रस्त्यावर गरगरणाऱ्या चांदण्याने;
सारं कसं झगमगाटात न्हालेलं;
माणसांच्या फेसाळणाऱ्या लाटांनी;
समुद्राला भरतं आलेलं.
रस्त्याच्या कडेला ति उभी;
केसात रातराणीचा गजरा माळून;
तिचा रात्रीचा धनी शोधताना;
उन्नत छातीत भीती लपवून.
चढलेला रोजचाच रंग ओठांवर;
चढलेले पावडरचे थर गालांवर;
डोळ्यांचा इशारा; शरीराचा चाळा;
कुणीतरी तयार होतो मदनाचा खेळ खेळाया.
रात्र सरते त्या अनोळखीबरोबर;
कवडीमोलात त्याची दिवाळी साजरी;
का? कशासाठी? फक्त तिच्या पोटासाठी अन्;
नाईलाजाने लादलेल्या मातृत्वासाठी.
रात्र संपता संपता डोळे जडावतात;
कधीही पूर्णं न झालेल्या झोपेने;
तोपर्यंत तिच्या रोजच्या बिछान्यावर;
त्यानं तिच्याकडून पै अन् पैचा हिशेब घेतलेला.
जातानाही तो तिच्या गजऱ्याच्या कळ्या;
कुस्करून; त्याच्या सुगंधात धुंद होतो;
वर तू मनासारखी सोबत केली नाहीस;
म्हणून कानाखाली खाडकन् देऊन जातो.
मग वेदनेनं कळवळणाऱ्या शरीराला;
समजावून ति तिच्या बाळाला जवळ करते;
अन् ते वेडही एक थेंब दुधासाठी;
तिच्या आत्म्यालाच झोंबत राहते.
ते बिचारं दमत लढून लढून;
डोळे विझतात; पोटातली आग विझत नाही;
तिने एवढे गमावून सुद्धा;
ति अन् तिचं मातृत्व कधीच सुखावलं नाही.