प्राक्तन - सत्यकथा-५

जर कोणी दुसऱ्याचे नशीब बिघडवू पाहत असेल व तसा त्यानी जाणीवपूर्वक प्रयत्नही केला असला तरी तो त्या प्रयत्नामुळे तात्पुरता यशस्वी होतही असेल, पण त्या माणसाच्या नशीबापुढे त्याला शेवटी हातच टेकावे लागतात. अशाच एका नशीबवान माणसाची ही कथा.

रमेश जानोरकर हा व्हेटर्नरी सायन्सची बी. व्ही. एस सी. ची परीक्षा पहिल्या वर्गात पास झाला होता. त्याच्या या हुशारीमुळे सरकारने त्याला सरकारी खर्चाने एम. व्ही. एस. सी. ची परीक्षा देण्यासाठी निवडले होते. त्याने मग सरकारचा विश्वास सार्थ ठरवत ऍम. व्ही. एस. सी. ची परीक्षापास केली होती. सरकारी खर्चाने शिक्षण घेतल्याने त्याच्याकडून सरकारने दहा वर्षाचा नोकरीत राहण्याचा लेखी करार लिहून घेतला होता. त्यामुळे सरकार जेथे त्याची बदली करेल तेथे त्याला जाणे भाग होते.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा हा बराचसा आदिवासी वस्ती असलेला जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात दापचरी नावाच्या खेडेगावातत्याची व्हेटर्नरी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. येथील लोकवस्ती अंदाजे दोन हजार होती. येथे आदिवासी लोक राहत असल्याने शहरी सुविधा तर नव्हत्याच, पण पिण्याच्या पाण्याचीही नीट व्यवस्था नव्हती. तेथील हवामान नेहमी दमट असे. अशा ठिकाणी कोणाची बदली केली तर तो अधिकारी एक तर दीर्घकाळ रजेवर जात असे व बदली रद्द करून घेत असे, नाहीतर नोकरी सोडत असे. त्यामुळे अशा जागी चांगला अधिकारी मिळणे सरकारला अवघड जात होते. पण आता डॉ. रमेश कडून लेखी करारच घेतल्यामुळे त्याची बदली येथे सहज केली गेली. त्याला वरीष्ठअधिकारी म्हणून डॉ. वडवाणकर नावाचे अधिकारी होते. त्याना राहण्यासाठी सरकारी घर होते. पण डॉ. रमेशला राहण्यासाठी स्वतंत्र घर देण्यातआले नाही. ट्याला डॉ. सहस्त्रबुद्धे नावाच्या दुसऱ्या डॉक्टरच्या घरातील एक खोली देण्यात आली. ते आदिवासी गाव असल्याने गावात एकच हॉटेलहोते. पिण्यासाठी पाणी कुठल्या विहिरीचे किंवा हपशाचे असेल ते सांगता येत नव्हते. बऱ्याच वेळा पाणी अत्यंत गढूळ असून ते सेटल होई पर्यंत थांबावे लागे. जेवावयास भात व माशाची करी किंवा आमटी असे. अशा या गावी रमेश तर रडकुंडीला आला होता. अशा गावी सरकारचा स्पेशललाईव्ह स्टॉक प्रॉडक्शन प्रोग्रॅम त्याला यशस्वी रित्या राबवावयाचा होता. या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्याला आदिवासींना व्हाईट लेग हॉर्न कोंबड्या, इंग्लिश डुकरे, इंग्लिश गायी या वितरीत करून त्यापासून कसे उत्पन्न काढावयाचे ते शिकवावयाचे होते. जरी त्याचे मुख्य राहण्याचे ठिकाण दापचरी होते तरी संपूर्ण ठाणे जिल्हा आदिवासी भागात हिंडून या योजनेचे लाभार्थी त्याला शोढून काढावयाचे होते व त्याना उत्पन्नाचे साधन म्हणून वरील प्राणी द्यायचे होते.

पण आदिवासी त्यासाठी तयार होत नसत. कारण एवढी झंझट करून व वेळ घालवून त्याना किती पैसे मिळतील याची शास्वती नव्हती. बहुतेक आदिवासी दारू गाळून ती ट्यूबमध्ये भरून शहराला पोहोचवण्याचे काम करीत असत. त्यासाठी त्याना चांगले पैसे मिळत असत. मग ते सरकारच्या योजनेकडे पाठ फिरवतील तर नवल कसले? त्यात डॉ. रमेशचा वरीष्ठ अधिकारी फार खाष्ट होता. रमेशच्या हातून त्याचा एकदा अपमान झाला असल्याने तो त्याच्यावर दात धरून होता. त्याला त्रास कसा होईल ते तो बघत होता. दिवसाला अशक्य लक्ष/टारगेट द्यायचे व ते पूर्ण केले नाही तर मेमो द्यावयचा. असा त्यानी सपाटा लावला. होता. त्याला रोज टोमणे देऊन जिव्हारी लागेल असे बोलायचा. सर्वात कहर म्हणजे त्यानी डॉ. रमेशचा सी. आर. खराब करून टाकला होता. त्यामुळे त्याला पुढे कधीच प्रमोशन मिळू नये अशी त्याची इच्छा होती. डॉ. रमेश व्हेटर्नरी खात्याच्या कोणत्याही कामास योग्य नाही असा शेरा मारला होता. रमेश तर जीव तोडून काम करीत होता. तसा तो आदिवासी लोकातही आवडता डॉक्टर झाला होता. पण केलेल्या मेहनतीवर असे पाणी पडत असेल तर त्याचा काय उपयोग? डॉ. रमेश नाराज होऊन काम करीत होता.

