किनारा गाठण्यासाठी

कसाही का..! दिला होता सहारा वाहण्यासाठी
प्रवाहाला कसे सोडू किनारा गाठण्यासाठी?

अता पाऊस हक्काचा कुठेही पाडता येतो
अता लांडोरही मागे पिसारा नाचण्यासाठी

मला झाले कळेनासे तुझे संदेश डोळ्यांचे
इशारा देत जा सोपा, 'इशारा' वाटण्यासाठी

जुना वाडा बिर्‍हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी

पुन्हा जातो जगामध्ये उभारी घेत आशेची
पुन्हा येतोच मी येथे ढिगारा टाकण्यासाठी

कधी विश्वास माझा वाटला नाही नशीबाला
हजारो यत्न केले मी 'बिचारा' भासण्यासाठी

तुला बोलावले नाही मनाला हासण्यासाठी
तुला बोलावले होते पसारा लावण्यासाठी

दिला आहे मनाने वेग स्वप्नांना प्रकाशाचा
जरी काळाकडे आहे खटारा हाकण्यासाठी

पुन्हा येणे, पुन्हा जाणे, कुणाची कैद आहे ही?
कुणाला अर्ज धाडावा पहारा काढण्यासाठी?

अशा मुर्दाड लोकांच्या मनी रोमांच आणावा
मरावे 'बेफिकिर'ने मग शहारा आणण्यासाठी

-सविनय
'बेफिकीर'!