भाग्य

आलोय् चालत इथवरी
पचवीत टक्के टोणपे ।
खाणाखुणा दिसती समोरी
ओळखिच्या परिपाठाने ॥
     उगवणे मावळणे दिवसाचे
     नाविन्य त्यात ना वाटे ।
     बारा अंकांची बंधने
     ना काचती आता कुठे ॥
दूर निळाईत दिसताहे
एक ठिपका सोनेरी ।
मुक्त विहरणारा वेगे
ना ऐकलेला आजवरी ॥
     अवचित् कुणी सांगितले
     किणकिणत कानामध्ये ।
     महत् तेजोरथास त्या
     अश्व बारा जुंपलेले ॥
रथास त्या नसतो कधी
कुणी सारथी वा रथपती ।
स्वयंप्रज्ञ तो सदाची
नित्यमुक्त विश्वगामी ॥
     सच्चिदानंदात रमणे
     जीवास ज्या साधले ।
     त्या भाग्यवंतास नेतसे
     तो हिरण्यगर्भाच्या लोकी ॥
विवंचनेने ना पाठ सोडली
आयुष्य गेले फुकाफुकी ।
दर्शन त्या ठिपक्याचे घडले
आता हेच भाग्य मानावे की ॥