल्या असत्या. "
"ठिक आहे मी तुमच्यावर कसलीच जबरदस्ती करत नाही तुम्हाला मी आता अजून मुलींचे फोटो दाखवते. त्यातली तुम्हाला कुठल्या आवडतात ते बघा. मी तुमचा त्यांच्याशी परीचय करून देईन. मी मागच्या वर्षी २५० लग्न जमवली. ह्यावर्षी २३० झाली आहेत. २ वर्षा पुर्वी ४०० लग्न मी जुळवली होती. त्यावर्षी मला शासनाकडून दुसऱ्या नंबरच बक्षिस मिळाल होत. आहो तुम्हाला वाटत तितक हे काम सोप्प नाही, खुप कटकटी आहेत ह्याच्यात. माझा नवरा कधी कधी वैतागून बाहेर जातो, बंद कर म्हणतो हे नसते धंदे. मुलगाही कंटाळतो, म्हणतो तुला काय हव ते मिळत ना सगळ, आम्ही देतो ना तुला पैसे? मग कशाला हे नसते खटाटोप करतेस? पण मी कोणाचं ऐकेन तर शप्पथ! सगळ्यांवर टिच्चून मी माझ्या बेडरुम मध्ये आता हे कार्य चालवते. म्हणून तुम्हाला थेट बेडरुम मध्ये घेऊन आले हॉल मध्ये न नेता. "
"आहो काहितरी उद्योग नको का मेंदूला? स्वस्थ बसले तर सडेल आणि घरातल्या माणसांची डोकी खाईन आत्ताच्या प्रमाणापेक्षा जास्त. घर काम काय सगळ्याच करतात, पण त्यातून किती समाधान मिळत? थकवाच जास्त वाट्याला येतो. नवरा मुलांना काही त्याच महत्व नसत आपण कितीही राबलो तरी. हा उद्योग सुरू करण्या पुर्वी मी ग्राउंडला जी तुम्हाला मोकळी जागा दिसते (बिल्डिंग खाली भरपुर मोकळी जागा होती. त्यात गवत वाढल होतं) त्यात मी भाजी लावली होती. मोठी मोठी वांगी, मिरच्या, टोमॅटॉ येत होते. नवरा पण त्या कामात मला साथ देत होता. ही भाजी काही मी माझ्याच घरात नव्हते आणत. बिल्डींग मध्ये सगळ्यांना वाटत होते. एक दिवस कुणाला तरी किडकी भाजी गेली असेल नाहीतर कमी आली असेल तर लगेच त्यांच्या डोळ्यात माझा मळा खुपला आणि त्यांनी माझी कंप्लेंट करून माझा मळा बंद पाडला. तेंव्हापासून मी बिल्डिंगमध्ये कोणाशी जास्त संबंधच ठेवत नाही.