अशातच डायरेक्टरचा दौरा दापचरीला होणार होता. डॉ. रमेशने ठरवले की डायरेक्टरशी बोलून आपली बदली होती का ते पाहावे. डायरेक्टर आले. त्यानी कामाबद्दल समाधान व्यक्त केले. नंतर डॉ. रमेश त्याना भेटावयास गेला. त्यानी सांगितले, " साहेब सरकारने माझ्यावर एम. व्ही. एस. सी. करता एवढा खर्च केला त्या ज्ञानाचा उपयोग न करता मला तुम्ही अशा ठिकाणी टाकलेत की मी माझे ज्ञान विसरून जाईन. तरी माझ्या योग्य काम मला देण्यात यावे. डायरेक्टरला माहित होते की येथे काम करण्यास कोणी मिळत नाही. त्यामुळे त्यानी आपली असहाय्यता प्रकट केली. पण एक आशेचा किरण त्यानी दाखवला. त्यानी डॉ. रमेशला एक चॅलेंज देणारे काम दिले. या खात्याचे पालघर येथे एक मोठे बफेलो ब्रिडिंग फॉर्म होते. त्यात नवीन जन्मलेली म्हशीची रेडके जगत नव्हती. त्यांचे मरण्याचे प्रमाण ६०% होती. ते जर तुम्ही कमी करून दाखवले तर तुम्हाला येथून दुसरीकडे बदली दिली जाईल असे आश्वासन दिले.

डॉ. रमेशची पोस्टिंग पालघर येथे बफेलो ब्रिडिंग फॉर्मवर केली. आता हे काम डॉ. रमेशच्या आवडीचे होते. कारण त्यानी एम. व्ही. एस. सी. याच विषयात केली होती. रोगाचे निदान करणे व त्यावर उपाय योजना करणे हाच त्याचा विषय होता. मग त्यानी तेथील सर्व अभ्यास करून रेडकांवर औषध उपाययोजना चालू केली. एक दिवस रात्री झोपले असता त्याला गडबड ऐकू आली. त्याने उठून हळूच पाहिले तर त्याच्याच खात्यातील लोक नुकत्याच व्यालेल्या म्हशीचा चीक काढून बाहेर विकावयास घेऊन जात होते. खर म्हणजे हा चिक त्या म्हशींच्या रेडकांना प्यायला द्यावयास पाहिजे होता. त्यात सर्व व्हिटॅमिन्स असल्याने तीच न मिळाल्याने रेडके जगत नव्हती. मग डॉ. रमेशने त्या वासरांना औषधाची उपाययोजना चालू केली. त्यानी कृत्रीम चिक तयार करून त्यात व्हिटॅमिन्स व सलाईन मिसळून त्या रेडकांना पिण्यास दिले. त्यामुळे हळुहळू रेडके जगण्याचे प्रमाण वाढत गेले. शेवटी रेडके मरण्याचे प्रमाण ६०% पासून ५% पर्यंत खाली आले होते. त्याचा अहवाल डायरेक्टरला गेला.

डायरेक्टरने डॉ. रमेशला बोलावून त्याने काय कारण शोधून काढले व कसे त्यावर उपाय केले याची माहिती घेतलीअर्व माहिती ऐकून डायरेक्टर एकदम खूष झाले व त्याची पोस्टिंग पुण्याला रोग निदान व उपचार या खात्यात केली. पुण्याला डॉ. रमेशने अशीच सात आठ रोगाची निदाने केली व महाराष्ट्रातीलरोगाबद्दलचे प्रश्न सोडवले. ह्या कामावर खूष होऊन डायरेक्टर श्री. मानवतकर व जॉईंट डायरेक्टर श्री. मोकासदार यांनी रमेशचे नाव पोस्ट ग्रॅज्युएट इन प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन्सच्या कोर्ससाठी शिफारस करून पाठवले. हा कोर्स सहा महिन्यांचा कोपनहेगन डेन्मार्क मध्ये होता. सर्वात आश्चर्य म्हणजे तो निवडला जाऊन त्या कोर्ससाठी डेन्मार्कला गेला सुद्धा.

यथावकाश सहा महिन्यानी त्याचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाला व तो भारतात परत आला. आता त्याच्या ज्ञानाचा उपयोग सरकारने त्याला असिस्टंट डायरेक्टरचे पद देऊन, रोग निदान व उपचार या खात्याचा मुख्य अधिकारी बनवून केला. ज्या वरीष्ठ अधिकाऱ्यानी हा कोणत्याही कामास योग्य नाही असा शेरा दिला होता त्या शेऱ्याकडे कानाडोळा करून त्याला आपल्या खात्यात गौरवाचे पद दिले होते. दुसऱ्याचे नशीब आपल्या कर्माने बिघडवणारा अधिकारी मात्र जेथे आहे तेथेच राहिला होता. याला प्राक्तना शिवाय दुसरे काय म्हणणार?