राईड- भाग १

आठ वाजत आले असावेत. अंधार पडला होता. रस्त्याच्या उजव्या बाजुला असलेल्या गावांमधून येणारा बल्बचा पिवळ्या उजेड, अगदी क्वचितच जाणारी एखादी गावतलीच फटफटी, आणि कानांमधून वाहणारा वाऱ्याचा आवाज… इतकंच काय ते जोडीला. हेल्मेटवर घातलेल्या हेड लॅंपचा सरळ रेषेत पडणारा प्रकाशझोत समोरचा आवश्यक तेवढाच रस्ता स्पष्ट दाखवत होता आणि सायकलचं स्पीडोमीटर आता 42 किलोमीटरचं अंतर दाखवत होतं. 42 किलोमीटर. वार्जे पुलाखालून संध्याकाळी जेव्हा सुरूवात केली तेव्हा साधारण 5-30 वाजले होते. 42 किलोमीटर म्हणजे आठच वाजले असतील. एका मोठ्ठ्या तंद्रीमधून बाहेर येता येता राही चं अंदाज बांधणं चालू होतं. त्या "सातोरी" सदृश अवस्थेमध्ये ती किती वेळ होती माहिती नाही. बहुधा संध्याकाळी सायकलवर टांग टाकल्यानंतर 15 व्या मिनिटालाच तिची ही तंद्री लागली असावी. साधारण 25 किलोमीटर नंतर काही खाण्यासाठी राही, युरी, आणि संदीप थांबले होते, तेव्हाही खरं तर सगळेच कोणत्या ना कोणत्या विचार तंद्रेमध्ये होते. कोणी काहीच बोलत नव्हतं. अगदी ठरल्याप्रमाणे सगळे जण पिकॉक बे नंतरच्या त्या नेहमीच्याच वळणावर थांबले तेव्हा 7 वाजले होते. वरसगाव धरणाच्या पाण्याचा विस्तार आणि समोर दिसणारा गडावरचा टॉवर बघत त्यांनी आपापले एनर्जी बार्स संपवले होते.

युरीच्या कानावरून हेडफोन्स अजुनही निघालेले नव्हते. "म्युझिक के साथ पेडलिंग करनेका ट्रान्स ही कुछ अलग हैं यार...." असं युरीचं म्हणणं. सायकलच्या पहिल्या पेडल पासून ते दिवसाची राईड संपवेपर्यंत त्याला म्युझिक लागतं. त्याच्या आय पॉड मध्ये असलेल्या रॉक म्युझिकचे बिटस पकडत युरी चढ, उतार, फ्लॅट रस्ता, खराब रस्ता, मातीची ढेकळं, पाणी, खडी असं काहीही सायकलरून- म्हणजे त्याच्या "मुस्तांग" वरून- विनासायास पार करतो. तर… म्युझिक मुळे युरी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता.

"सारखं सारखं थांबायला नको राव! एकदा थांबलं, की कॅमेरा काढावा लागतो. कॅमेरा काढला की मग फोटो काढावे लागतात. फोटो काढायचे ठरवले तर ते चांगलेच काढावे लागतात. आणि चांगले फोटे काढायचे असतील, तर वेळ द्यावा लागतो. त्यामुळे सारखं सारखं थांबायला नको राव!" इति संदीपचं मत. 25 किलोमीटर नंतरच्या त्या छोट्याशा ब्रेकदरम्यान सुद्धा  "बघा, आता तुमच्यामुळे मला कॅमेरा काढून फोटो काढावे लागतील"  अशा आविर्भावामध्ये सुरूवात करून संदीप कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये घुसला होता. त्यामुळे संदीपही काही बोलण्याचा प्रश्न नव्हता.
भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा… अशी सह्याद्रीच्या अपार प्रेमात असलेली राही कात्रज ते सिंहगड च्या डोंगर रांगा न्याहाळत होती. त्यामुळे राही देखिल काही बोलण्याचा प्रश्न नव्हता.

वळणावर पहुडलेल्या या तिघांच्या तीन सायकल्स, म्युझिकच्या तालात भान हरपलेल्या युरीची अंधारात दिसणारी एक रेषाकृती. त्याची पाठीवर रुळणारी लांब वेणी आणि गडाकडे बघत उभी असलेली पाठमोरी राही... या सर्वांना कॅमेऱ्यातून टिपण्यात संदीप गर्क असतानाच, एनर्जी बार संपवून युरी राहीजवळ गेला. तिच्या पाठीवरच्या सॅकमधून, नेहमीच्याच कप्प्यात ठेवलेलं मॉईश्चरायझर काढून त्यानं चेहऱ्यावर, हातावर फासलं, तेव्हा त्या वेळच्या संधीप्रकाशासारखंच गोड हसू राही आणि संदीपच्या चेहऱ्यावर उमटलं.

