मागणी

आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोऱ्या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वाऱ्याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेने
मागणी* घालायची वाट बघत

===================

* 'मागणी' या मराठमोळ्या बदलासाठी जयंता५२ यांचे विशेष आभार. मूळ कवितेचे शीर्षक 'प्रपोजल्' असे होते आणि

या भिजल्या-थिजल्या कवितेने
मागणी* घालायची वाट बघत

या ओळी

या भिजल्या-थिजल्या कवितेचं
प्रपोजल् व्हायची वाट बघत

अशा होत्या.