रिऍलिटी शोज आजकाल भारतात चांगल्यापैकी चालतात. मला हे कार्यक्रम कुठुन सुरु झाले वगैरे माहित नाही पण केवळ उत्सुकतेपायी मी ही काल परवा पासुन "बिग बॉस" बघायला लागले आहे (हे माझं प्रामाणिक कन्फ़ेशन!).काही गोष्टी तश्या अमेरिका किंवा त्यासारख्या विकसित देशातील लोकांनाच शोभुन दिसतात हे माझे मत होऊ लागले आहे हल्ली.
या सगळ्या कार्यक्रमांचं एक अवलोकन केलं असता पाश्चात्यांनी त्यांची मनोवृत्ती,कुटुंबसंस्था, राहणीमान, संस्कृती, नवरा बायकोचे मुलांचे एकमेकांसोबत असलेले नाते, शिक्षण पध्दती या सगळ्यां गोष्टी सुधारण्यासाठी कदाचित या शोज चा अवलंब केला असावा असे मला वाटते. आणि त्यानुसार हे जे शोज आहेत त्यामध्ये टी आर पी ह्याच एका मुद्द्याचा विचार नं करता बाकी सगळ्या मनोवृत्ती,कुटुंबसंस्था इ इ गोष्टी अगदी जाणीवपूर्वक नीट हाताळल्या गेल्या आहेत.
कदाचित कुटुंब, विवाहसंस्था इ इ गोष्टी टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे असे त्यांना वाटले असावे. टी व्ही हेच लोकांना प्रबोधित करण्याचे साधन आहे म्हणुन हे कार्यक्रमं सुरु केले असावेत. अर्थात मी ह्या सगळयाचा खुप सकारात्मक विचार करतेय पण या निमित्ताने का होईना लोक त्यांच्या नातेसंबंधाबद्दल, मनोवृत्तीबद्दल विचार करायला लागतील किंवा लागले असतील . तर एकुण रिऍलिटी शोज हा पाश्चात्य देशांतील वास्तवाच्या दृष्टीकोनातुन विचार केला असता चांगला प्रकार आहे.
जे काही पाश्चात्य देशात चालते ते भारतात तर चाललेच पाहिजे ह्या नियमाचा अवलंब करत आपणही ह्या सगळ्या रिऍलिटी शोज चं तंतोतंत अनुकरण करत आलो आहोत. अगदी "कौन बनेगा करोडपती" पासुन " पती पत्नी और वो" पर्यंत. पण भारतात आणि पाश्चात्य देशात खरंच तंतोतंत अनुकरण करण्याएवढं साम्य आहे का? हा विचार करायला आपण विसरलोय कदाचित. जो कार्यक्रम तिकडे प्रबोधन (चु.भु.दे.घे) करण्यास उपयुक्त ठरु शकतो तोच कार्यक्रम इथेही प्रबोधन करु शकेल का? हा विचार कुणीही केलेला दिसतंच नाहीए. मुळात ह्या शोज चा पर्पज काय आहे? आपण का म्हणुन हे सगळे शोज टी.व्ही वर दाखवतोय याचं कुणी नीट उत्तर देऊ शकेल असं मला वाटत नाही. हे शोज दाखवल्याने वाहिन्यांचं टी.आर.पी रेटींग वाढतं आणि फोन कंपन्यांचा फ़ायदा होतो एवढंच काय ते ध्यानात येतं माझ्या.
भारतातील परिस्थिती चा विचार करता आज अश्या कितीतरी समस्या आ वासुन उभ्या आहेत ज्याबद्दल आपण टि.व्ही द्वारे लोकांपर्यंत पोहचु शकतो. टि.व्ही हे फ़कतं मनोरंजनाचे साधन नं होता त्याद्वारे लोकांना माहीती देता आली, त्यांचे विचार बदलता आले तर किती बरे होईल याचा सगळ्या निष्णात दिग्दर्शकांनी विचार केला पाहीजे.
एखादी मालिका अशी का असु शकत नाही जिथे लोक आपल्या नेत्याला त्यानी केलेल्या कार्याबद्दल प्रश्न विचारु शकतील (आप की अदालत किंवा रुबरु सारखे), एखाद्या सामान्य माणसावर किंवा शेतकर्यांवर असलेलं कर्ज मुक्तीचा एखादा कार्यक्रम का असु शकत नाही? झी मराठीने "हफ़्ता बंद" ही मालिका सुरु करुन खरंच या दृष्टीने पाऊल उचललं आहे असं मला मनापासुन वाटतं. विशेषतः हे सगळे कार्यक्रम जनतेला विचारुनच करावे म्हणजे टी आर पी पण उच्चच राहील.
एखादा असाही कार्यक्रम असु शकेल जिथे वयोवृध्द माणसे आपल्या आठवणी, त्यांच्या आयुष्यात आलेले चांगले क्षण आपल्याला सांगु शकतील. त्यांच्याजवळ आपल्याला समृद्ध करणारे बरेच काही असते असे मला नेहमी वाटत आले आहे. ह्या कार्यक्रमाने त्यांचे दुरावलेले नातेवाईक त्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न पण आपण करु शकतो.
एखाद्या गृहीणीचं तिच्या घराबद्दल कामाबद्दलचं मनोगत, तिला घरच्यांच मिळणारं सहकार्य ह्यावरही एखादा रिऍलिटी शो होऊ शकतो नाही का?
मुळात रिऍलिटी शो मधली रिऍलिटी विसरुन आपण बघतोय ते निव्वळ कुणी तरी आव आणल्याचं नाटक आहे असं मला वाटते. गरज आहे ती भारतातील वास्तव (रिऍलिटी) जाणायची….आणि आपण भारतीय आहोत ह्याची पुन्हा एकदा स्वतःला जाणीव करुन द्यायची.