राईड- भाग २

"ओय... हम लोग कभी टेंट डालके सोते तो है नही. मग आपण कायम राईडला येताना टेंट कशाला आणतो बरोबर? उगीच ओझं."

सॅकमधून स्लीपिंग बाहेर काढता काढता राहीने विचारलं. तेवढ्यात....

"चल.. "

"कुठे?"

"चल गं"

"अरे हो. पण..."

राहीच्या प्रश्नाला न जुमानता संदीपने तिला घेऊन होडीतून खाली उडी टाकली. संदीपच्या मनात नेमकं काय आहे, हे न सांगताही युरीला कळलं असावं. सर्वांच्या सॅक्स आणि सामान गोळा करून तोही जोरजोरात हसत त्यांच्या मागे धावला. अगदी पाण्याच्या काठाला असणाऱ्या एका खडकाळ मोकळ्या जागेत धावत धावत येऊन संदीप राहीला घेऊन थांबला. त्यांच्या मागोमाग युरीही धापा टाकत आला आणि त्याने सगळं सामान खाली आदळलं.

"अरे काय चाललं आहे हे…" राही

"टेंट लावणं चाललं आहे." - संदीप

"अरे पण का. इतके चांगले होडीत होतो ना आपण…."- राही

"नाही. आता टेंट लावायचाच." - संदीप

"इम्पॉसिबल आहात तुम्हा लोक..." - राही

गेल्या वर्षी मनाली-लेह सायकल राईडच्या दरम्यान घेतलेला नवा कोरा टेंट संदीपने आणला होता. त्याचं बहुधा आज उद्घाटन होणार होतं. टेंट कव्हरमधून बाहेर काढताना तिघांनीही टाळ्या वाजवल्या. आणि तिघंही टेंट लावण्यात गुंतले.

"हे असंच लाईफ असायला हवं यार. पाठीवर टेंट घेऊन फिरायचं. जिथे झोपावंसं वाटेल, तिथे टेंट लावून झोपायचं. कशाला पाहिजे ते घर बांधणं, घर घेण्यासाठी काम करणं. As if  आपल्या आयुष्यातलं सर्वोच्च ध्येच घर बांधणं हेच आहे."  युरी अंतर्मुख होण्याच्या वाटेवर होता.

"नाउ लुक हू इज सेइंग…. वाह रे वाह... मगाशी हेच महाशय गर्ल फ्रेंड बद्दल बोलत होते ना. मग गर्ल फ्रेंड ला ठेवणार कुठे? टेंट मध्ये?" - राही

"का? काय हरकत आहे?" - युरी

"नाही आमची हरकत काही नाही. तुलाच कोणीतरी बंजारन किंवा सपेरन शोधावी लागेल. येईल मग ती तिच्याकडचे सगळे साप, विंचू टोपलीत घेऊन, टेंटमध्ये झोपायला." राही डोळे मिचकावात म्हणाली.
यावर एक मोठ्ठा हशा झाला.

"... आपण असेच राहाणार रे! मनानिरुद्ध पैसे कमवत राहाणार. पैसे चांगले मिळताहेत,   परवडतं आहे,   म्हणून कार खरेदी करणार. आपली मुलं मार्गी लागावीत या आई-वडिलांच्या इच्छेखातर लग्नही करणार... आणि काय हरकत आहे. एका अर्थानं विचार केला तर..." संदीप थोडा समजुतीने काही म्हणू पाहात होता.

"अरे, तू तर मला फारच घाबरवतो आहेस. हे तू बोलतो आहेस ते फार भयानक आहे. मला नाही असं करायचं."- युरी

"मग काय करायचंय, तुला?"- संदीप

"खरं सांगायचं,   तर मला शेतजमीन विकत घ्यायची आहे. मस्त शेती करायची आहे…."

"येस्स्स्स.... अगदी मनातलं बोललास." त्याचं वाक्य अर्धवट तोडत उत्साहात राही सुरू झाली. "मला पण फार जास्त इच्छा आहे. शेती करायची. ऑर्गॅनिक फार्मिंग करायचंय मला. आणि मग माझ्या फार्म मध्ये पिकणारी फळं आणि भाज्या विकणारी दुकानांची एक मोठ्ठी चेन असेल... राही’ज फार्मफ्रेश... एकदम अस्सल कसदार माल."

"वाह.. सही आहे. हिचं सगळं बिझनेस मॉडेल तयार आहे."

