बाळू (भाग २ अंतिम)

बाळूच अस नाव गाजत असतानाच मामाकडे एक दिवस बाळूला आपल्या मुलीला मागणी घालायला गावातील हरी नावाचा इसम आला. हरीची ही एकुलती एक मुलगी कमळा ही ९वी त शिकत होती. हरीची थोडी शेती होती. त्यात शेती करून तो घर चालवीत असे आणि मुलीला शिकवीत असे. बाळू बद्दल ऐकून त्याने आपल्या कमळाला पदरात घेउन पोरीच नशीब उघडतय का ते आजमावण्यासाठी हरी बाळूच्या मामाकडे आला होता. मामा बाळू असताना जिथे नोकरी करत होता त्याच्या बाजुलाच हरीची शेती होती त्यामुळे तो हरीला आणि कमळाला चांगला ओळखत होता. कमळा ही चुणचुणीत, हुषार मुलगी होती. शाळेतून आल्यावर घरकामात मदत करून अभ्यास करत बसायची. हे गुण मामाला माहीत असल्यामुळे त्याने हरीला बाळू हा अजिबात शिकलेला नाही ह्याची कल्पना आहे. पण पोरी चा बाप तो. शिक्षणापेक्षा आपल्यासारख्याला पैसा महत्वाचा हे त्याला माहीत होत. म्हणून त्याने पसंती दाखवली. मामानेही आपली दर्शवून आपल्या बहिणीला सुचवतो म्हणून सांगितल. मामाने लगेच पत्र पाठवून बाळूला आणि त्याच्या आईला अशी मागणी आल्याबद्दल कळवल आणि जर पसंती असेल तर गावाला लग्नाचा बार उडवायच्या तयारीतच यायला सांगितल.

बाळुची आई मामाच्या पत्राने खुष झाली. आपल्या बाळूचा संसार, आपली नातवंड, आपल घर ही चित्र तिच्या डोळ्यासमोर नाचू लागली. तिने बाळुला आलेल्या पत्रा बद्दल सांगितले. बाळू पहीला मुलगी शिकलेली असल्या मुळे तयार नव्हता. पण आईने तिच्या वडीलांना ते माहित असून त्यांनी होकार दिल्याचे सांगितले. बाळू कसाबसा तयार झाला आईच्या इच्छेखातर.

आठवड्या भराने बाळूने कामावर १ महिन्याची सुट्टी काढून आईसोबत तो गावाला गेला. मुलगा आणि मुलीच्या पसंतीचा प्रश्न त्यांच्यात नसल्याने १५ दिवसांतच बाळू आणि कमळाच लग्न झाल. आणि १५ दिवसांनी बाळू आपल्या आई बायको सोबत मुंबईत आला.

आता बाळूने राहायला त्याच्या परीवारासाठी पार्टनरशिप मधली खोली सोडून स्वतंत्र खोली घेतली त्यात ते तिघे राहू लागले. बाळू हा अतिशय लाजाळू आणि भोळा असल्याने कमळाला सुरुवातीला थोड जडच जात होत. पण बाळूची आई वेळोवेळी तिला सांभाळून घेत होती. तिचे कौतुक करत होती आणि बाळूलाही समजावत होती. "आता तू मोठा झालायस, हा पोरकटपना सोडून दे. सारख आय आय करू नगस आता, तुला तुजी बायकू हाय. काय लागल सवरल की तिच्याकडच मागत जा. ती शिकलेली हाय आता समदा पगार तिच्याच हवाली कर. तिच आता घर सांभाळील". बाळूने आईची आज्ञा मानली आणि बाळूचा संसार सुखात चालायला लागला. बाळू रोज कामावर जात आणि बायको संसार सांभाळीत असे. ती खर्च भागवून पैसे साठवून ठेवत असे. बाळूने आपल्याला घर एक वर्षानंतर बाळूच्या घरी झोली हलली. बाळूला मुलगा झाला. बाळू, आई आणि कमळा तिघ पण खुष होते.

