चाललो जिंदगी घेत हातावरी

काल होते रिकामे हृदयही तसे
पाहिले मी तळे शांत जागी जसे
टेकलो, पाय सोडून पाण्यामधे
काळजी एवढी की जगावे कसे

एक मुंगी तिथे चालती पाहिली
कण कशाचातरी वाहती पाहिली
वाटले की 'चला, खोड काढू तिची'
घेत हातात माती, गती पाहिली

घेत अंदाज, माती पुढे टाकली
पोचली आणि मुंगी तिथे थांबली
होत नाराज, थबकून घटकाभरी
तोंड वळवून मुंगी पुन्हा चालली

एकदा सोडुनी पाचवेळा तसा
मार्ग बदलायला लावला मी जसा
तेच प्रत्येकवेळी वदे ती मला
'वाट सोडा जुनी, अडथळ्यांना हसा'

शेवटी गर्व झाला मलाही जरा
टाकला ढीग मुंगीवरी मी पुरा
एवढीशीच मुंगी नि उद्दामता?
हासलो, जिंकलो वाटुनी मी खरा

पाहतो तर निघालीच बाहेर ती
थांबली श्वास घेता जरावेळ ती
कण न तोंडात आता तिच्या राहिला
मग निघाली कणाच्या दिशेनेच ती

राग आला मला, मी दगड घातला
पाहता पाहता खेळ तो थांबला
पण असा एक आघात झाला मनी
एक संदेश त्यातुन मला लाभला

होउदेना अधू पाय डावा तुझा
कारखाना जरी बंद झाला तुझा
केवढे मार्ग आहेत याच्यापुढे
बंद उजवा जरी, मार्ग डावा तुझा

ठेवले मी तिला एक पानावरी
ठेवला कण तिचा पार्थिवाच्यावरी
दोन अश्रू निघाले, तिला वाहिले
चाललो जिंदगी घेत हातावरी

-चाललो जिंदगी घेत हातावरी