" माझे गिऱ्हाईक म्हणतात की तुम्ही बाहेर जागा घेऊन ही संस्था का चालवत नाही? आहो मी एकटी ही संस्था चालवते, मी पार्टनर कोणी घेत पण नाही, कारण मला माहित आहे माझ्याबरोबर कोणाचे पटणारच नाही, मग मला एकटीला कस परवडेल बाहेर जागा घेऊन? आणि आहे त्यात मी समाधानी आहे. उलट हाच व्याप सांभाळताना नको होत. मला प्रसिद्धीची पण हाव नाही. तुम्ही दाराची कडी वाजवलीत तेंव्हा पाहील असेल की माझ्या दारावर नवऱ्याच्या नावाची पाटी आहे. विवाह सुचक मंडळाची नाही. "
" आहो १०-१० मिनीटांनी फोन येतच असतात स्थळांची. हे बघा अल्बम किती स्थळ आहेत, आज ह्याची भेट घालून दे उद्या त्याची. कधी कधी ४-५ जणांचा सामुहीक बघण्याचा कार्यक्रमही घेते. नवरा घरात नसेल तेंव्हा घरात आणि असेल तेंव्हा गार्डन मध्ये. कुणाच्या कुंडल्या जमत नाहीत. आहो कसल्या आल्या कुंडल्या नि छत्तीस गुण? माझा ह्यावर मुळीच विश्वास नाही, देवावर तर माझा मुळीच विश्वास नाही कारण त्याच्याकडे सगळ्यांना समान न्याय नाही. माझ्या घरात तुम्हाला एकही देवाचा फोटो दिसनार नाही. " समोर एक लक्ष्मीचा नारळ तांव्याचा घट होता. त्याची पुजा झालेली दिसत होती. "ही तुम्हाला पुजा दिसते ती माझ्या स्वर्गवासी सासूची इच्छा आहे. ती मी अजून पुरी करते. ती जाऊन ७ वर्षे झाली. पण तिची इच्छा होती की ही पुजा मी नेहमी करावी म्हणून. सासूला देव मानून तिला स्मरून ही पुजा मी दर गुरूवारी करते. "
"एखाद्या मुलाला मुलगी पसंत असते तर मुलीला मुलगा पसंत नसतो, दोघांना पसंत असेल तर घरच्यांना नसतो. अशा वेळी मी घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. कारण माझ वधू किंवा वराशी नेहमीच मैत्रीच नात असत. त्यांना मी एकट्यालाच मला भेटण्यासाठी एक दिवस बोलावते त्यांच्या मनातल खर जाणण्यासाठी, पालकांसमोर ही मुल बोलत नाहीत आपल्या मनातल, पण माझ्या समोर शांत मुल, मुली अगदी जुन्या मैत्रीणी सारखी सगळ मनातल ओकतात. तासन तास माझ्याशी गप्पा मारतात. पुन्हा पुन्हा भेटायला येतात आणि फोन करतात. त्या सगळ्यांना मी लाडाने "कारटा" आणि "कारटी"म्हणुनच हाक मारते. "
" एकदा एक मी लग्न जबरदस्तीने केल होते, म्हणजे मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडले होते. एक दोन वेळा भेटवून दिल्यामुळे मुलाची आणि मुलीची आपाआपसात फोनाफोनी होऊन ते जरा प्रेमातच पडले होते. पण मुलाच्या आई वडीलांना मुलगी पसंत नव्हती कारण तिची आर्थिक परीस्थीती चांगली नव्हती. मुलाच घराण नावाजलेल राजकारणी होत. मी समजाउन पाहील पण घरातले ऐकेचनात. शेवटी मी त्यांना आश्वासन दिल की मी तुमच लग्न लाऊन देईन आणि त्यांच कोर्ट मॅरेज मी लाऊन दिल. एवढा तमाशा झाला होता तेंव्हा, आहो माझ्या घरावर दगड मारले होते तेंव्हा. पण मी काय ऐकतेय, मी नाही घाबरत कुणा पुढाऱ्याला. त्याच्या घरी तो. सरळ एक काचेची बाटली घेतली आणि धरला त्याच्या अंगावर नेम बरोब्बर पायाला लागली. मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली. त्यांनी त्यांच्या वजनावर ती मिटवली. थोडा काळ गेला आणि त्यांच्यात गोडी झाली. मुलाच्या सुखासाठी त्यांनी त्या मुलील स्विकारल. माझीही माफी मागायला आले होते. धाडकन दरवाजा लावला मी. काय देण घेण त्यांच आणि माझं?
एखाद्याचा होकार कळवायला आनंद होतो हो पण नकार कळवताना खुप वाईट वाटत. तुम्ही माझ्या बोलण्यावर जाऊ नका. आहो मला पण आहे हृदय. हां माझी वागण्याची पद्धत वेगळी आहे, पण त्यावर मी खुष आहे आणि मी अशीच राहणार".