एकमेकांना पुरेपूर ओळखल्यानंतर निःशब्दतेमध्ये देखिल येणारा एक कंफर्ट या तीन रायडर दोस्तांमध्ये उतरला होता. धरणाच्या पाण्यावर चंद्राचा प्रकाश पसरत होता. अष्टमीची रात्र होती. वैशाखातली अष्टमी. वैशाख वणवा दिवसभरात अंगाची काहिली करत असला, तरी वैशाखातली संध्याकाळ कायमच सुखावह असते. खास करून शहरापासून लांब, पाण्याच्या काठा-काठाने जाणाऱ्या अशा रस्त्यावर. चंद्राचा प्रकाश असा लख्ख असतानाच बोट-क्लब ला पोचायचं होतं. म्हणून सगळे निघाले. तेव्हापासून बहुधा पुन्हा एकदा राहीची न भंगलेली "सातोरी" सुरू झाली होती पण अचानक सायकलच्या बॉटल होल्डर मधून तिची पाण्याची बाटली खाली पडल्यामुळे ती भानावर आली. सायकलच्या स्पीडोमीटर कडे तिनं तेव्हा बघितलं होतं. अजून 7-8 किलोमीटर फक्त. युरी केव्हाच बोट क्लबला पोचला असेल आणि सरळ जाऊन जमीनीवर आडवा झाला असेल... आकाशाकडे बघत. संदीप मगाशीच्या त्या वळणावरून पुढे तरी निघाला असेल की नाही कोण जाणे. वारा अंगावर घेत राही पण थोड्याच वेळात क्लबवर पोचली आणि तडक जाऊन युरीच्या बाजुलाच आडवी झाली.

"जेवणार ना रे पोरांनो. का भजी आणू आधी?"  स्वामीने विचारलं खरं पण त्याला उत्तर माहिती होतं. कोणीच काहीही उत्तर नाही दिलं, तरी स्वामीच्या पोऱ्याने एक कांदा भजी आणि एक बटाटा भजीची प्लेट आणून ठेवली समोर. या पोऱ्याच्या लेखी ही तिघं मुलं म्हणजे लहानपणी डोक्यावर पडलेली पोरं होती. इतक्या लांबून, शहरातून केव्हाही.... अगदी वेळी अवेळी, ऊन, वारा, पाऊस काहीही असलं तरी, सायकलवर इकडे येण्यात या पोरांना काय सुख मिळतं? एक दिवस त्याने संदीप ला हा प्रश्न विचारलाच,

"कशाला येता भाऊ तुम्ही इकडं?" त्यावर संदीप थंडपणे म्हणाला होता, "झोपयला". आता या उत्तरावर काय प्रतिक्रिया द्यायची हे न कळल्यामुळे डोकं खाजवत हा पोऱ्या बापडा जेवण घेऊन आला होता. एकदा जेवणाची ऑर्डर दिल्यावर सुद्धा, "दादा, अजून लोक येणार आहेत का? हे एवढं तुमच्यासाठी लई जास्त होईल" असा प्रश्न त्याने केल्यावर युरी म्हणाला होता, "हमारे एक एक के पेट में चार चार लोग खाते है. तू इतकं घेऊन ये. और लगा तो बोलेंगे" या असल्या संवादांमुळेच या मुलांच्या नादाला न लागण्याचा विडा बहुधा ह्या पोऱ्याने उचलला होता. आपला मालक सुद्धा या पोरांचे इतके लाड का करतो, बाकी कोणाला नाही पण फक्त याच पोरांना धरणाच्या पाण्यात पोहायला का देतो. यांच्याकडूनच पैसे कमी का घेतो, ही पोरं अगदी मोजकंच बोलतात, तरीही त्यांच्याशी इतकं प्रेमाने का बोलतो... असे अनेक प्रश्न पोऱ्याच्या मनात नक्की असणार. पण ते त्याने कधीच कोणाला विचारले नाहीत.

संदीप अर्धा तासात आलाच. अपेक्षेनुसार त्याला मरणाची भूक लागली होती आणि भरपूर जेवायचं होतं. एक टोपली भरून भाकरी, एका छोट्या पातेल्यामध्ये झुणका, एका वाडग्यामध्ये खर्डा, आणि भरपूर कांदा असं जेवण समोर दिसल्यावर युरी आणि राहीची वाट न बघताच संदीप जेवणावर तुटून पडला.

