न्हावी

नियमितपणे ज्या व्यावसायिकांशी आपला संबंध येतो अशांमध्ये एक म्हणजे न्हावी. महीन्या दोन महीन्यात आरशात आपलं रूप बघत भांग पाडतांना लक्षात येतं की केसं फार वाढलेले आहेत. मग ते कापायला कधी जायचं याचं मनातल्या मनात प्लॅनिंग होतं. बहूतेकवेळा वार रविवारच ठरतो. रविवारची न्हाव्याकडे गर्दी ठरलेली. आपण आपलं गर्दी टाळावी म्हणून पहाटे आठची साखरझोप सोडून न्हाव्याच्या दुकानाची वाट धरतो. पण अंदाज चुकवून आपल्या आधीच २-३ लोकं नंबर लावून असतात. तसं गल्लीत अजून चार दुकाने असतात. पण सगळी दुकाने गिऱ्हाईकांनी भरलेली असतात. न्हावी बदलायचा अजून एक तोटा असा की त्याला आपण कशी हजामत हवी ते सांगितलं तरी ते समजत नसतं. नवीन ( म्हणजे आपल्या केसांसाठी) न्हाव्याला आपण सांगावं की मध्यम प्रमाणात केसं काप तर तो फक्त केसांचे शेंडे कापतो. त्याला अजून बारीक कर म्हंटलं तर तो जास्तच बारीक कापतो. त्यापेक्षा आपल्या नेहमीच्या न्हाव्याकडे जावं आणि डोकं त्याच्या हवाली करून शांतचित्ताने डोळे मिटून बसून राहावं.

नेहमीच्या न्हाव्याक्डे जाण्यात अजून एक फायदा म्हणजे आजुबाजूच्या 'खबरी' समजतात. न्हावी लोकांना स्थानिक राजकारणात प्रचंड रस असतो. ह्यावेळेस कोणाची हवा आहे, कोण येणार, कोणी किती पैसे वाटले अशी सगळी ईत्थंभूत माहीती त्यांना असते. न्हावी लोकांच्या प्रचंड जनसंपर्काचा राजकारणी लोक पण चांगला उपयोग करून घेत असावे. राजकारणी आणि न्हावी लहांपणी एकत्र गोट्या खेळत असावेत अशा थाटात एखादा न्हावी त्या नेत्याबद्दल बोलत असतो. नेत्याच्या किती 'भानगडी' आपल्याला माहीत आहे असं सांगतांना त्याचा चेहरा बघावा. कौन बनेगा करोडपती आणि ऑस्कर जिंकल्यासारखा आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. त्यावेळेस वाटतं की नेतेलोकं भानगडी करतांना न्हावी लोकांना विचारत असावेत अथवा त्यांना बरोबर घेऊन जात असावेत.

असो. गर्दी पाहून तुम्ही मागच्या मागे सटकायचा विचार करत असता, पण ते चाणाक्ष न्हाव्याच्या नजरेतून सुटत नाही. चारी बाजूला लावलेल्या आरश्यातून त्याला तुम्ही बरोबर दिसतात. तो लगेच हाक मारून थांबवतो. फक्त १० मिनिटं लागतील असं म्हणतो. आपल्याला पण माहीत असतं की त्याचे १० मिनिटे म्हणजे आपला अर्धातास! पण आता आलोच आहोत तर परत कशाला जा, असा विचार करत आपण आत जातो. टाईमपास म्हणून तिथे आपण न-वाचणारे आणि एखादे मोठे शब्दकोडे अथवा चित्रपटांची बित्तंबातमी असलेले एखादे वर्तमांपत्र पडलेले असते. नाईलाजाने आपण ते वाचत बसतो. आदल्या दिवशी जर चेंडू-फळीचा सामना झाला असेल तर उपस्थित गिऱ्हाईकांमध्ये त्याची चर्चा रंगलेली असते. नकळत आपण भाग घेऊन आपण आपलं ज्ञान पाजळतो. मधून मधून न्हावी एखाद्या वादात पडून त्याचा न्याय-नोवाडा करत असतं. अशा वादांमध्ये त्याचं मत हे अंतिम असतं.

होता - होता वेळ निघून जातो. मेरा नंबर कब आयेगा असं मनात म्हणता म्हणता आपला नंबर लागून जातो. आपण खूर्चीवर बसतो.स्मोरच्या काउंटरवर निर-निराळ्या पावडर, तेल, जेल, साबण ह्यांचे डबे असतात. त्या डब्यांवरचे चित्रे हमखास परदेशी असतात. आणि 'तसा' ब्रँड आपण कोणत्याही मॉलमध्ये पाहीलेला नसतो. कधी-कधी त्यावरचे नावे पण एखाद्या महागड्या उत्पादनाशी मिळते-जुळते असते. अशा गोष्टी कुठे मिळतात हे न सुटणारे कोडे आपण त्याला विचारतो पण तो आपल्या ह्या यॉर्कर्वर षटकार ठोकत आपल्याला हजामत कशी हवी ते विचारतो. आपणसुधा मोघमात काहीतरी सांगून देतो. तसं समोरच्या चित्रात वेगवेगळ्या केशरचना असतात, पण अशारचना करून आपल्या कार्यालयात काय गहजब उडेल असा विचार करून आपण सरळ नेहमीची 'कट' त्याला सांगून देतो. तो पण ती एकली न एकल्या सारखी करत पाण्याचा फवारा आपल्या केसांवर मारतो. लहानपणी मला हा फवारा अतिशय आवडायचा. खुर्चीच्या हात ठेवायच्या जागेच्या आधारावर आडवी टाकलेल्या फळीवर बसवून मारलेला फवारा अजून लक्षात आहे.

