अपुल्या स्वातंत्र्यास आम्ही

अपुल्या स्वातंत्र्यास आम्ही ना विरू देवू कधी॥
मान जाओ कापुनी पण मान ना तुकवू कधी॥
मान ना तुकवू कधी.... ॥ध्रु॥

प्राप्त केले यास आम्ही झगडुनी शतके बहू॥
मिळविली दौलत ही आम्ही प्राण देऊनी बहू॥
फैरी त्या सस्मितमुखे या छातीवरती झेलिल्या॥
कष्ट इतुके सोसल्याने स्वर्गसुख आहे चहू॥
इभ्रतीला मातृभूच्या डाग ना लावू कधी॥
अपुल्या स्वातंत्र्यास आम्ही ...... ॥ १ ॥

राष्ट्रप्रेमापुढती  ना चाले जुलूमांचे कधी॥
चक्रवाताच्या समोरी टिकती ना ज्वाळा कधी॥
येऊदे  तो, लाख फौजा घेउनी, अरी शांतीचा॥
भेदू ना शकतो अशी तो एकता अमुची कधी॥
आम्ही तो कातळ, रिपू  हलवू न शकतो ज्या कधी॥
 अपुल्या स्वातंत्र्यास आम्ही ...... ॥ २ ॥

बदलणाऱ्या या जगाच्या हात हाती देवुया॥
जीवनाच्या हरघडीला जीवने ही बदलुया॥
जर मिळाला देशद्रोही एकही, देशामध्ये॥
सर्वशक्ती एकवटुनी त्यास सारे ठेचुया॥
एकदा पडलो बळी पण ना पडू फिरुनी कधी॥
अपुल्या स्वातंत्र्यास आम्ही ...... ॥  ३ ॥   

तरुण आहे रक्त हे देऊ नका टक्कर अम्हा॥
करून टाकू आम्ही गारद देऊनी ठोसा तुम्हा॥
नेई वाहून, काळ हा, जुलुमे आणि अन्याय हे॥
राहो फडकत हा तिरंगा, जोवरी रवी-चंद्रमा॥
बापूने जो पाठ दिधला त्यास ना विसरू कधी॥
मान जाओ कापुनी पण मान ना तुकवू कधी
अपुल्या स्वातंत्र्यास आम्ही ......   ॥ ४ ॥