" जेंव्हा एखाद लग्न जमत त्या दिवशी मी माझ्या घरात उड्या मारून आनंद व्यक्त करते. मी कुणाच्याही लग्नाला जात नाही. लग्न जमल्यावर मला स्वइच्छेने वधू-वराकडून साडी नारळाचा मान येतो. मी तो आनंदाने स्विकारते. त्या साड्या मी आवडीने वापरते, ही नेसलेली पण त्यातलीच आहे. ज्या दिवशी त्यांच लग्न असत त्या दिवशी माझ्या घरी लग्नाच वातावरण असत. सगळा आनंदी आनंद असतो. गोड धोड मी सगळ्यांना करून खायला घालते. माझ्या कुत्र्यांनाही मी शिरा बनवून घालते. ते पण खुप मिजाशी आहेत. रोज त्यांना ताजी मच्छी खायला लागते. त्यासाठी मी सकाळी ६ वाजता धक्यावर जाऊन ताजी टाकाऊ मच्छी गोळा करून आणते, ती त्यांना दिवसभर पुरते. रोज त्यांची अंघोळ घालते. त्यांच्याशी रोज गप्पा मारते, रागावते, रुसते, जवळ घेते. एवढे लाड करते म्हणून ते माझ सगळ ऐकतात. "
" मी माझे निर्णय माझ्या मुलांवरही लादते. मोठ्या मुलाचे लग्न होऊन तो गावालाच राहतो. मुलीला अमेरीकेतल स्थळ शोधून दिल. तिचा फोटो तिने दाखवला. लहान मुलगा माझ्या जवळ असतो. कस्टम मध्ये आहे तो. लग्न करणारच नाही अस मला स्पष्ट बजाऊन सांगत होता, पण मी कसली ऐकतेय त्याला? तुझ लग्न लावल नाही तर नावाची शारदा नाही म्हणून त्याच्याशी पैज लावली आणि तो पैज हरला. हॉल मध्ये जी तुम्हाला मुलगी दिसते ती माझी सून आहे. अगदी मुली सारखी आहे. माझ्या भावाचीच मुलगी भावाच्या संमतीने पळवून आणली मी त्याच्यासाठी आणि लावल जबरदस्तीने लग्न. खुप सुखाचा संसार चालू आहे दोघांचा. आम्ही दोघी एकमेकींशी लाडाने भांडतो पण, त्याशिवाय आम्हाला गोडी वाटत नाही. "
" खुप बोलले मी आता. बराच वेळ झाला, दुसरी पार्टी येणार आहे १५ मिनिटांत. तुम्हाला मी काही फोटो दाखवते ते बघा आणि सांगा मला. मी त्यांच्याशी फोनवर कॉंटॅक्ट करून उद्या तुम्हाला फोन करते. तुमच्या मुलाला माझ्याकडे उद्या पाठवून द्या पण त्याच्या मनातल विचारायला. आहो अस करते म्हणूनच मी ठरवलेली लग्न यशस्वी होतात. एकाच लग्नाचा काडीमोड झाला होता सुरुवातीला, त्याला कारण होत त्यांच्यात निर्माण झालेले त्यांच्यातले मतभेद. खुप रडले होते मी तेंव्हा. म्हणून मी मुला मुलीला त्यांचे स्वभाव ओळखायला स्वतंत्र बोलावते, त्याप्रमाणे त्यांच्या जोड्या सुचवते. शेवटी त्यांचे नशीब. "
" अशी आहे मी शारदा, विवाह मंडळ वाली. मघाशी मी तुम्हाला सगळ्यांना आत घेत नव्हते, पण तुम्ही मला खुप आवडलात. खुप आनंद झाला तुमच्याबरोबर गप्पा मारून. एवढ खाजगी मी कुणाशी बोलत नाही. परत याल तेंव्हा सगळ्याच या. तुमच्या नवऱ्यांना पण घेऊन या. " आम्हा दोघिंकडे बघून ती बोलली. आणि काही फोटोंची पसंती दाखऊन आम्ही बाहेर पडलो.
*समाप्त*