दावती जोरात होत्या गावच्या देवीपुढे
माणसे झिंगून सारी माकडे झाली जणू
नवस फेडायास सारे गाव जमलेले तिथे
बायका, पोरे अशी, दीपावली आली जणू
दावला नैवेद्य देवीला, नि पाने मांडली
प्यायलेले पीत घाईने जमी पानांवरी
बायका, पोरे निराळी ओळ पाहुन बैसली
ताव मारू लागले सारे तिखट रश्यावरी
"घाल थोडा, यास वाढा", आग्रहाला जोरसे
हाडकांचे ढीग साचू लागले मागे पुढे
"बास" जो बोलेल त्याला आणखी रस्सा मिळे
पोट झाले जाम की तिथल्यातिथे ते आडवे
सांजवेळी शुद्ध येता चालले सारे घरी
पंगतीचा तो सडा पण जागच्याजागी असे
कावळे, कुत्री तिथे घोंघावुनी कल्ला करी
हाड ज्याला लाभले तो हासुनी बाजू बसे
दूर ते होते उभे, होते भुकेले, घाबरे
बारके ते, लागले नव्हते अजुन पाने चरू
कापलेल्या मायबापांना बघोनी कापरे
कोवळे निष्पाप त्यांचे एक छोटे कोकरू