अमिताभ बच्चन ... आपला हिरो

१९७० साली अस्मादिक या पृथ्वीवर प्रकटल्यानंतर जरा कुठे १९७६ पर्यंत चित्रपटांचे आकर्षण निर्माण व्हावे तेव्हा राजेश खन्नाचा अस्त होऊन अमिताभ 'छायला' सुरुवात होत होती. चित्रपट सोडून 'निदान त्या वयात तरी' इतर कुठलेच आकर्षण नसायचे.

जंजीरमधील डायलॉग मला माझ्या (नऊ वर्षांनी मोठ्या) मामेबहिणीने समजावून सांगीतले.

पण!

तेव्हापासून तो जो मनात बसला तो बसलाच.

कमीतकमी ४० चित्रपटांमध्ये त्याची ती सुप्रसिद्ध 'डॅशिंग, धक्कातंत्रवाली, एकाचवेळी बिनधास्त अन कोमलहृदयी' छबी झळकलेली पाहिली. अगदी 'पांढरी दाढी' नवीन वाटेपर्यंत! नटवरलाल, सिकंदर,  नसीब, शोले, दोस्ताना, जंजीर, दीवार, डॉन, अग्निपथ, हम, दो और दो पाँच, परवरिश. ( ही चित्रपटांची यादी नसून लगेच सुचलेली नावे आहेत. )

नृत्य - जे अमिताभने केले ते नंतर किंवा आधीही कुणीच करू शकले नाही.
मारामारीतील आवेश - अहं! नाही जमला लोकांना! खूप जोरदार मारामाऱ्या सनी, बॉबी, संजूबाबा वगैरेंनी केल्या. आवेश वाटला नाही.

आणि

अभिनय - माझ्यामते तो 'त्याच्याशी तुलना केल्या गेलेल्या किंवा त्याची तुलना केल्या गेलेल्या' सर्व / प्रत्येक अभिनेत्याइतकाच समर्थ निघाला.

(हे सगळे आत्ता लिहिण्याचे कारण म्हणजे पुण्यापासून ७० किलोमीटरवरील आमच्या प्लँटमधील गेस्ट हाऊस मधील टी व्ही वर लावारिस आहे. )

एवढे सगळे करूनही एकाचवेळी 'माससाठी असणे' व 'राष्ट्रीय पारितोषिक'ही मिळवणे ( काला पत्थर वगैरे ) त्याने शक्य करून दाखवले.

उंची, आवाज व डोळे यांचा इतका सुयोग्य वापर कुणी केला नसावा.

विनोदी अभिनय करावा तर त्यानेच! आक्रमकता दाखवावी तर त्यानेच! रडावे तर याच्यासारखे, हसावे तर त्याच्यासारखे!

हम मधील 'ये जो किडे होते है वो दो प्रकारके होते है' हा सुप्रसिद्ध डायलॉग पाहून वाटते की दारुड्याचा अभिनयही करावा तर त्यानेच!

शान, शोले हे चित्रपट त्यातील इतर कुठल्याही अभिनेत्यापेक्षा निदान मला तरी अमिताभमुळे आवडले.

अभिनेत्रींसाठी 'त्याच्याबरोबर काम करायला मिळणे' ही एक पर्वणी असायची. सेटवर अत्यंत मोकळ्या स्वभावाचा, दुसऱ्याचे टेन्शन घालवणारा, असा त्याचा लौकीक!

राजकारणात शेवटी सपशेल अपयशी ठरला.

कुलीमध्ये अपघात झाल्यावर निदान २५ % भारत तरी प्रार्थना करत होता.

हेमवतीनंदन बहुगुणांना अलाहाबादमध्ये हरवण्यासाठी प्रचार करताना तेथील तरुणी आपले दुपट्टे त्याच्या रस्त्यात अंथरायच्या. त्याने चक्क बहुगुणांना हरवले. पण त्यांच्याच पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले.

मुस्लिम समाजात अमिताभ विलक्षण लोकप्रिय आहे.

अंधा कानून सारखे चित्रपट केवळ त्याच्यामुळेच इतके गाजले.

आणि काय तर म्हणे अशा माणसाने 'अभिमान' हा चित्रपटही केला, 'कभी कभी'ही! अन सिलसिलाही!

सुरुवातीला अत्यंत सडपातळ असणारा हा माणूस नंतरच्या चित्रपटांमध्ये बऱ्यापैकी आडवापण वाटायला लागला.

मुकेश, रफी यांचा आवाज जरी लाभला तरी त्याची गाणी खुलली किशोरमुळे!

त्रिशूलमध्ये संजीवकुमारच्या अन आनंदमध्ये राजेश खन्नाच्या तोडीसतोड! राजुड्याला तर म्हणे तेव्हा कल्पनाच नव्हती की आपण आपल्याच एका प्रतिस्पर्ध्याला बळ देत आहोत.

अमिताभचे काय सांगायचे?

माझ्या 'जराशा समजत्या' वयापासून तो माझा हिरो आहे. हल्ली हल्ली अगदी सुनेबरोबर नाचताना पाहिले तरी आठवतो तो...

तोच...

अगर कोई माई का लाल है तो आके ये......

अमिताभ बच्चन! आपले दैवत!

-सविनय
बेफिकीर!