ईश्वर

कुणी म्हणाले,
"ईश्वर नसतो"
कुणी म्हणाले,
"ईश्वर असतो"...

कुणी म्हणाले,
"ईश्वर असतो
पण तो सर्वांना
दिसतच नाही;
सर्वांमध्ये
दडून असतो,
पण सर्वांना
गमतच नाही!"

कुणी म्हणाले,
"ईश्वर त्यांना दिसतोसुद्धा!
अन त्यांच्याशी
गप्पागोष्टी करतोसुद्धा! 
सारे त्याला
ठाऊकच असते
इच्छेविण त्याच्या
काहि न घडते"...

सर्वांचे मी ऐकुन घेतो
अन सर्वांना "पटले" म्हणतो...

मनात म्हणतो-
"मी लोकांच्या
वादामध्ये पडू कशाला?
'तो' असला वा
नसला तरिही
त्याच्यासाठी रडू कशाला? "...

माझ्यासाठी 'तो' असल्याने वा नसल्याने
जगणे काही बदलत नाही;
मंदिरात मी गेल्याने वा ना गेल्याने
माझे-त्याचे (वा कोणाचे) बिघडत नाही...

जगातल्या लोकांना असते
वाद घालण्याचीच सवय!
सवयीसाठी, सोयीसाठी
'ईश्वर' हाही एक विषय!...