चॉकलेट शिरा

  • रवा - १ वाटी
  • साखर - अर्धा ते पाऊण वाटी (चवीप्रमाणे)
  • तूप - २ मोठे चमचे
  • कोको - २ छोटे चमचे
  • वेलदोडे, काजू (इच्छेप्रमाणे)
  • एक कढई
  • एक परतायचा चमचा, सांडशी (कढई उलटू नये म्हणून)
  • एक चहाचं भांडं (किंवा विद्युत किटली)-पाणी तापवायला, एक पेला (पाणी मोजायला)
  • खल-बत्ता / पाटा-वरवंटा / भरडण्यायोग्य काहीही - वेलदोड्यांसाठी
  • दोन बश्या आणि दोन चमचे (खाण्यासाठी)
१५ मिनिटे

प्रथम एका कढईत रवा भाजावा. रंग बदलू लागल्यावर (रव्याचा) आणि दुसऱ्या खोलीत दुसऱ्या व्यक्तीला रवा भाजल्याचा वास आल्यावर रवा चांगला भाजला गेला आहे असं समजावं. रवा भाजताना सतत परतणं आवश्यक आहे, नाहीतर 'लागतो' (म्हणजे काही भाग करपतो.)

भाजलेला रवा एका भांड्यात ओतून घ्यावा.

वेलदोडे काढून, सोलून, वाटून घ्यावेत. काजूही वाटलं तर तुकडे करून घ्यावेत. एका भांड्यात ३ पेले पाणी गरम करत ठेवावं. एका पेल्यात २ छोटे चमचे कोको (किंवा ड्रिंकिंग चॉकलेटही चालेल - त्याप्रमाणे वाटल्यास साखर थोडी कमी घ्यावी) घेऊन त्यात अर्धा पेला गरम पाणी घालावं आणि मिश्रण एकसंध होईपर्यंत ढवळावं.

कढईत तूप घालून पुनः त्यावर रवा भाजावा. तुपावर चांगला भाजला गेला आहे असं वाटल्यानंतर (आधीच भाजून ठेवलेला रवा असला तर पुनः त्याचा वास यायला लागल्यावर) त्यात पाणी ओतावं. लगेच, साखर, वेलदोडे आणि काजूही. (काजू वरून सजावटीसाठी वेगळेही घातले तर चालतील. ) शेवटी कोकोमिश्रित पाणी घालावं. मिश्रण एकरूप होईपर्यंत परतावं.

- कुमार जावडेकर

चॉकलेट शिरा गरमागरम खावा.

स्वतः