शौर्य २

"जा रे अभ्या, १२ वाजले!!! जा मोजून ये बॉडीज!!!! "

"जातो रे रीत्या!!! कॉफी घेऊ दे! "

"मी पण येऊ का रे सोबत, म्हणजे बेशुद्ध पडला तर उचलून आणायला!!! "

"खी खी खी!!! "

"गपे, सम्या तुझ्या वेळेस स्ट्रेचरच घेऊन येतो!!! "

"जा रे अभ्या, तू जाऊन ये पटकन. "

"ओके. मी तसाच राउंड कंटिन्यू करतो आणि काउंट फोनवरून सांगतो!!! "

"ओके! "

"ओके अँड ऑल दी बेस्ट!!! "

"खी खी खी!!! "

========================================================

"हॅलो!! "

"बोल रे अभ्या!! "

"रीत्या, सात आहेत रे!! सगळ्या डाव्या बाजूला आहेत, एका ओळीत. "

"ओके बॉस!! "

"मी जातो राउंडला!!! बाय!! "

"बरं.. बाय!! "

"चल रे सम्या, मी पण जातो ७ फुलं घेऊन. तू ये गोळा करायला नंतर. मी तसाच जातो पेशंट बघायला. "

"तुझं झालं की फोन कर!! "

"अरे बॅटरी डाऊन आहे आहे. तूच ये १० मिनिटा नंतर. "

"बरं. आणि फुलं? "

"ही काय!, निशिगंधाची! "

"कुठून आणली? "

"रिसेप्शन वरचा बुके!!! चल बाय!! "

"बाय!! "

==================================================

रीतेशने दरवाजाच्या हॅंडलला हात लावला. झालेल्या गप्पांमुळे नाही म्हटलं तरी भीती वाटत होती. आता पर्यंत कॉलेजमध्ये भरपूर मुडदे त्याने फाडले होते. पण एकट्याने असं मॉर्चूरीत जायची त्याची पहिलीच वेळ. रखवालदाराचा गूढ मृत्यू आणि झालेल्या गप्पा यांचा चांगलाच परिणाम झाला होता. आतल्या थंड वातावरणात सुद्धा त्याला घाम फुटला.

त्याने डावीकडे नजर टाकली तर त्याला बॉडीज दिसल्या. म्हणजे अभ्या खरंच आला होता. त्याच्या सारखा पेद्रया येऊन जातो तर आपण कशाला घाबरावं. त्याला थोडा विश्वास आला. खिशातून त्याने फुलं काढली. पाहिल्या बॉडीपासून त्याने सुरुवात केली. देवाचं नावं घेत त्याने प्रत्येकाच्या पायाशी एक एक फुल ठेवले. सगळी फुलं संपली पण एक बॉडी तरी उरलीच होती. त्याने खिसा चेक केला. खिशात एक सुद्धा फुल नव्हतं.

त्याने परत सगळ्या बॉडीज मोजल्या. १..२..३..४..५..६..७..८. अरे आठ बॉडीज आहेत. म्हणजे अभ्याच्या मोजण्यात चूक झाली. जाऊदे सम्याला सांगू की आठ बॉडीज होत्या पण माझ्याकडे फुलं फक्त सात होती. तो वळला तितक्यात त्याला काहीतरी हालचाल जाणवली.

"रीऽऽऽतेऽऽऽशऽऽऽ....."

"रीऽऽऽतेऽऽऽशऽऽऽ........... "

"माझ्यासाठी तू फुल नाही आणलंस??????????? "

रीतेशच्या छातीत जोरदार कळ आली आणि तो तिथेच कोसळला.....

==================================================

अभयने मॉर्चूरीचं दार उघडताना मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. आत आला. सगळ्या बॉडीज डाव्या हाताला होत्या. उजवी बाजू रिकामीच होती. थोडासा त्याला धीर आला. त्याने मोजायला सुरुवात केली. १..२..३..४..५..६..७. त्याने परत मोजून खात्री केली. मग त्याने तिथूनच रीतेशला फोन लावला.

तो निघाला तेव्हढ्यात त्याच्या मनात एक विचार आला. जर अजून ५ मिनिटे थांबलो तर रीतेश येईल. त्याची थोडी गंमत केली तर???

