कामवाली

काही गैर-शब्द फक्त वास्तवता स्पष्ट व्हावी म्हणून घेतले आहेत, कृपया माफ करावेत.

ती आरशात न्याहाळे अपुले रूप जरा बावरूनशी
ती नवीन होती पावडर तिने काल आणली कुठूनशी
ही पहाट, अंधारी खोली, ही पोरे, दारूडा नवरा
पण वितभर मोरीवर नाहुन ती तयार झाली जपूनशी

पण पाय लागला भांड्याला अन नवराही जागा झाला
तो शिवी हासडत उठला तेव्हा जीव तिचा अर्धा झाला
पण तेवढ्यात त्याने नाकाने हुंगलीच पावडर नवी
तो वासनांध झाला, त्याचा अधिकार तिथे जागा झाला

ती 'नको नको' म्हणताना त्याने हात घातला पदराला
ती 'मुले इथे आहेत' म्हणे पण लाज नसे त्या नवऱ्याला
ती 'उशीर होतो' म्हणली पण त्याच्यावर होते भूत जणू
तो फेके दारूने बरबटलेल्या अपुल्याही सदऱ्याला

पण रोज रोज दारूने त्याचे पौरुषत्व गेले होते
जे दैवाने दिधले, त्याच्या त्या व्यसनांनी नेले होते
त्या आवेगाला खीळ जशी पडली, नवरा बेभान बने
तो तिला मारुनी पौरुष दावे, मुळात जे मेले होते

'तू पहाटची कामावर जाताना रांडे नटतेस अशी'
'ही पावडर, तुझे खुले केस, कोणासाठी सजतेस अशी? '
'तो कोण हरामी पुरवे तुजला सारे, अन भोगे तुजला?
'मी खितपत पडतो झोपडीत, तू नटीपरी जगतेस अशी?'

ती पोरे झाली जागी आता 'रोजचेच आहे' म्हणली
अन मार जिने खाल्ला ती आधण टाकुन काहीशी कण्हली
तो नवरा सासुरवाडीचा उद्धार करे जाहीर तिथे
ती 'असे न काही, तुम्ही जाणता, प्रामाणिक मी' हे म्हणली

ती पुसुनी डोळे नाश्ता बनवे, दूध पाजवे पोरांना
ती डबे करी पोरांचे अन शाळेत पाठवे पोरांना
त्यावेळी नवरा शेजाऱ्याच्या बायकोस डोळा मारी
संसार तिला सोडावा वाटे पण न टाकवे पोरांना

ती कामावरती गेली तेव्हा अश्रुंना नाही नेले
ती कळ पाठीची घरी ठेवली, ना वळ कामावर गेले
ती गेली तेव्हा नवरा होता शोधत बचतीचे पैसे
की सकाळीच लागत होते नवऱ्याला पेल्यावर पेले

ती कामावर आली त्यावेळी उशीर झालेला होता
त्या मालकिणीचा रोजप्रमाणे पारा चढलेला होता
ती काम सुरू करताना झाली लाखोलीही सुरू तिथे
त्या हातांना उरका होता पण चेहराच पडला होता

तो दिवस पगाराचा पण थोडा पगारही कापून मिळे
ती मागे तेव्हा हिशोब खाड्यांचा सारा मांडून मिळे
ती आगाऊ रक्कम मागे, 'तू नकोच येऊ' हे ऐके
ती बोले पुढचे, तेव्हा उत्तर दार सरळ लावून मिळे

ती पुढच्या कामावर जाई तर दुसरी बाई कामावर
ही गावाकडची म्हणे आमच्या, आली आम्ही आल्यावर
'तू अता वेगळे काम पहा' हा निर्णय अगदी सहज घडे
ती डोळे टिपते पदराने तो जिना हसून उतरल्यावर

ती सकाळची पाठीची कळ आता थोडी वाढू लागे
पण पुढच्या कामावरचे घर ती कसेतरी झाडू लागे
तेथे नवीन संकट बोले की ' काल तुझा नवरा आला'
'तो पैसे घेउन गेला' म्हणता ती बटवा काढू लागे

जे वाचवले होते महिनाभर, नवऱ्याने तेही नेले
ज्यासाठी राबवले मजला, या दैवाने तेही नेले
ती रडून म्हणते 'अता कधीही त्यांस नका पैसे देऊ'
'हे औषधपाण्याचे पैसे पण नशिबाने तेही नेले'

मालकीण पुढच्या कामाची आज त्या घरामध्ये नव्हती
आणी मालक फिरवत होता दृष्टी अंगावर लवलवती
ती जाणत होती, पण कामाची निकडच होती इतकी की
ती टाळत होती नजरा, गप्पा, ते फिरणे अवतीभवती

त्याने केले तिच्यापुढे मग शंभर रुपये बक्षीसाचे
नको म्हणाली तरी घेतले हाती पैसे लाजेकाजे
त्याने हात तिच्या पाठीवर मग फिरवत खालीसा नेला
तिला झटकणे जमले नाही स्पर्श खरेदीच्या प्रेमाचे

हटली बाजूला, हासुन म्हणली 'चावट वागू नका असे'
तो म्हणला 'कोणी नाही येथे, मी, तू अन शांतता असे'
ती म्हणली 'झाले काम अता मी जाते, येते पुन्हा उद्या'
कसातरी शेवटी अब्रूचा श्वास तिने घेतला असे

त्या घरी तरीही जात राहणे भागच पडलेले होते
पण मालकीण आहे तेथेच हे सत्य तपासले होते
कसा वागला मालक यावर काही नाही म्हणली ती
त्यामुळे मालकाचे धाडस आणखी फोफावले होते

ती संध्याकाळी घरी पोचता नवरा आलेला होता
ती येण्याआधी दारू पिउनी पुर्ण झिंगलेला होता
ती 'कशास पिता इतके' म्हणली अन त्याचे डोके फिरले
मन नशेत होते त्याचे, त्यावर राक्षस बसलेला होता

तो अंगावरती धावत आला, वेणी धरली हाताने
'मी तुझ्यामुळे बरबाद जाहलो' बोलत गेला त्वेषाने
'तू श्रीमंतांची रखेल, तू बस डाग खानदानावरती'
आनंद तुला होईल फक्त मी या दुनियेतुन गेल्याने

ती आज बोलली, सहन न झाले, म्हणली 'सारे तुझ्यामुळे'
'मी तुला पुरवते दारू आणिक राबत जाते तुझ्यामुळे
तू कमवतही नाहीस, तुझ्यामध्ये मर्दानी जोर नसे
बस मारतोस तू मला नि माझे दैव हारले तुझ्यामुळे'

हे जसे ऐकले, पिसाळला तो, घेत कोयता उगारला
वेणी धरली अन वार घातला, वार घालुनी फुशारला
ती आकांताने ओरडली अन चाळ जमा झाली सारी
पोरे रडली, नवरा भेदरला,  देह तिचा हेलपाटला

आज तिचा नवरा कैद्याचे जीवन जगतो एकाकी
आज तिची पोरेही करती उनाडक्या अन चोऱ्याही
आज तिला ना काम जमे ती अपंग आहे डोक्याने
घराघरांना नवी मिळे कामवाली आता हक्काची

आज तिला आठवते सारे, रडते ना, ना हसते ती
घरातल्या भिंती अन छप्पर बघता बघता हसते ती
नवी पावडर कप्प्यामधली लावत बसते मधेमधे
दुनियेच्या खिचगणतीमध्येही कधीही नसते ती