नभ दाटलं दाटलं
तेज झाकलं झाकलं
जलदांच्या भारानं
आभाळ ही वाकलं ।
डुले गवताची पात
रुजुनीया धरतीत
घेउनीया नजरेतं
स्वप्नं पहिलं-वहिलं ।
धावे बेभान हा वारा
गावातूनं, रानातूनं
लाल, काळ्या धुळीनं
विश्वं सारं कोंदलं ।
नादावल्या दिशा दाही
धरतीही आसावली
बीज तिच्या गर्भात
तेज जणू साचलं ।
दीप सारे मालवले
पक्षी जाई घरट्यास
वरुणाच्या चाहूलीनं
चित्त धरेचं भारलं ।
झर झर बरसती
थेंब टपोरे मोती
उतरुनी अलगद
अंग भुईचं भिजलं ।
कोंब हिरवा इवला
पाही मान उंचवून
विश्वाच्या या पटावर
चित्र सुखाचं रेखलं ।