ती आणि मी

माझ्यात दडलेली  'ती' खोलवर... आत... मनाच्या जंगलात

की मीच आश्रित आहे तिच्या या खेळात?

'ती' मात्र दरवेळेस नव्याने  जुन्या मैत्रिणीसारखी भेटते

आणि भेटीनंतर 'ती'चे सारे 'माझेच' का वाटते?

अनेकदा विचारते "बाई गं.. कोण तू? कुठली? अशी तळ्यात-मळ्यात का खेळतेस माझ्याशी? "

आणि 'ती' मात्र खुशाल न सांगताच निघून जाते!

हायसं वाटतं अनेकदा... 'ती' गेली म्हणून.... 'ती' मात्र दिवसरात्र मागे रेंगाळते विचारांतून

निघते मगं पुन्हा 'ती'ला शोधायला ओळखीच्या खुणांमधून, कधी निर्मनुष्य रस्त्यांमधून

'ती' मात्र शोधूनही कधीच नाही सापडत, पाय ओढत, फरफटत, स्वतःसाठी, 'ती'ला राहते शोधत....

'ती' हरवलीच या निराशेने परतावे तर  सारे माझे, माझ्याशी जुळलेले धागे असतात बहरलेले 'ती'च्या हसण्याने

माझे हसणे लेऊन समोर येते...'ती' .... फक्त माझ्यासाठी परतलेली!