॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी ३

॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी ३

चारही वेद, अठरा पुराणे, सर्व उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता आणि सद्दर्शने; तसेच जैनागम, त्रिपिटक, गुरूग्रंथसाहेब आणि सज्जनांची वचने ही आमची श्रद्धास्थाने आहेत. म्हणूनच संस्मरणीयही आहेत.

चतुर्वेदाः पुराणानी सर्वोपनिषदस्तथा ।
रामायणं भारतंच गीता सद्दर्शनानी च ॥ ८ ॥

जैनागमास्त्रिपिटका गुरूग्रंथः सतां गिरः ।
एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदी सर्वदा ॥ ९ ॥

पतिव्रतांचा आदर्श ठरल्यामुळे सप्तर्षींसोबत आकाशात चमचमणारी अरुंधती, दत्तात्रेयांनी जिच्यापोटी जन्म घेतला ती महासती अनुसया, प्रत्यक्ष यमाकडूनही पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, पत्नीत्वाचा आदर्श ठरलेली भूमीकन्या जानकी, पतीचा अनादर सहन न झाल्याने पित्याकडील यज्ञात भस्म होणे पत्करणारी दक्ष प्रजापतीची कन्या सती (पार्वती), अलौकिक पतीव्रता द्रौपदी, पतीवरील अन्याय त्याच्या मृत्यूनंतरही राजसभेत वाद करून दूर करणारी सती कण्णगी, जनकसभेत पती याज्ञवल्क्य याजसोबत शास्त्रार्थात भाग घेणारी ब्रह्मवादिनी गार्गी तसेच कृष्णभक्त संत मीराबाई या स्त्रिया आपल्या संस्कृतीतील स्त्रीत्वाच्या आदर्श आहेत.

अरुंधत्यनसूया च सावित्री जानकी सती ।
द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावतीस्तथा ॥ १० ॥

परंतु गढामंडलाच्या राणी दुर्गावतीसारख्या स्त्रिया पराक्रमांचे निकष घडवतात. अशा स्त्रियांच्या शूरतेनेही आमचा इतिहास संपन्न आहे.

विद्युल्लता जशी चमकते घन अंबरात । लढल्या स्त्रियाही पूर्वी भर संगरात ॥
त्यांच्याविना अधुरा, संसार स्मर मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥

महाराणी लक्ष्मीबाई, प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच काकतीय सम्राज्ञी रुद्रमांबा यांच्या कथा आजही आम्हाला स्फुरण देतात. यांच्याचप्रमाणे समाजहितैषी भगिनी निवेदिता व रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी शारदादेवी याही आम्हाला पूजनीय आहेत.

लक्ष्मीरहल्याचन्नम्मा रुद्रमांबा सुविक्रमा ।
निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवता ॥ ११ ॥

मर्यदापुरूषोत्तम राम, ज्याच्या नावाने आपला देश "भारत" म्हणून ओळखला जातो तो भरत, योगेश्वर कृष्ण, प्रतिज्ञेचा गौरव  ज्यांनी आपल्या आचरणाने वाढवला ते पितामह भीष्म, सर्वश्रेष्ठ धर्मपरायण युधिष्ठिर, महान धनुर्धर अर्जुन, बालपणातच अपमृत्यूशी यशस्वी झुंज देणारे महर्षी मार्कंडेय, सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, परमभक्त प्रल्हाद, धर्मोल्लंघनावर मनोवैज्ञानिक उपचार करणारे महर्षी नारद तसेच घोर तपश्चर्या करून अढळपद प्राप्त करून घेणारा बाल ध्रुव हे आमचे वर्तणुकीचे आदर्श आहेत.