आता बाळूच एक स्वप्न होत ते म्हणजे स्वत:च घर. बाळू आपल्या मित्रांना नेहमी घरा पुरती जागा घेण्या बद्दल बोलत असे. पण त्याला गुंठ्यात जागा परवडणारी नव्हती. त्याच्या इतर काही मित्रांना पण जागा घ्यायची होती. एक दिवस त्याला जागेचा पत्ता लागला. त्याच्या राहत्या जागेपासून २ किलोमिटर अंतरावर डोंगराळ भागेत झोपडपट्टी वसाहत होती. तिथे १ लाख रुं गुंठ्यावर जागा मिळत होती. मग बाळूच्या मित्रांनी एकत्र जागा घेउन त्याग विभाग करून घर बांधण्याचे ठरवले. बाळूच्या बायकोने आपले मंगळसुत्र गहाण ठेऊन एका सावकारा कडून घरासाठी कर्ज घेतले आणि नुसत्या का़ळ्या मण्यांची सर ती घालू लागली.

थोड्याच दिवसांत बाळुचे घर उभे राहीले आणि एक खोली आणि एक स्वयंपाक घर अशा बाळू आपल्या स्वतःच्या घरात आपल्या परीवारा सोबत राहायला आला. आईला आकाश ठेगणे झाल्याचा भास होत होता. आपली सगळी स्वप्ने पुरी झाल्याने आपण स्वप्नातच आहोत की काय अशी तिला शंका येऊ लागली. अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखी वाटत होती. बाळूची बायको आनंदाने फुलली होती. नवीन घरात येताच काही दिवसांनी बा़ळूच्या घरात आणखी एक झोळी हलली. बाळूला अजून एक मुलगा झाला. आनंदी आनंदात दिवस चालले होते.

अचानक एक दिवस बाळू बंदरातील ज्या विभागात काम करत होता तो विभागच बंद पडला. सगळ्या कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. सगळे इकडे तिकडे मजूरी शोधू लागले. कुणी स्लॅप च्या कामात कुणी मोल मजुरी करून आपले पोट भागऊ लागले. बाळू ला आणि त्याच्या परीवाराला हा धक्का सहन होत नव्हता. ह्या धक्यानेच बाळूची आई आजारी पडली. आणि थोड्याच दिवसांत वारली. बाळूवर एकावर एक संकट येऊ लागली. पण घरात बसून बायका पोरांच कस होईल म्हणून तो मजुरीच्या शोधात निघाला. त्याच्या शेजारची काही माणस इमारतीच्या स्लॅप वर मजूरी साठी जायची. त्यांना त्याने विचारल. पण आधिच भरपूर माणस आहेत तू मालकाला विचार अस त्यांनी सांगितल. मग बाळूने त्याच्या स्वभावाप्रमाणे मालकाकडे कामाची विनवणी केली. मालकाला त्याच्यातील एक आळशी मजूर काढायचा होताच. बाळूचा नम्रपणा पाहून त्याने बाळूला ठेऊन घेतले.

बाळू आता स्लॅब च्या कामावर जाउ लागला. आमचे नवीन घर आम्ही जेंव्हा बांधत होतो त्याच्या स्लॅब च्या कामावर बाळूला मन लाऊन काम करताना माझ्या सासऱ्यांनी पाहीले. सासऱ्यांनी त्याला आमच्याकडे तू काम करशील का म्हणून विचारले तेंव्हा स्लॅब चे काम बंद असताना येण्याचे त्याने कबुल केले.