हा सगळा संवाद चालू असतानाच जवळ जवळ 3 वेळा टेंट उभारता उभारता पुन्हा पाडला गेला होता आणि पुन्हा नव्याने सुरुवात झाली होती. कारण कोणाला कशाचीच घाई नव्हती. कुठे जायचं नव्हतं. काहीही गाठायचं नव्हतं. सकाळ पर्यंत टेंटच उभारत बसलो आणि मग सकाळ झाली म्हणून टेंट पाडून, गुंडाळून निघून गेलो... असं झालं असतं, तरी कोणाला त्याची पर्वा नव्हती.

"जोक्स अपार्ट… पण मला खरंच मनापासून शेती करायची इच्छा आहे." - युरीने पुन्हा एकदा मूळ विषयाला हात घातला.

"अरे हो. इच्छा आहे, हे मान्य. पण आजकाल शेतजमीन घेणं सुद्धा इतकं सोपं आहे का. आणि समजा तू घेतलीस, तरी त्यामधून उत्पन्न यायला किती वेळ लागेल. तोवर तरी तुला काम करावंच लागेल ना. आणि आत्ता तुला मिळताहेत, तसे महिन्याला 50 हजार कोणी हातात आणून नाही देणार तिकडे. खरा खरा घाम गाळावा लागेल." - संदीपने बहुधा आज समजुतदारपणे वागायचं ठरवलं होतं.
"अरे मग गाळू की घाम... मला असं कावळा-चिमणी चं आयुष्य नाही जगायचं यार..." युरी खरंच मनापासून बोलत होता.

"अरे वाह रे वाह... बघा हो बघा आमचे सावरकर! यांनादेखिल कावळा-चिमणीचा संसार नाही करायचा."---राही.

"अरे आज सकाळचीच गोष्ट. बाबांबरोबर मोठ्ठं आर्ग्युमेंट झालं माझं. माझ्या बॅक अकाऊंटचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी आणि बॅलन्स बघून ओरडायला लागले मला. इतके पैसे कमावतोस. कुठे उडवतोस. सेव्हिंग्ज कुठे आहेत तुझी. आता काय सांगायचं त्यांना... घर घेतलं नवीन. मोठ्ठं. घर घ्यावं हाही त्यांचाच हट्ट. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक चांगली असते म्हणून. त्या घराच्या हफ्त्यामध्ये आणि कारच्या हफ्त्यांमध्येच माझे 50 हजार रुपये जातात रे...." संदीपने आपली गोष्ट सुरू केली

"गरजा वाढवून ठेवल्या आहेत रे आपण आपल्या आणि आता त्याचं व्हिशस सर्कल झालं आहे. गरजा जास्त म्हणून त्या भागवण्यासाठी पैसे कमवा. आणि पैसे जितके जास्त मिळतात, तितक्या गरजा वाढतात. का वाढतात, केव्हा वाढतात काही कळतच नाही…." राही.

"बरं... आपल्या सर्वांचं मी आणि माझे जीवन यावरचं आपापलं प्रवचन झालं असेल, तर आपण आता दुसरं काही बोलूयात का…"  स्वतःच विषयाला सुरूवात करून पुन्हा स्वतःच त्यावर पूर्णविराम देण्याच्या नेहमीच्या सवयीनुसार युरीनं विषय बदलला.

ओके. एक काम करुयात का आपण? टेंट तर आता एकडम मस्त सेट झाला आहे. आपण बाजुच्या रस्त्याने जरा भटकून येऊयात का?", संदीपने या मांडलेल्या प्रस्तावाला सर्वांचंच एकमुखी अनुमोदन मिळालं.

"हो चालेल. गेल्या वेळी आलो होतो,   तेव्हा रस्त्याचं काम सुरू होतं", राही आधीची राईड आठवत म्हणाली.

"हो आणि तू त्या रस्त्यावरून डाऊन हिल जाताना फारच सही पडली होतीस.. जबरदस्त आपटली होतीस... हा हा हा.. फारच हसलो होतो आपण सगळे तेव्हा" …. आत्ताही त्या आठवणीने युरीला हसू आवरत नव्हतं.

