एका पत्राची गोष्ट

एका पत्राची गोष्ट

रोज सकाळी पोस्टमन  येतो, पण येतात ती बिल- टेलिफोन,वीज, पाणी यांची बिल, जाहिरातींनी भरलेले पेपर आणि मासिके.
हस्तलिखित पत्राला मी जिवंत पत्र म्हणते. त्या पत्रातून व्यक्तीचे स्पंदन, मायेचा स्पर्श, भावभावना माझ्यापर्यत पोहोचते.  असे जिवंत पत्र जेव्हा केव्हा  येते तो दिवस अगदी भारल्यासारखा  जातो. साधारणपणे  असे पत्र येते तेव्हा त्याबरोबर दिवाळीचे भेटकार्ड, कुणाची लग्नपत्रिका  किंवा ख्रिसमसचे कार्ड असते. पत्र येईपर्यंत कधी फोटो गायब होतात, आतली चिठ्ठी नसते तर कधी नुसतेच वरचे पाकीट येते ..तेही फाटलेले...असेही झाले आहे. ओळखीची भाषा, ओळखीचे हस्ताक्षर कशाने तरी पत्र पाठवणाऱ्याचा थांगपत्ता लागतो. नाहीतर
नुसते आपल्याला आलेले पत्र याचे समाधान मिळते.. पण एक अपूर्णता जाणवत राहते.

कोण जाणे ते कुणाचे पत्र होते
नेमक्या जागीच काटाकाट होती

सुरेश भटांनी या ओळीत मनातली हुरहूर किती नेमकी मांडली आहे.

क्षणात फोन, इमेल करायच्या आजच्या इस्टंट्च्या  जमान्यात एखादे हाताने चार ओळी लिहिलेले कार्ड येते इतकेही नसे थोडके.  जुनी कागदपत्रे आवरतांना  एका पुस्तकात ठेवलेले आईचे पत्र  दिसले आणि मग हव्याहव्याशा वाटणार्‍या मखमली आठवांच्या वाटेवर मनाने एक भलीमोठी  सैर केली.

प्रिय व्यक्तीला निरोप देण्याच्या गरजेतून मेघदूतासारखे काव्य जन्म घेते.  एखादा प्रियकर वार्‍याला आपला दूत करतो, हंसाकडून , कबुतराकडून असे पक्ष्यांकडून प्रिय वक्तीला चिठ्ठी पाठवतो .  थोडक्यात दोन व्यक्तींमधले संवाद जुळवून आणणार्‍या पत्रांची अनेक रूपे, अनेक कहाण्या पुन्हा ताज्या झाल्या. पूर्वी मोठाल्या कमळाच्या पानावर पत्रे लिहित. कुंचला,टाक दौत , कागद पेन असे विविध साहित्य आणि पत्राचे वेगवेगळे प्रकार आले. काळ बदलला तसे आता एका क्लिकसरशी किंवा चार बटने दाबली की आपला निरोप पोचवता येतो.  हस्तलिखित पत्राच्या आग्रहामागे  बालपणीच्या आठवणी, मनात रेंगाळणारा भूतकाळ; नोस्टाल्जियाच जास्त आहे यात शंका नाही.

अक्षरओळखही झाली नव्हती  तरी पोस्टमनने आणून दिलेली पत्रे मी धावत जाऊन घरात आणत असे.  आलेल्या पिवळसर कार्डावर, कधी हिरव्या निळ्या मोठ्या कागदावर लिहिलेल्या ओळी आजी आजोबा वाचत असत ते दिवस आजही आठवतात.  आमच्याकडे पत्रे येत त्यावरचे अक्षर बहुतांशी सुरेख, वळणदार असे.  एखाद्या गृहिणीने आठवड्याची फळेभाजी जशी फ्रिजमध्ये रचावी तशाप्रकारे जास्तीत जास्त लिहिलेले आणि वाचता येईल असा सुबक मजकूर असलेली पत्रे असत ती. आपल्याला लिहिता आले की आपण सुद्धा पत्र पाठवायचे असे मनाशी ठरवले होते मी.