श्रीरामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः ।
मार्कंडेयो हरिश्चंद्रः प्रल्हादो नारदो ध्रुवः ॥ १२ ॥

स्वामीनिष्ठेचे चिरंतन प्रतीक रामभक्त हनुमान, आत्मज्ञानी मिथिलानरेश जनक महाराज, "व्यासोच्छिष्ठं जगत् सर्वं" असे ज्यांच्याबाबत म्हटले जाते ते महर्षी व्यास, प्रत्यक्ष श्रीरामाला "योगवासिष्ठ्या"चा उपदेश करणारे गुरूवर्य वसिष्ठ, राजा परीक्षिताला मृत्यूपूर्व सात दिवसांत भागवत कथा कथन करणारे व्यासांचे पुत्र दैत्यगुरू शुक्राचार्य, बळाच्या जोरावर देवलोकावर अधिराज्य करणारा प्रल्हादाचा नातू बळीराजा, उन्मत्त वृत्रासुराच्या निर्दालनासाठी वज्र तयार करण्याकरता ज्यांनी स्वतःच्या अस्थी दिल्या ते दधीची ऋषी, "सुदर्शन चक्र, त्रिशूळ व वज्र" इत्यादी अमोघ शस्त्रांचा निर्माता आद्य स्थपती विश्वकर्मा. ज्याच्या कृषीविकासाच्या धोरणांमुळे ही धरणी एवढी संपन्न झाली की तिला पृथ्वी हे नाव प्राप्त झाले तो पृथू राजा, रामायणकार महर्षी वाल्मिकी तसेच चिरंजीव धनुर्धर परशुराम अशा अनेकानेक महापुरूषांच्या चरीत्रांचा समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे.

हनुमांजनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः ।
दधीचिर्विश्वकर्माणौ पृथुर्वाल्मीकिभार्गवाः ॥ १३ ॥

आपल्या अविरत प्रयत्नांनी ज्याने अवनीतलावर गंगावतरण केले व "प्रयत्नांना" भगीरथ हे विशेषण प्राप्त करून दिले तो राजा भगीरथ, गुरूदक्षिणेच्या स्वरूपात ज्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठाही सहज कापून दिला तो परमशिष्य एकलव्य, आदीपुरूष मनू, चौदा रत्नांतील एक रत्न आणि आयुर्वेदाचे जनक आचार्य धन्वंतरी, शरणागत कबुतरास जीवन देण्यासाठी ससाण्यास स्वतःचे शरीर अर्पण करणारा शिबीराजा तसेच दुष्काळात जनतेला सर्वस्व वाटून टाकणारा राजा रंतिदेव यांची कीर्ती पुराणांमध्ये सांगितलेली आहे. हे सर्व आमचे स्फुर्तीस्त्रोत आहेत.

भगीरथश्चैकलव्योमनुर्धन्वंतरिस्ततथा ।
शिबिश्च रंतिदेवश्च पुराणोद्गीतकीर्तयः ॥ १४ ॥

अज्ञानामुळे भासमान असणाऱ्या जरामरणादी दुःखांवर विचारपूर्वक विजय मिळवण्याची व अहिंसामर्गाने संयमित जगण्याची बुद्धी ज्याराजपुत्र सिद्धार्थाने तपचरणाने मिळवली तो भगवान बुद्ध, जैन विचारधारेचा जनक महावीर, महान् हठयोगी गोरक्षनाथ, "अष्टाध्यायी"सारख्या व्याकरणशास्त्राचा रचयिता पाणिनी, प्रसिद्ध योगसूत्रकार पतंजली, अद्वैतमताचे आद्य पुरस्कर्ते शंकराचार्य, द्वैतवादाचे प्रवक्ते वैष्णव मध्वाचार्य, द्वैत व अद्वैत वादांची सांगड घालणारे निंबार्काचार्य, विशिष्ताद्वैतमताचे प्रतिपादक रामानुजाचार्य तसेच शुद्धाद्वैतमताचे जनक वल्लभचार्य या साऱ्यांनी आम्हाला सद्धर्माची शिकवण दिली.

बुद्धो जिनेंद्रो गोरक्षः पाणिनिश्च पतंजली ।
शंकरो मध्वनिंबार्कौ श्रीरामानुजवल्लभौ ॥ १५ ॥

इसवी सनाच्या १० व्या शतकात जबरीच्या सार्वत्रिक धर्मांतराचे प्रयत्न विफल करणारे झुलेलाल, महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू, तिरुक्कुरलाचे रचयिता तिरुवल्लुवर, शैव आणि वैष्णव संत, कंबरामायणकार रामभक्त कंब तसेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक बसवेश्वर यांनी आमच्या धर्मभावना सन्मार्गी लावल्या.