पण राही मात्र अजुनही गंभीरच होती. त्याच गांभीर्यात ती म्हणाली, "हो माहितीये. कशाला आठवण करून देतोस. आधीच मला डाऊनहिलची आणि वेगाची भीती वाटते. मला तर गाडी चालवतानासुद्धा स्लो लेनच आवडते. आणि म्हणूनच सायकल बरी वाटते. आपल्या आयुष्याचा वेगही सायकलइतकाच असायला हवा ना... आणि सगळं एकदम सायकल शिकण्याइतकं सोपं असावं. पुढे जाण्यासाठी जे काही कष्ट घ्यायचे, ते सगळे मॅन्युअल, मनुष्यबळावर आधारित, म्हणजे आपल्या स्वतःच्या ताकदीवर अवलंबून असतील. जितकी स्वतःची ताकद, तितका वेग. उगीचच गिअर्स, क्लच, आणि इंजिनच्या मदतीने स्वतःचा नसलेला वेग कशाला वाढवायचा. हे अनैसर्गिक नाही का... "

"अरे यार... ही मुलगी ना. हिला स्वामीने मगाशी जेवणातून काही दिलं होतं काय रे? अरे किती फंडे झाडते आहे ही..." वैतागत युरी म्हणाला.

"नाही रे.. बरोबर बोलतीये ते. खरं तर परफेक्ट. अगदी आपल्याला हव्या तशा लाईफबद्दल बोलते आहे..."
संदीपच्या या बोलण्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून युरी म्हणाला, "असो... तर आपण काहीतरी, भटकंतीबद्दल बोलत होतो. जायचं ना. मला बघायचं आहे, की पक्का रस्ता कुठपर्यंत झाला आहे. चला मग."

रात्रीचे दिड वाजत आले होते. पण कोणाच्याच डोळ्यांवर झोपेची झाक नव्हती. सॅक्स आणि बाकीचं सामान टेंटमध्ये टाकून, टेंट लॉक करून हेड लॅंप्स घेऊन सर्वांचा मोर्चा आता गावाच्या बाजुने वळला. तशी हेड लॅंप्सची गरज नव्हती. कारण बख्खळ उजेड होता. आणि रस्ताही आता पक्का झाला होता. तंबू ठोकता ठोकता झालेल्या संवादामुळे खरं तर सर्वांनाच अंतर्मुख केलं होतं. एकत्र चालत असूनही एकटे-एकटे असे ते कितीतरी वेळ चालत राहिले. प्रत्येकाच्या पुढे पडलेला प्रकाशझोत आणि पायातल्या बुटांचा रस्त्यावरून चालताना होणारा सप-सप आवाज याच्याबरोबर चालत राहिले. साधारण सव्वा दोनच्या सुमारास कुठून तरी कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज आला. संदीप पुढे होता. एका वळणावरून तो मागे फिरला,   तसे समजुतीने युरी आणि राही देखिल मागच्या मागेच वळले. तंबूकडे परतले,   तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते. थोडी थोडी झोप जाणवत होती. सकाळी उठून नाश्ता करून पुन्हा सायकलवरून परतायचं होतं,   त्यामुळे थोडीशी झोप आवश्यकही होती. तंबूजवळ आल्यावर,   तंबूत न झोपता बाहेरच झोपायची तयारी राहीने चालू केली आणि तिथेच शेजारी थोडी सपाट जागा बघून ती 5 मिनिटात झोपी गेली सुद्धा. साधारण चार वाजता,   तिला जाग आली तेव्हा तिच्या बाजुलाच युरी आणि संदीपसुद्धा तंबूच्या बाहेरच झोपलेले तिला दिसले. इतक्या कष्टानं उभा केलेला तंबू तसाच बाजुला राहिला होता. जगावेगळ्या या मित्रांकडे बघून तिला मनापासून हसू आलं. नकळतपणे तिचा हात संदीपच्या कॅमेऱ्याकडे गेला आणि तिने त्या पहाटेच्या प्रकाशतला त्या झोपलेल्या दोस्तांचा एक फ्रेश फोटो काढला. निर्धास्तपणे उघड्या आकाशाखाली डोळे मिटून झोपलेल्या आपल्या या जीवा-भावाच्या मित्रांकडे बघून तिचे डोळे केव्हा आणि का ओले झाले, तिचं तिलाही नाही कळलं. पण अगदी पोटाच्या आतून त्या मित्रांसाठी,   त्यांना हव्या तशा आयुष्याचं मागणं तिनं आकाशाकडे बघून कोणाकडे तरी मागितलं.