एका तळ्यात होते, जल निळेशार शांत
होती तयात डुलत,रक्तवर्णे कमळे निवांत
येई हळुच समीरण, चुंबुनी त्यास जात
होई अजुनी गडद ती, रक्तिमा त्या फुलात
मग येई भास्कर,फेकित किरणे ती सोनेरी
शोषून घेती उब त्याची, हरित पर्णे बिचारी
विकसते कमलपुष्प, उघडुनी दले ती सारी
खुलते सौंदर्य त्यांचे, आकर्षित दिसे भारी
येई मग भ्रमर थवा, शोषण्यास मधू फुलात
होता तयात एक, पडला फुलाच्या तो प्रेमात
गुंजारव करत होता,फुलाभोवती हो मस्तीत
मग चुंबिले फुलास, बसला जावूनि फुलात
भान राहिले नाही, वेळ किती गेला निघून
अस्त होतसे रवीचा, किरणे घेई आवरून
कमलपुष्प ते मिटले, आपुली दले मिटून
होता मिलिंद त्यात, गेला सहज अडकून
होती रात्र मग त्याची,सुंदर मधु मिलनाची
प्राशन केला मधू त्याने, तृप्तता होई मनाची
भास्कर येताच सकाळी, उमले दले फुलाची
मरून जाई मिलिंद, आठवत रात्र मिलनाची