बधीरतेचे श्लोक

चला चांगले चांगले अन्न खाऊ
तशी सरबते थंड ग्लासात घेऊ
जळो ऊदबत्ती लुटू गंध त्याचा
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥१॥

उपाशी बिपाशी असो कोणी कोठे
मनाला नको जाणिवांचे धपाटे
भुकेले मरो कोणी घासून टाचा
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥२॥

कुणी मुक्त आहे, कुणी बद्ध आहे
कुठे युद्ध आहे, कुठे बुद्ध आहे
नको भार माथा कुणाला कशाला
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥३॥

कधी उन्ह आहे, कधी पूर आहे
मना यात काही नवे काय आहे?
असे दोष कर्मांहुनी प्राप्तनाचा !
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥४॥

कुणी भ्रष्ट होते, कुणी ठार होते
अशी पेपरे रोज भरतात येथे
नको खंत रे तोच व्यवसाय त्यांचा !
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥५॥

पाहा ढीग तो लष्करी भाकऱ्यांचा
नको रे मना छंद तो भाजण्याचा
जराही उडवा न टवका स्वतःचा!
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥६॥

मुखि दाढ दुखते खरी ती व्यथारे!
व्यथा अन्य त्या सर्व केवळ कथा रे!!
निदिध्यास तो फक्त लागो स्वतःचा
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥७॥

मना त्वांची रे पूर्वसंचीत केले
म्हणोनी तुझे घास सुग्रास झाले
न सोडी कधी कोष हा रेश्माचा!
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा ॥८॥

(चाल 'मनाचे श्लोक' या महाकाव्याची लावावी)