शाश्वत

पाऊस पडतो असा
अन्‌ विजा कडाडून येतात
वाटतं हात घट्ट पकडावा तुझा,
एवढूसं ते मनगट, पण केवढं आश्वासन त्यात
नाजूकसं ब्रेसलेट ते शोभतंही त्यावर छान

गरम गरम कणीस खाताना
तुझ्या ओठावर राहीलेला तो दाणा...
म्हटलं नशीब त्याचं
हवाय कशाला दरवेळेस
माझ्या ओठांचा जहरी ससाणा

उसणार्‍या लाटा अन्‌ तू ही तितकीच खूश
हिंदकळणार्‍या मनाला माझ्या सापडेल का गं किनारा
माझ्या बोटांत बोटं तुझी विणल्यासारखी छान
हिंदकळणारं मन शांत होत होत डोळ्यात उतरलंय पार

रोंरावू दे वारा कितीही
गर्जू दे समुद्र कितीही
गडगडले जरी काळे ढग
तरी,
मनगटातील आश्वासन
कणसानं खारावलेले ओठ
आणि विणल्यासारखी बोटं
असतील अशीच
शाश्वत.