कुणीही अन्यथा गंभीरतेने घ्यायचे नाही
निघावे फक्त घाईने, कुठेही जायचे नाही
जयंती रोज नेत्यांची अता बोकाळली आहे
कशाला पाहिजे स्वातंत्र्य जेथे 'प्यायचे नाही'?
तुक्या, तू जा विमानाने, अम्हाला राहुदे येथे
तुझ्या नावे करू दंगे, तुला बघवायचे नाही
शिवाजी नाव रस्त्याला, शिवाजी नाव शाळेला
अम्हाला फक्त शिवबासारखे वागायचे नाही
करू बुधवार पेठेला अता साहित्य संमेलन
दलाली मागणाऱ्यांनी अता लाजायचे नाही
पसरली डुक्करांच्या चुंबनाने साथ मृत्यूची
प्रियेचे सोड, अपुले ओठही दाबायचे नाही (त)
मराठी माणसासाठी नका भांडू, नका त्रागू
इटाली सोडुनी निवडून कोणी यायचे नाही
'कुणीही एक बापाचा कवी उरलाच नाही का?'
असे आले मनामध्ये तरी बोलायचे नाही
प्रतिज्ञा संत पंतांनो बघा माझी महंतांनो
जसा हा 'बेफिकिर' झाला, कुणीही व्हायचे नाही