केळ्यांचा पाव

  • व्यवस्थित पिकलेली ४ केळी - मिक्सर मधून पल्प काढावा
  • मैदा - ३ वाट्या
  • लोणी - पाऊण वाटी
  • साखर - १ वाटी (किंवा जितके गोड हवे असेल, केळींचा गोडवा ही लक्षात ठेवावा )
  • वेलची पुड - १ चहाचा चमचा
  • खायचा सोडा - १ चहाचा चमचा
  • मीठ - १/२ चहाचा चमचा
  • बदामाचे काप
४५ मिनिटे
चौघाना

१. भट्टी (अवन / ओव्हन ) ३२५ डि.  फॅरनहाईट वर गरम करायला ठेवावी

२. ज्यात पाव करणार आहे त्या भांड्याला थोडासा तुपाचा हात लावून मग त्यावर थोडा मैदा भुरभुरून तो काढून टाकावा आणि भांडे तयारीत ठेवावे.

३. प्रथम लोणीसाखर चांगले एकत्र फेटावे. त्यात मीठ व खायचा सोडा घालून परत फेटावे. जितकं छान फेटले जाईल,  पाव तितका हलका होईल.

४. त्यात केळ्यांचा पल्प आणि वेलची घालावी.

५. मैदा चाळून त्यात वरील मिश्रण ओतावे आणि चांगले एकत्र करावे. मैदा घातलेले मिश्रण घट्टसरच असावे. पळीवाढे नको मात्र अति घट्ट ही नको

६. सर्व मिश्रण तयार ठेवलेल्या भांड्यात ओतून वरून बदामाचे काप पेरावेत.

७. ३२५  डि.  फॅरनहाईट वर पाऊण तास भाजावे. (बेक करावे.) केक प्रमाणे  फार वर फुगून येत नाही, पण रंग मस्त सोनेरी होतो. त्याचे केक प्रमाणे मोठे तुकडे करून अथवा पावाप्रामाणे स्लाईस करून खा.

८. नंतर प्रतिसाद लिहायला विसरू नका  चला मी आता मस्त एक स्लाईस खायला जाते.

पौष्टिक अशी ही स्वीट डिश करायला छान सोपी आहे, स्वादिष्ट लागते. बर्याचदा अति पिकलेली केळी संपवता येतात, अगदी येता जाता तोंडात टाकायला ही काहीतरी होते.

फूड नेटवर्क टी व्ही वर पाहिलेली पण मराठी आवड व चव ध्यानात घेऊन काही फ़ेरफ़ार करून पाहिले आणि ते भलतेच स्वादिष्ट ठरले.