किती झाले तरी भासे कमी झाले
तुझेही जीवना आता अती झाले
तुझा उल्लेख केला भेटलेल्यांनी
नवल म्हणजे निराळे विषयही झाले
किती बाहेरचा झालो घरामध्ये
अता ऐकून घेतो जे घरी झाले
उगाचच जागरण झाले तुझे माझे
तिथे तू आणि मी येथे तरी झाले
जगापाशीच होते चांगले पैसे
खिशामध्ये जमवले, दगदगी झाले
मलाही चालते आता 'तुझे नसणे'
तुझेही केस थोडे रेशमी झाले
करावा पंचनामा विश्व-जन्माचा
कुणी केले, कसे केले, कधी झाले?
तुला भेटून हा परिणाम झाला की
मला जे भेटले ते ते कवी झाले
मनावर पायधुळ झाडून जाताना
तुलाही वाटले ना, 'एकटी झाले'?
मुखवटा माणसाचा घातल्यानंतर
किती गुणगान माझे या जगी झाले
कुणी इतिहास लिहिला काळजीने हा?
म्हणे की 'बेफिकिर' नाही कुणी झाले