कोण जाणे

कशाला तुझे व्हायचे कोण जाणे
किती गोजिरे व्हायचे कोण जाणे

'नकोसे न होणे' जगाने शिकवले
'हवेसे' कसे व्हायचे कोण जाणे

कधीचा मला रोग हा मीपणाचा
कधी मी बरे व्हायचे कोण जाणे

तुझा उंबराही लिलावात लाभे
कशाला पुढे व्हायचे कोण जाणे

तुझे नाव जेव्हा कधी घ्यायचो मी
कुणाचे भले व्हायचे कोण जाणे

पिढी खेचते मागची, आजचीही
नवे की जुने व्हायचे कोण जाणे

तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे

तुझ्याशी कशाला विरोधात राहू
तुझेही खरे व्हायचे... कोण जाणे

किती 'बेफिकिर' तू, तरी मार्ग सुचले
कसे काय ते व्हायचे कोण जाणे