७ ते ८ दिवसांनी बाळू आमच्याकडे कामाला आला आणि जादू झाल्याचा भास आम्हाला झाला. घराभोवतीचा सर्व परीसर स्वच्छा लखलखीत झाला, झाडांच्या मुळांवर मातीचे ढीग पडले, सगळी छोटी मोठी झाडे पाण्याने सुखावली होती. सगळ्यांना खुप समाधान वाटले होते त्याच्या कामाने. माझ्या सासऱ्यांनी त्याला पगाराचे १०० रु. देउन २० रु. खुषीने अजून दिले. पण त्याला ते किती होते ह्याचा हिशेब कळत नव्हता. तो सारखा विचारत होता. हे किती माझ्या पगाराचे कुठले? मग त्याला समजाउन सांगितले की त्याला वरचे २० रु. बक्षिस दिले आहेत तेंव्हा तो खुप खुष झाला. उद्या येतो म्हणून भोळ्या आनंदाने घरी गेला. आता तो रोज आमच्याकडे येऊ लागला. त्याचे काम आजूबाजूचे शेजारी बघत होते. ते पाहून अजून १, २ घरांत तो मधून मधून कामाला जाऊ लागला. सगळीकडे त्याला डिमांड वाढू लागले आणि मुल शाळेत जायला लागली तेंव्हा पगारात भागत नसल्याचे त्याने सासऱ्यांजवळ बोलून दाखवले. त्या दिवसा पासून सासऱ्यांनी त्याचा पगार दिवसा १५० रु. इतका केला. आता तो महीन्याला ४५०० पर्यंत कमवायला लागला आहे (वर कमाई वेगळीच). त्याच्या बायकोच्या हातात तो सगळी कमाई देतो. ती घर चालऊन मुलांना हायस्कुल मध्ये शिक्षण देत आहे. वर कमाई शिल्लक ठेवत आहे. शिल्लक ठेवलेल्या रकमेतून बाळूने घराला लागून एक खोली अजून बांधून ती खोली भाड्याने दिली आहे. त्याचे महीन्याचे ३५० रु. भाडे तो घेतो. त्याला आपले भाग्य परत रुळावर आल्याचे वाटू लागले. त्याने आता स्लॅब चे काम पण सोडून दिले. कारण त्यात ढोर मेहनत जास्त होती आणि रात्री बेरात्री कधीही कामावर जायला लागायचे.

आमच्याकडे आला की त्याला अजुनही सकाळचा चहा नाश्ता, आम्ही देतो. दुपारी १२ च्या सुमारास माझी सासू त्याला उन्हात तापलेला पाहून सरबत देते, दुपारी जेवणातले काहीतरी ( तो डबा आणतो) आणि पुन्हा संध्याकाळी चहा नाश्ता आम्ही त्याला देतो. काही ठिकाणी त्याला चहा सुद्धा मिळत नाही. त्याला आमच्या बद्दल आपुलकी आहे. सासूला तो आई हाक मारतो, मला आणि जावेला वैनी, आमच्या नवऱ्यांना भाऊ आणि लहानांना नावाने हाक मारतो. सासऱ्यांना बाबा हाक मारायचा. माझे सासरे २ वर्षा पुर्वी वारले ऍटॅकने, जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी बाळू कडून मॉलिश करून घेतली होती. दुसऱ्या दिवशी बाळूने जेंव्हा त्यांचा पार्थिव देह पाहीला तेंव्हा अगदी स्वतःचा बाप गेल्याप्रमाणे आक्रंदून रडला. कारण माझ्या सासऱ्यांनी त्याला आर्थीक आणि माणूसकीचा आधार दिला होता. अगदी आमच्या घरचाच तो सदस्य झाला आहे. घरात तो कुठेही वावरला तरी आम्ही त्याच्यावर पहारा ठेवत नाही. तसा तो कामाशिवाय घरात येतच नाही. एक दिवस माझ्या सासूची कानातली कुडी बगिचात फुल तोडताना पडली होती. सासू आणि आम्ही सगळ्यांनी खुप शोधली पण ती कुणालाच मिळाली नाही, पण बाळू केर काढत असताना त्याला ती कुडी पानाखाली सापडली. त्याने ती लगेच सासूबाईंकडे आणून दिली.