..... जेवण झालं, तेव्हा साडेनऊ झाले होते. स्वामीचीही आवरा-आवर झाली होती. त्याच्याच शेडमध्ये सायकली ठेवून, आपापल्या सॅक्स घेऊन पोरांनी मोर्चा नेहमीच्याच होडीकडे वळवला. बोट-क्लबच्या दुसऱ्या टोकाला एक होडी कित्येक महिने बंद नांगरून पडलेली होती. ही होडी म्हणजे यांची ठरलेली कॅंपिंगची जागा होती. पटापट सॅक्स होडीमध्ये टाकून, तिघंही आत जाऊन छानशी सोयीस्कर जागा बघून स्थिर झाले. होडीच्या काठावर पाण्याकडे तोंड करून राही पाय हलवत बसून राहिली. युरी मध्यभागीच पाय पसरून सॅकला टेकला आणि संदीप जवळच कॅमेरा काढून ठेवून नुसताच मांडी घालून बसून राहिला. पानशेत धरणाच्या शांत पाण्यामध्ये रात्रीच्या वाऱ्यामुळे उठणाऱ्या लाटा काठाला येऊन आपटत होत्या. त्याचा एक रिदमिक आवाज येत होता. अष्टमीच्या चंद्राचा प्रकाश होडीभर पसरला होता. अंधारातही आता सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या.

"अरे हेड लॅंप बंद कर..." अखेर संदीपने शांततेचा भंग केला आणि युरीने त्याचा हेड लॅंप बंद करता करता आळस देत एक जोरदार दुःख व्यक्त केलं. "एक गर्ल फ्रेंड पाहिजे यार, इतक्या सही रॉमॅंटिक जागी आपण येतो. मस्त मूनलाईट मध्ये... आणि तेही हे असे. एकटे एकटे.. श्यॅ!"

"तुम्ही सगळे जण असेच राहणार आहात. सडे! … आयुष्यभर. कोणीही मुलगी मिळणार नाहीये तुम्हाला. भुतासारखे एकटेच कुठे कुठे भटकत असता. कोणत्या मुलीला आवडेल हे असलं सगळं? बरं, रोमॅंटिक जागी येता खरे. पण तिथेही सायकलवरच यायचं अशी अट तुमची. वाट बघा गर्ल फ्रेंड मिळण्याची." राहीने तडक मागे वळत सांगितलं.

"वाह वाह... काय पण मैत्रीण आहे. चांगले आशिर्वाद देते आहेस. And look who is saying! आणि तुझी तरी काय वेगळी कथा आहे  गं राही. तुझ्यात तरी काय मुलीसारखं आहे. तुला तरी कोण मिळणार आहे... बॉय फ्रेंड? हा हा हा हा... आम्ही तर तू मुलगी आहेस, हे केव्हाच विसरून गेलो आहे. "  युरीच्या या बोलण्यावर युरी आणि संदीप दोघेही मनापासून टाळी देऊन हसले. आणि संदीपने गायला सुरूवात केली.. "राही मनवा दुख की चिंता क्यू सताती है... दुःख तो अपना साथी है…."   त्यांच्या त्या वृंदगानावर राही पण मनापासून हसली.
"आहे खरं असं. पण काय करणार? आतून जो कॉल येतो, तसंच करते. आतला कॉलच जर... "

"श्यॅ.. ही काय कॉल कॉल करत बसली आहे. मला नेचर्स कॉल आला ना त्यामुळे!.... आलोच मी" असं म्हणून संदीप पळाला.
पुन्हा एकदा मोठ्ठा हशा झाला. भोवतालच्या शांततेमध्ये आवाज फक्त या तिघांचाच. दूर भालवडीच्या आसपासच्या कोणlत्या तरी गावामधून गाण्यांचा आवाज ऐकू येत होता. युरी आकाशात तारे बघण्यात गर्क. राहीने मोबाईलवर रेडिओची फ्रिक्वेन्सी पकडली. विविधभारतीवर आपकी फर्माईश लागली होती. अदालत मधलं गाणं सुरू होतं... आहाहा.. गोड आवाज, सही शब्द, सही चाल. राही गाणं एकण्यात मग्न. डोळे मिटून. "जमींसे हमें आसमान पर, बिठाके गिरा तो न दोगे... अगर हम ये पूछे के दिलमें बसा के भूला तो न दोगे."  या गोड गाण्याच्या मध्ये अचानक माऊथ ऑर्गनचा तितकाच गोड आवाज मिसळून गेला, तेव्हा राहीने डोळे उघडून संदीप आल्याची खात्री करून घेतली. साडे अकरा पर्यंतचा वेळ असाच गेला. विविधभारती सोबत. त्यानंतर पुन्हा एकदा नीरव शांतता. कोणीतरी लांबून पाण्यात दगड टाकल्याचा भास होत होता सारखा. पण आसपास तरी कोणीच दिसत नव्हतं. याचा अर्थ आपल्याच सारखं अजूनही कोणी जागं आहे वाटतं. त्या अजनबी माणसाला उद्देशून "हॅलो दोस्त"  असं युरी ओरडला,   त्यानंतर पाण्यावर येणाऱ्या दगडांचा आवाज बराच वेळ बंद होता.