असा मांडला दुकानातुनी कवितेचा बाजार पहा...
खिशास जो परवडेल तो तो कवी घेउनी चला पुढे
कुणास कविता समजत नाही, इथे भाव ठेक्याला राही
कवी पाहिजे तुम्हांस कसला नीट पाहुनी चला पुढे
जुनीच कविता, चाल नवी अन जुनाच ठेका, भाव नवे
कुणास येथे अर्थ पाहिजे? नाच नाचुनी चला पुढे
इथे 'कुणीही' कवितेमधुनी पोहे, उपमा, शिरा वाटती
हिंग, मिरे कांद्यास फोडणी-मीठ लावुनी चला पुढे
पोपट, मैना, कोंबडीस या 'टुणुक टुणुक' म्हातारी म्हणते, -
'मळ्यात वांगी, तळ्यात मासे, भोपळ्यातुनी चला पुढे
जलव्याल अन अमिबा म्हणती, 'घोडे आम्ही कधी मारले? '
कवितेमधुनी पाली, झुरळे, ससे घेउनी चला पुढे
जीवनावरी बोलण्यासही आता काही उरले नाही...
कविता म्हणते, 'पुरे खेळ हा... मला सोडुनी चला पुढे..'