ओल्या झालेल्या केसांवर आपला न्हावी सराईतपणे कात्री चालवायला लागतो. पुढच्यावेळेस रात्री तेल न लावता येत जा असं तो आपल्याला बजावतो. आपण 'बरं' किंवा 'हम्म' अशी उत्तरे देतो. त्यानंतर तो आपली गप्पांची पोतडी उघडायला सुरूवात करतो. कोण काय करतो याची माहीती तो द्यायला सुरूवात करतो. मध्येच आपल्याला पण तो प्रश्न टाकतो. पण आपल्याला त्याचा प्रश्न फारसा आवडत नाही. मोघमात उत्तर देऊन आपण टाळून देतो. नुर बघत तो कल्ले किती ठेवायचे ते विचारतो. सावधपणे माप घेत तो दोन्ही कल्ले एकाच मापात कापतो.

आपल्या बाजूला एखादा मुलगा झीरो मशीन लावून शाळा स्टाईल कटींग करत असतो. त्याची गंमत वाटून आपण तिरप्या नजरेने बघत असतो, पण आपला न्हावी ती परत सरळ करायला लावतो. बाजूचा न्हावी ते मिशन ५ मिनिटात उरकतो आणि एखादा कॉलेज कुमार गझनी कट करायला आलेला असतो. पण आता 'येळ' नाही असं गिऱ्हाईकांची गर्दी बघून तो त्याला कटवून देतो. ईकडे आपली 'हजामत' संपत आलेली असते. वस्तऱ्याला नवीन ब्लेडचं पातं लावून तो सिद्ध करतो. न्हाव्याचं कसब हे बहुदा तो किती सफाईने वस्तरा चालवतो त्यावरच असावं. लहानपणी वस्तरा चालत असतांना मला प्रचंड कसतरी व्हायचं. त्यामुळे माझा न्हावी फार संभाळून तो भाग उरकायचा. एकदा त्याने वस्तरा उअरक्ल्यावर तुरटीचं पाणी लावलं होतं. १५ मिनिटे नुसती आग-आग होत होती.

वस्तऱ्याचं काम उरकून तो डोक्यावर एखादं लाल्रंगाचं सुगंधी द्रव्य (नवरत्न नव्हे) टाकतो. आपण धास्तावून काय आहे हे विचारावं तर तो हेअर टॉनिक असं उत्तर देतो. परत हे द्रव्य आपल्याला कोणत्याच दुकानात कधी दिसलेले नसते. डोक्यावर ते टाकून तो १-२ मिनिटे आपली चंपी करतो. परत हा सुध्धा एक कौशल्याचा भाग. भणाणलेले डोके एकदम शांत होऊन जाते. दर रविवारी असं चंपी करवून घ्यायला यावं असं वाटत राहावं. एक न्हाव्याने माझी मान दोन्ही बाजूला फिरवून 'मोडली' होती. त्याने असं केल्यावर मला प्रचंड मोकळं मोकळं वाटायला लागलं होतं. पण त्याने तसं करण्याआधी जाम धास्तावलो होतो. न जाणो पुढची हजामत करायला जीवंत राहतो की नाही ते. पण माझा विचार ओळखून मान मोडल्यावर मला त्याने त्याच्या विशाल अनुभवाची (मान मोडण्याच्या) जाणीव करून दिली. मान मोकळी केल्याबद्दल अर्थातच मी त्याला धन्यवाद दिले. महीलांच्या बुट्टीपार्लर मध्ये चंपी किंवा मान मोडणे चालतं की नाही कोणास ठाऊक!

त्या नंतर तो हातात हनुवटी घेऊन तो आपले केसं 'सेट' करतो. मग अंगावर पांघरलेले कापड उतरवतो. अंगावर पडलेले केसं तो त्याच्या 'झाडू' ने तो खाली पाडतो. 'कशी झाली?'  ह्या प्रश्नावर आपण चांगली असं उत्तर देतो. मग डोक्या मागे आरसा लाउन तो मागचा भाग दाखवतो. आपण मान डोलावून 'ठिक' अस अभिप्राय देतो. मग २०-३० (अमेरिकेत म्हणे ह्याचे खुप जास्त पैसे घेतात. माझा एक मित्र ३ महिन्यानंतर कापायची वेळ येईल येव्हढे बारीक करून गेला होता तिकडे!!!) रुपये देऊन आपण आपल्या घराचा रस्ता शांत मनाने धरतो!!!

माझ्या मनात कायम एक प्रश्न असतो. हा न्हावी त्याची हजामत कोणाकडून करून घेत असावा?