असाच विस्कळीत मी

जरा कुठे सरावलो स्वत:त मी रमायला
लगेच पोचला तुझा सुगंध घमघमायला

कसे जगायचे कळून काय फ़ायदा अता
सबंध जन्म लागला शहाणपण जमायला

दिमाख फ़क्त दाखवून विरघळून संपलो
जसा विड्यास लावतात वर्ख चमचमायला

नको नको म्हणून पाय चालतो कसातरी
शिकायला हवे अता मनासही दमायला

असाच विस्कळीत मी मनात ताठ भूमिका
कण्यात एक नम्रता जगापुढे नमायला

मधेच धूळ चारतात या मनास माणसे
मधेच लागते हवेत नाव दुमदुमायला

मनामनास लावलीस ’बेफ़िकीर’ आग तू
युगे हजार लागणार शाप हे शमायला