तो सातव्या बॉडीच्या शेजारी आठव्या बेडवर डोक्यावर पांढरी चादर घेऊन झोपला. अपेक्षेप्रमाणे ५ मिनिटात रीतेश आलाच. आठवी बॉडी दिसल्यावर त्याचा गोंधळ झाला, पण काहीतरी विचार करून तो वळला. ती वेळ साधत अभयने रीतेशला हाक मारली. पण घाबरून तो खालीच कोसळला. अभय लगेचच उठला. रीतेशला तपासल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याला जोरदार ऍटॅक आला आहे. मदतीसाठी तो फोन लावणार तितक्यात.

"तो मेला आहेऽऽ"

"आता काही फायदा नाहीऽऽऽ"

"आता ह्याच्यासाठी आठवं फुलं कुठून आणणारऽऽऽ???"

==================================================

रीतेश गेल्यावर अर्ध्यातासाने समीर उठला. स्साला अभ्या बॉडीज मोजणार, रीतेश फुलं वाहणार आणि आपण साला मुडद्यावर वाहिलेली फुलं गोळा करणार. शीऽऽ

तो मॉर्चूरीच्या रूम मध्ये पोचला. बाहेर नोटीस बोर्डांवर प्रत्येक बॉडीचं नाव आणि कॉट नंबर दिला होता. एकूण सात होते. बहुतेक गावाजवळ आज झालेल्या अपघातातलेच होते. कोणीच वाचलं नव्हतं. तो आत शिरला. एकेक फुल गोळा करायला सुरुवात केली. सातवं फुल गोळा केल्यावर त्याला अजून ३ बॉडीज असलेल्या दिसल्या. म्हणजे एकूण दहा आहेत तर.. मनातल्या मनात तो म्हणाला. म्हणजे अभ्याने फक्त नोटीस बोर्ड बघितला असावा. कदाचित नाहीतर हॉस्पिटल मधलंच कोणीतरी गेलं असावं. पण अर्ध्यातासात तीन लोकं कशे जातील???

शंका येऊन त्याने कॉटवरचं लेबल वाचलं.

"अभय कुलकर्णी.."

"अभय कुलकर्णी.. "

दोनवेळा वाचलं तरी ते डोक्यात गेलं नाही. एकदम डोक्याला मुंग्या आल्या सारख्या वाटल्या. तसे कुलकर्णी आडनाव कॉमनं आहे. नाम साधर्म्य असू शकेल. चला अभ्याला आता चिडवता येईल भूत म्हणून. पण ह्या नावाचा एक सुद्धा पेशंट हॉस्पिटलामध्ये नव्हता..

तो पुढच्या कॉट जवळ गेला. ९ वी कॉट. नाव वाचलं तर सगळी मॉर्चूरी गोल फिरते आहे असा भास झाला.

"रीतेश परब. "

ह्याट स्साले गंमत करताय.

"ए उठा रे... बस्स झाली गंमत!!! ए रीत्या उठा. उठा रे अभ्या. मानलं तुला. तू शूर... " काहीचं प्रतिसाद न मिळाल्यावर त्याने अभयच्यावरची चादर ओढली. त्याला डोळे सताड उघडे ठेवून झोपलेला अभ्या दिसला. त्याने पटकन श्वास आणि नस चेक केली. त्याचा हात गार पडला होता.

"बाप रे!!! हा खरंच मेला आहे!!! " पटकन त्याने रीतेशची चादर ओढली त्याची पण तिच अवस्था होती.

हे दोघे आणि मग ती १० वी बॉडी कोणाची?? मागे वळून त्याने नाव वाचलं...

"समीर पवार..."

आता त्याला दददरून घाम सुटला. भीतभीत त्याने चादर बाजूला केली.......

कॉटवर त्याच्यासारखेच कपडे घातेलेला आणि त्याच्या सारखाच चेहरा असलेली एक व्यक्ती झोपली होती.

==================================================

ता. ११-जुलै. आज आंबेगाव येथील शवागारात ३ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. प्राथमिक अहवालात तिघांचा मृत्यू हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने झाला असावा असा कयास आहे. पण तिघांना एकाच वेली आणि एकाच ठिकणी एकाच पद्धतीने मृत्यू यावा ह्याची चर्चा आज गावात होती. ह्या घटनेचा संबंध रखवालदाराच्या मृत्यूशी आहे का ह्याचा पण तपास पोलीस करत आहेत.