शब्दांना अडवीत गेले

ही वाट तुझ्या स्वप्नांची आशेने तुडवीत गेले
अन रंग तुझ्या प्रीतीचे अंगावर उडवीत गेले.

त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवीत गेले.

वेदना कधी ना दिसली ना कधी उसासे कळले
हास्याच्या पडद्यामागे मी अश्रू दडवीत गेले.

जे जाणवले तुज नाही ते शब्द कोरडे झाले
दुःखाच्या भरल्या डोही मी मलाच बुडवीत गेले.

जे नव्हते माझ्यासाठी ते माझे म्हणूनी जपले
जेव्हा मज कळले तेव्हा शब्दांना अडवीत गेले.