तो आमच्या कडे आल्यामुळे त्याच आता घर हळूहळू सजायला लागल. आम्ही आमच्या जुन्या घरातला सोफा, मिक्सर, शोकेस, फिल्टर त्याला काही महिन्यांच्या अंतरावर देऊ लागलो. पहिलाच त्याला आम्ही मोठी वस्तू म्हणून मिक्सर दिला त्यावेळी न सांगता मोबदला म्हणून संध्याकाळी ६. ३० पर्यंत काम करू लागला. आम्ही त्याला काहीच मागितले नव्हते मिक्सरच्या बदल्यात. तो का एवढा वेळ थांबतो हे आम्हाला कळेना. सासुने त्याला विचारले तेंव्हा मिक्सर दिल्याचे उपकार फेडतो अशी भावना त्याने व्यक्त केली. सासूला त्याची दया आली आणि त्याला ५० रु. जास्त देऊन घरी पाठवले. आम्ही तुला ते आपुलकीच्या नात्याने देतो हे त्याला समजावले. तसे आम्ही त्याला मधून मधून मुलांचे, आमचे जुने कपडे त्याला देतो. जुनी भांडी देतो. शिल्लक खाऊ, सणासुदीचे सगळ्या पदार्थांची ताजी पुडी त्याला देतो. त्यात तो खुष असतो.

कामा बद्दल सांगायच तर आम्हाला आता त्याची खुप सवय लागली आहे. डस्टबीन मधला कचरा आता त्याच्याशिवाय कोणी टाकत नाही. घराच्या काचा पुसायचे जणू त्याने कॉंटॅक्टच घेतले आहे. तोच हल्ली टेरेस झाडतो. गरज पडली तर दुकानावर जाऊन किरकोळ सामान आणतो. अगदी किचनही कधीतरी वरपासून धुवून काढतो. झाडांना जोपासण्याच काम तर त्याचच. पण अगदी हरकाम्या झाला आहे.

तो जेंव्हा थोडे काही बोलतो तेंव्हा त्याच्या बोलण्यातून त्याच्या बायको बद्दलचा अभिमान दिसून येतो. अगदी एखादी ग्रॅज्युएट किंवा अधिक शि़क्षण त्याच्या बायकोने घेतलय असा ताठा त्याच्या बोलण्यातून वाटतो. "मी असा अनपढ, सगळ तिच बघतीया, म्हणून आमच जमत! तिच बाजार बघतीया. पोरांचा अभ्यास बी तिच घेतीया, पोर मला दाखवितात अभ्यास बाबा बरोबर हाय का बघ मी वा मस्त करून तिच्या कड धाडतो! असे उद्गार तो अभिमानाने काढतो.

त्या दिवशी साफसफाई करत होता आमच्या हॉलची, म्हणजे कोळीष्टक वगैरे काढण्याचे काम तोच करतो. आमच्या झुंबरवर एक बुलबुल पक्षाने घर करून मधून मधून यायचा. तो साफ करत असतानाच नेमकी त्याला बुलबुल झुंबरावरच्या घरट्यात दिसला. त्याने त्याला पकडले आणि विचार करू लागला. बुलबुलचा आवाज ऐकून आम्ही सगळे बाहेर आलो. बाळू सुन्न झालेला बघून बुलबुल त्याला चावला असेल अस आम्हाला वाटल. आम्ही त्याला विचारल तेंव्हा तो कळवळून म्हणाला " त्याला बी वाटतय त्याच घर आसाव, निवांत कुठतरी पडून ऱ्हाव., मी त्याले रानात सोडून येतू". बाळूच्या ह्या वाक्यानी आम्हाला समजले की तो ज्या परीस्थितीतून गेला त्या परीस्थितीची जाणिव त्याला आहे. तो विसरला नाही.