-->
काही दिवसांपूर्वी हीच कविता आपण कदाचित येथे वाचली असेल.
ती पुन्हा नव्याने रचून पण आशय तोच ठेवून पाठवत आहे.
परत परत तेच तेच, तेच तेच परत परत,
मनामध्ये अविरत, राहते फिरत फिरत.
तीच तीच माणसं, मनात जणू पाळलेली,
असताना, नसताना, बोलतात सतत सतत.
प्रसंग जुने झाले तरीही, आठवणी ओलसर,
शब्द पोचूनी खोलवर, राहतात झुरत झुरत. || १ ||
मनाच्या ह्या भुयारात, दिले घेतलेले शाप,
त्यात किल्मिषांचे रोप, वाढते झुकत झुकत.
हुरुप येता जरा मनात, वर्म उकलते जनात,
अन फुले जगतात, पाकळ्या झडत झडत.
तरि उमेद साठवून, कळ्या पुन्हा उगवतात,
अन मनाच्या अंगणात, रहातात फुलत फुलत. || २ ||
मन कोवळं मन हळवं, भावबंधांत असे भ्रमीत,
साहुनीच त्या उमगे रीत, आवंढे गिळत गिळत.
चुरगळते चादर मुठीत, हिरमुसलेला चंद्र कुशीत,
चांदण्यांइतुक्या रात्रीं, सरतात कण्हत कण्हत.
कधी काढत वाळूत रेशा, कधी बादलीत भोवरे,
वेधतो मनाचे कोपरे, मनानेच खणत खणत. || ३ ||
नाती असतात कशी? गवताची पातीच जशी !
शब्दांच्या पावसात जी, रुजतात सलत सलत.
गवतां फुटती रानफुले, तसा वसंत नात्याचाही,
बहर एकदाच येऊनी, मग जातो विरत विरत.
पण वसंत सरताना, ठेवूनी जातो पाचोळा,
तोच मी करितो गोळा, धीर असतां गळत गळत. | ४ ||
स्नेहबंधांचा अजब शेला, वेगवेगळ्या धाग्यातला,
बोलताना, ऐकताना, मन असतं विणत विणत.
एकीकडे लाविता ठिगळ, दुसरीकडे असते उसवत,
वस्त्र नात्यांचे सांभाळता, मन जातं क्षिणत क्षिणत.
धागा धाग्यात गुंतताना, नाही कोणता नियम,
बेधुंद्पणाच तो कायम, हे वस्त्र असता घडत घडत. || ५ ||
जिंकावं पत्याचा डाव, नि खेळावयास बुद्धिबळ,
याचना करितो देवाजवळ, अभंगात डुलत डुलत.
मोक्ष नाही लोभ द्वेशा, बाळांसंगे पुनरपि उषा,
नि:श्वास शेवटचा येता, मात्र जाती सरत सरत.
सत्य हेच सांगते का? ही लाल ठिणग्यांची चट्चट,
चिता जेव्हा विझत जाते, काळासंगे जळत जळत. || ६ ||
- अनुबंध