स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)

चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपून मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती. वातावरण नेहमीचं ऑगस्टचं... श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह.
वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. जागोजागी दिसणारे लहान-मोठे, डौलानं फडकणारे तिरंगी ध्वज.

अशाच वेळी जाताना मनोबाला दिसलं कुणीसं रस्त्याच्या कडेला असलेल्या डेरेदार वृक्षाखाली बसलेलं....
एक शांतचित्त प्रसन्नमुख दाढीधारी शुभ्र व्यक्तिमत्त्व. मनोबा सहजच तिकडं ओढला गेला.

त्यानं मनोबाला गंभीर, पण प्रसन्न आवाजात विचारलं "कुठं चाललात मनोबा? कुठून येताय? "
"झेंडावंदनाहून येतोय. " लिमलेटची गोळी शेंबुडलेल्या हातानंच तोंडात टाकत मनोबा पुढं म्हणाला:-
"आज भारताचा पन्नासावा स्वातंत्र्यदिन. "

"म्हणजे नक्की काय? " नीट मनोबाकडं निरखत योग्यानं विचारलं.
"म्हणजे.. म्हणजे बरोबर पन्नास वर्षापूर्वी....
१)ह्याच दिवशी परकीय राज्यकर्ते देश सोडून गेले. आणि-----
२)देश स्वतंत्र झाला. " मनोबानं फटकन आत्ताच ऐकलेल्या भाषणातलं उत्तर दिलं.

"ह्यातलं पहिलं पूर्णं अचूक. पण........ "--योगी
"पण काय? "-- डाव्या बाहीनं नाक पुसत, गोड शेंबूड गिळत निरागस पोर विचारतं झालं.
"दुसरं तितकसं बरोबर नाही. "-- मोठ्ठे डोळे आकाशात लावत, आपल्याच तंद्रीत योगी बोलला.

"म्हणजे? " मनोबा.
योगी काहीच न बोलता चालू लागला. आणि त्याच्या मागोमाग मनोबा!

थोडंसं पुढं जाताच एक मोकळी जागा, छोटंसं मैदान लागलं. एक मोकळा बैल तिथं फिरत होता.
"अरेच्चा! हा मोकळा असूनही गोल गोल का फिरतोय? "--चकित मनोबा.
"हा पूर्वी पासूनच घाण्याला जुंपला होता. नुकताच सोडवून कुणीतरी आणलाय इथं.
सध्या त्याच्यावरची साखळी, दोरी घाणा ही बाह्य बंधनं काढून टाकण्यात आली आहेत. "
"आणि म्हणूनच हा स्वतंत्र झालाय... बरोब्बर?? "खूश होत मनोबा वदला.
"तुच ठरव ते. " गंभीर आवाजात बोलत योगी हळुहळू लुप्त झाला.
मनोबा दिङ मूढ होत (मट्ठ बैलाबद्दल कुतूहलानं विचार करत)लुप्त होणाऱ्या तेजाकडं बघू लागला....