कोवळी मुले आत्महत्या का करतात?

दहावी आणि बारावीचे निकाल लागले की रोज पेपरमध्ये मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या यायला सुरुवात होते. १५ ते १८ वर्षांची ही कोवळी मुले इतका टोकाचा निर्णय इतक्या लवकर कसा घेतात? मानवी जीवन खूप सुंदर आहे हे यांना कोणी सांगत नाही का? मला वाटते की या मागे पालकांची मानसिकता आहे. आपले मूल कधीही आणि कोणत्याही क्षेत्रात मागे राहणे हा पालकांचा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला की असे होते. स्वतःचा जीव कोणालाही प्रिय असतोच. तो असा सहज द्यायची हिंम्मत मुलांना कशी होते? लक्षात घ्या. हा निर्णय कधीही एका रात्रीत घेतला जात नाही. दहावी किंवा बारावी या प्रतिष्ठेच्या बनवल्या गेलेल्या परीक्षा आहेत. त्यात नापास होणे म्हणजे काहीतरी आकाश कोसळणे हीच मुलांची समजूत करून दिली जाते. मी एक पालक बघितले आहेत की त्या आईने मुलीला सांगितले की दहावीत चांगले मार्क मिळव आणि आमची लाज राख. यात पालकांची लाज जाण्याएवढे काय घडणार होते? परिणामी मुलांना असेच वाटते की या दोन परीक्षा म्हणजे अग्निदिव्य. वास्तविक आता प्रत्येक ठिकाणी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. तिथे मुलांच्या दहावी किंवा बारावीच्या मार्कांवर काहीही अवलंबून नसते. पण प्रत्येक शहरात कोणते ना कोणते कॉलेज प्रतिष्ठित असतेच. तिथे प्रवेश मिळवणे हे आपल्या पाल्याचे आद्य कर्तव्य आहे अशीच भावना मुलांच्या मनात रुजवली जाते. जणू तिथे प्रवेश मिळाला नाही तर मुलांचा अभ्यासच होणार नसतो. त्यासाठी मुलांच्या मागे आठवी पासून लकडा लावला जातो. ही तीन वर्षे महत्त्वाची असतात. मुलांना आधीच टेन्शन असते. त्यात आणखी भर कशाला घालायची? आपण चांगले मार्क मिळवावे असे प्रत्येकच मुलाला वाटत असते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही, प्रयत्न करूनही मूल पालकांना अपेक्षित मार्क्स नाही मिळवू शकले तरी त्याला समजून घेतले गेले पाहिजे. त्यावेळीच तर मुलाला पालकांच्या सहानुभुतीची खरी गरज असते. पण आता काय होईल या भीतीनेच मुले अर्धमेली होतात. आता आपण जगून काय करणार? आई-वडिलांना तोंड कसे धाखवणार? या नैराश्यापोटीच मुले आततायी निर्णय घ्यायला धजावतात. मला प्रामाणिकपणे वाटते की पालकांनी मुलांना एवढी जाणीव द्यायला हवी की जरी तू आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तरी या घराचे दरवाजे तुला कायम उघडे आहेत. आम्हाला तू हवा आहेस. एकदा सुरक्षिततेची ग्वाही मिळाली की मुलांना पण धीर येईल आणि नवी आव्हाने पेलायला त्यांच्या पंखात बळ येईल. दहावी-बारावीत कमी मार्क्स मिळवणारी मुलेही पुढे नाव काढू शकतात हे पालकांनी आधी आपल्या मनावर ठसवायला हवे आहे. तरच हे आत्महत्यांचे सत्र थांबेल.