झुलेलालोऽथ चैतन्यः तिरुवल्लुवरस्तथा ।
नायन्मारालवाराश्च कंबश्च बसवेश्वरः ॥ १६ ॥

धर्मांतरितांना पुन्हा स्वधर्मात प्रवेशाचा मार्ग सुकर करणारे देवलस्मृतीचे रचनाकार देवल, थोर संत रोहिदास, महान् स्पष्टवक्ता संत कबीर, शिख पंथाचे संस्थापक गुरू नानक, "वैष्णव जन तो तेणे कहिये" या सुप्रसिद्ध भजनाचे रचयिता नरसी मेहता, "रामचरितमानसकार" संत तुलसीदास तसेच शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांनी आमची सद् अभिरुची तेवत ठेवली.

देवलो रविदासश्च कबीरो गुरूनानकः ।
नरसिस्तुलसीदासो दशमेशो दृढव्रतः ॥ १७ ॥

आसामात भागवत धर्माचा प्रसार करणारे शंकरदेव यांनी भागवत धर्माचे सार सांगणारा "गुणमाला" ग्रंथ लिहीला. मध्वाचार्य तथा सायणाचार्य यांनी विजयानगरचे साम्राज्य वैभवास नेले. भागवत धर्म महाराष्ट्रात वाढला याचे श्रेय ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांचे आहे. त्याबाबत असे म्हणतात की "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस". शिखांचे चौथे गुरू रामदास तर सर्वश्रुतच आहेत. मात्र "तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई" हा आगळा संदेश आपल्या रामदासस्वामींनी दिलेला आहे. पुरंदरदासांचे वर्णन तर "कर्नाटकाचे तुकाराम" असेच करतात. या सर्वांची शिकवण आम्हाला संयमित सहजीवनाला सामर्थ्याची जोड देण्यास सांगते.

श्रीमत् शंकरदेवश्च बंधू सायणमाधवौ ।
ज्ञानेश्वरस्तुकारामो रामदासः पुरंदरः ॥ १८ ॥

बिरसा मुंडा यांनी दक्षिण बिहार, ओरिसा तसेच मध्यप्रदेशातील विजनवासी जनतेला संघटित करून इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. स्वामी सहजानंदांनी उद्धव संप्रदायाची स्थापना केली. रामानंदांनी लोकाभिमुख धर्माचा प्रचार केला. कबीर, रोहीदास, सेना न्हावी, पद्मावती आदी त्यांचेच शिष्य होत. या सर्व महात्म्यांनी त्यांच्या दैवी गुणसंपदेचा वारसा आम्हाला दिलेला आहे.

बिरसा सहजानंदो रामानंदस्तथा महान् ।
वितरंतू सदैवैते दैवीं सद्गुणसंपदम् ॥ १९ ॥

नाट्यशास्त्राचे आद्याचार्य भरतमुनी, "अभिज्ञान शाकुंतलम्, मेघदूत, रघुवंश" इत्यादी महाकाव्यांचा रचयिता महाकवी कालीदास, बहुविद्याविशारद राजा भोज, होयसाळ शैलीचा प्रख्यात शिल्पशास्त्री जकणाचार्य ज्याने "हळेबिडू, बेलूर, सोमनाथ" इत्यादी मंदिरांचे शिल्प घडवले, "सूरसागर" रचयिता सूरदास, "धनराज पंचरत्न" कर्ता त्यागराज तसेच "सवैय्यां"चा कर्ता रसखान यांनी आमचा इतिहास कलासमृद्ध केलेला आहे.

भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जकणस्तथा ।
सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः ॥ २० ॥

महान चित्रकार राजा रविवर्मा, आधुनिक संगीतशास्त्राचे प्रवर्तक भातखण्डे गुरूजी तसेच ललितकलेचा आश्रयदाता मणिपूरचा राजा भाग्यचंद्र आदी विख्यात कलावंत सदैव स्मरणीय आहेत.

रविवर्मा भातखण्डे भाग्यश्चंद्रः स भूपतिः ।
कलावंतश्च विख्याताः स्मरणिया नितंतरम् ॥ २१ ॥