उजळली मने

जोडणाऱ्या सूत्राचा का फास व्हावा

आकार माझा आकाश व्हावा.

फासुनी रंग झालो निस्संग

तरी सुटेना संग साऱ्यांचा,

             तरंग पाऱ्याचा,

             हा बंध फेऱ्यांचा.

कळे, नकळतेपणे, उगळतो जुने, न होई उणे, वाढते दुणे..१..

अभावाचा भाव इथे शिगोशिग भरलाहे,

कणांनी, झळांनी सारा देह बनलाहे,

सुटे हा पाश, खुले आकाश,

तरी अडकला पंख राव्याचा,

              षंढ बाण्याचा ,

              हा अंत ध्येयाचा.

कळे, नकळतेपणे, उगळतो जुने, न होई उणे, वाढते दुणे.. २..

(चाल)

उरी अमृताचे तळे,

तीरी कर्तव्याचे मळे,

क्षण एक थबकला,

छाटीस बिलगला, गंध चाफ्याचा,

                   पंथ काट्याचा,

                   झाला धुंद गाण्याचा.

सरले जुने, उजळली मने, विसरले जुने, उजळली मने..३..