हे न कोणावरी उपकार माझे
पाडले पार मी उपचार माझे
आसवांचा जुना व्यवसाय माझा
पापण्यांशी छुपे व्यवहार माझे
हक्क लाडावले भलतेच काही
केवढे वाढले सरकार माझे!
कायदा व्हायला अवकाश आहे
कायदा पाळती व्यभिचार माझे
मी म्हणालो कधी अपमान त्यांना?
मानले त्यांस मी अधिभार माझे
वाटतो ना असा अवतार मोठा?
मी उभारायचे दरबार माझे
मी मनाशी कसा इतक्यात बोलू?
पाहतो कोणते अधिकार माझे