बाळू (भाग १)

'बाळू' आमचा गडी. हसरी, लाजरी, नम्र अशी मूर्ती. हा आमच्याकडे आठवड्यातून ४ दिवस येतो. महिन्याचा पगारावर राहायला हा तयार नाही कारण त्याला इतर ठिकाणीही भरपूर डिमांड असतो. मग त्याला जास्त पैसे मिळतात.

हाय वयाने ४० च्या आसपास असेल. माझी सासू ह्याला "बाळू" भाऊ म्हणून हाक मारते तर आम्ही बाकीचे सगळे बाळू काका म्हणून हाक मारतो.

जेवढे दिवस हा कामाला असतो तेवढे दिवस घरातल्या माणसांना मोठा आधार असतो. कारण प्रत्येक काम हा आवडीने, नीट-नेटकेपणाने, स्वच्छ आणि विश्वासाने करतो. अगदी बगिचा सांभाळण्यापासून ते घरातील ओटा पुसण्या पर्यंतचे कामही हा वेळ आली तर करतो. माझे हेच काम आहे मी अमुक काम करणार नाही, मला नाही जमत हे शब्द त्याला माहीतच नाहीत. अगदी कधीही बाजारात जरी पाठवले तरी जातो. आम्ही तो नसताना अंगणातला कचरा काढतो पण तो जेंव्हा काढतो तेंव्हा माती गुळगुळीत झाल्यासारखी वाटते. त्याच्या हातातच कामाची कला आहे.

हा मूळ फलटणचा. घरात काका आणि त्याचे वडील आणि त्यांचे कुटुंब एकत्र राहत होते. ह्यांची वारसा हक्काने मिळालेली जमीन होती. त्यात ते शेती करत. ती जमीन त्याचे काका मोठे असल्याने त्यांच्या नावावर होती. त्यांना ४ मुले आहेत. बाळूला १ बहीण आहे. तिचे लग्न लहान वयात तो २ वर्षाचा असतानाच झाले होते. ५ वर्षाचा होता तेंव्हा ह्याच्या वडिलांना रस्त्यात मोकाट बैलाने शिंग खुपसून मारले. बाळू आणि आईचा आधार संपला होता.

वडील गेल्यावर काकाच्या कुटुंबाने बाळू आणि त्याच्या आईचा छळ करायला सुरुवात केली. ५ वर्ष असे हाल झेलून एक दिवस बाळूच आईने कंटाळून त्यांचा जमिनीतील हिस्सा मागितला आणि आम्ही आमचे कमावून खाऊ म्हणून स्पष्ट सांगितले. असे सांगताच बाळूच्या काकांनी ही जमीन माझ्या नावावर आहे त्यात तुमचा काहीच हिस्सा नाही म्हणून सांगून हाकलवून दिले.

दोघांचा राहिलेला आधार पण संपला होता. मग बाळूच्या आईने आपल्या माहेरी जायचे ठरविले. मामाच्या घरची परिस्थिती तशी काही चांगली नव्हती पण ठीक होती. तिच्या माहेरी शेळ्यांचा व्यवसाय होता. मामा रोज दिवसभर शेळ्यांना चरायला घेऊन जायचा. घरात मामाच्या दोन मुली आणि मामी असा परीवार होता. बाळूचे आजी आजोबा आधीच वारले होते. तिचा विश्वास होता की माहेरची माणसे तिला नक्की सांभाळतील. आपण त्यांची कामे करू, कामाला हातभार लावू, शेळी राखू आपल्या मुलाला शिकऊन मोठा करू मग तो आपल स्वतःच घर बांधेल आणि आपण त्याचा सुखाचा संसार बघून डोळे मिटू.

मामाने बाळू आणि आईला घरी ठेवून घेतले. बाळूची आई मामीला घरकामात मदत करू लागली. बाळू आता मोठा झाला होता. तो मेंढ्या सांभाळू शकेल म्हणून मामाने एका वाडीवाल्या इसमाकडे नोकरी पत्करली आणि बाळू मेंढ्यांना चरायला घेऊन जाऊ लागला. सकाळी उठल्यावर डबा घेऊन तो शेळ्या चरायला न्यायचा तो संध्याकाळी दिवस मावळताना घरी यायचा. अशा परिस्थितीत आईने त्याला शाळेत घालण्याची इच्छा मनोमनच मारली. बाळू संध्याकाळी थोडावेळ विरंगुळा म्हणून आजूबाजूला त्याने जे मित्र जमवले होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला जायचा आणि घरी आल्यावर जेवून गाढ झोपायचा आयुष्याची स्वप्न बघत.
अशीच काही वर्षे निघून गेली आणि बाळूला समज येऊ लागली. आता त्याला स्वतः:च्या घराची ओठ लागली होती. आपलंही एक घर असावं त्यात आपण आपल्या आईला सुखात ठेवावं अस त्याला मनोमन वाटू लागलं. एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की मुंबईतील एका बंदरात ओझी वाहण्याच्या कामासाठी मजूर हवे आहेत. तिथे पगार चांगला आहे. आपण तिकडे जाऊ. बाळूच्या डोळ्यासमोर त्याची सगळी स्वप्न फेर धरू लागली. त्याने लगेच त्या मित्राला आपला होकार कळवला आणि आपला विचार आईला सांगितला. आई घाबरत होती. नको म्हणत होती. कारण तिने मुंबई ही भुलभुलैया आहे हे ऐकले होते. पण तिला माहीत होते की तो जर इथेच राहिला तर आयुष्यभर त्याला मामाच्या मेंढ्या सांभाळाव्या लागतील. तिने त्याला होकार दिला.

रात्री ही गोष्ट आईने मामाच्या कानावर घातली. मामा वैतागला होता. म्हणाला की "तुमच्या भरवशावर मी दुसरी मजुरी पत्करली. दोन वेळचे मिलते ना तुमास्नी खाया, मग आता काय धाड भरली? मी तुमच्यावर उपकार केले त्याची ही परत फेड करता व्हय! ".

पण बाळूच्या आईने मनात पक्के ठरवले होते की काही जालं तरी आपला मुलगा स्वावलंबी झालाच पाहिजे. त्याला त्याच आयुष्य जगता आलं पाहिजे. आई तिच्या भावाला म्हणाली "दादा, मला माफ कर, पन मला माज्या पोराच नशिब घडवाया संदी दिली पाह्यज्ये. तुजे लय उपकार झाले आमच्यावर आम्ही कधीबी इसरनाह न्हाय. शेजारचा नाम्या दावनार हाय तेला काम. माझ पोराच नशिब सुधारल तर तुला वेळ पडल तवा मदत करील त्यो. आम्ही आज रातच्याला मुंबैला निघतोया. " आणि ठाम निर्णयाने तिने भावाला निरोप दिला.

बाळू, बाळूची आई आणि बाळूच्या ५ मित्रांचा परिवार असे सगळे मुंबईत उतरले. मुंबईतली ती गडबड, गोंधळ गर्दी पाहून सगळेच बावचळून गेले. बायका गावच्या आठवण येऊन रडू लागल्या. परत आपल्या गावी जाऊन मिळत त्यात खाऊ म्हणाल्या. पण नाम्या आधी मुंबईत राहिलेला होता त्याच्या आत्याकडे मजुरीसाठी. त्याने सगळ्यांना धीर दिला. "मला हाय माह्यती मुंबैची तुमी कशाला घाबरतासा? " आणि नाम्या सगळ्यांना घेऊन नवी मुंबईच्या एका झोपडपट्टीच्या विभात गेला. नाम्याला राहण्याची सोय कुठे होईल ह्याची कल्पना होती. नाम्याच्या जुन्या मित्राच्या भाड्याच्या खोल्या होत्या. त्यातील ३ खोल्या भाड्याने घेऊन प्रत्येक खोलीत २ कुटुंबे पार्टिशन घालून राहिली.

दुसऱ्या दिवशी नाम्या बाळू आणि त्याच्या इतर मित्रांना घेऊन बंदराच्या एका ओळखीच्या युनियन लीडर कडे घेऊन गेला आणि आपल्याला कामाची गरज आहे सांगून त्याने आपल्या मित्रांना गोदी कामगार म्हणून पोस्ट कॉनट्रॅक्ट बेसिस वर मिळवून दिल्या. सगळ्यांना खुप आनंद झाला. बाळूच्या आईचे डोळे आनंदाने डबडबले. सगळ्यांनी नाम्याचे आभार मानले. आणि बाळू आणि त्याचे सगळे मित्र दुसऱ्या दिवसा पासून कामावर रुजू झाले.

एक महिना पूर्णं होताच बाळूला पगार मिळाला चक्क ३००० रु. बाळूने एवढे पैसे एकत्र कधीच बघितले नव्हते. तो खूप खूश झाला. त्याला शिकलेला नसल्याने मोजताही येत नव्हते. केवळ मॅनेजर म्हणाला की हे ३००० रु. आहेत म्हणून त्याला कळले. तो घाईतच आईकडे गेला आणि आनंदाने आईला सांगितले " आय हे बघ मला कामाच पैस मिलाल. मॅनिजर म्हनला तीन हजार हाईत. हे तुज्याकड ठेव मला काय त्यातल समजत न्हाय. " आई पण अडाणीच होती. पण बाळू सारखी भोळी नव्हती. व्यवहारज्ञान तिला माहीत होते. बाळूच्या वडिलांनंतर तिच मोडक्या तोडक्या पैशाचे व्यवहार बघत होती.

बाळूच थोड्या वेळाने विचार करून म्हणाला "आय मामाला बी त्यांतलं थोडं पैस पाठीव. त्यान येळेला आपली गरज भागवलीया". आई म्हणाली "माझ्या तोंडच बोललास लेका, परवा शिवा जानार हाय गावाला त्याच्या भनीकड तवा त्याच्याजवल धाडते पैस. " आणि आईने मामाला १००० रु. पाठवून दिले.

इकडे मामा पण खूप खूश झाला एवढे पैसे बघून. त्याला आपल्या बहिणीला तोडून बोलल्या बद्दल खेद वाटू लागला आणि त्याच्या मनात बाळू आणि त्याच्या आईबद्दल आश्रिताची भावना जाऊन आदराची भावना निर्माण झाली. तो सगळीकडे सांगू लागला की माझा भाचा मुंबैला नोकरी करून मोठा पगार मिळवतो.