 पुढे शाळेत जाऊ लागले तेव्हा कार्डावर / इन्लॅड लेटरवर मजकूर जास्त लिहिता यावे म्हणून  धबाडे अक्षर हळूहळू छोटे करण्याचा
प्रयत्न सुरु असे. लेखनाचा सराव म्हणूनही मी पत्र लिहित असे.  पत्र आले की ते वाचण्याची एक आगळी उत्सुकता मनात असायची. सुटीच्या दिवसात पत्र आले की ते कोण आधी वाचणार अशी स्पर्धाच असे. सकाळी घरात येणार्‍या वर्तमानपत्राप्रमाणे जर पत्राची विभागणी करता आली असती तर प्रश्नच नव्ह्ता.  तार आली म्हणजे नक्की काही तरी वाईट घडले आहे अशी खूणगाठ बांधलेली होती. पत्र  वाचतांना कधी आजीच्या डोळ्यात पाणी  यायचे, कधी अगदी तीन ओळी असणारे पोस्टकार्ड आजोबा फाडून टाकत आणि मग थोडेसे घाबरलेले, अस्वस्थ आणि चिडलेले दिसत.  मोठे झाल्यावर कुणी देवाघरी गेल्याचे पत्र आले की ते फाडून टाकायचे असते हे माहिती झाले होते. त्यामुळे आजोबांच्या अस्वस्थ
असण्याचे कोडेही उलगडले होते.  आजीच्या ट्रंकेत्, बाबांच्या जुन्या पुस्तकांच्या बॅगेत अनेक जुनी पत्रे होती. त्यातले एखादे पत्र काढून ते पुन्हा पुन्हा वाचण्याचा  आनंद मी सुद्धा अनुभवलेला आहे. परीक्षेकरता शुभेच्छा देणारी, मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणारी, कधी प्रोत्साहन देणारी ,  परगावी शिकायला गेले असता जिवलग मित्रिणीने पाठवलेली अशी पत्रे माझ्याही संग्रही आहेत.  अशा अनेक पत्रांनी माझ्या आठवणींना श्रीमंत केले आहे.

प्रेमिकांनी लिहिलेली, पतिपत्नींनी एकमेकांना लिहिलेली गुलाबी पत्रे हा तर एका वेगळ्या लेखाचाच विषय होऊ शकतो असे हळुवार
रेशमीधागे त्यात विणलेले असतात. या पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये किती तरी अव्यक्त गोष्टी त्यात दडलेल्या असतात
ते लिहिणार्‍याला आणि ज्याच्याकरता लिहिले आहे त्यालाच  कळते.  एक पत्र पोस्टात टाकताच पुढचे पत्र लिहून तयार असते, उत्तर येण्याआधीच.. कारण उत्तर काय येणार ते देखील मनाला माहिती असतेच. असे हे सगळेच भारलेले, मंतरलेले, स्वप्नमय  वाटणारे दिवस कधी ना कधी जगलेलो असतो. एक छोटा कागदाचा कपटा, एखादे कार्ड सापडायचा अवकाश ही मग सगळे डोळ्यापुढे तसेच्या तसे उभे राहते.

  शिक्षणासाठी, नोकरीसाठी परगावी असणार्‍या मुलामुलीना येणारे पालकांचे पत्र म्हणजे सुरुवातीच्या काळात  आधार असे . सासरी असणार्‍या मुलीला माहेरून पत्र आले की आपल्या माणसांना भेटल्याचा आनंद होतो.  कालांतराने दूर राहण्याची सवय अंगवळणी पडली तरी या पत्रातला मायेचा ओलावा कमी होत नाही. इमेलने आणि फोनवर बोलणे झाले असले तरी हाताने लिहिलेल्या चार ओळी  नेहमीच जास्त दिलासा देतात.   पत्र कोणी लिहावे आणि कोणी लिहू नये याचा नियम नाही,  त्यात काय विषय लिहावे वा काय लिहू नये असेही नाही. यातच पत्रलेखनाच्या विस्ताराची व्यापक वाख्या आहे.  नामवंत लोकांच्या पत्रव्यवहारामुळे  जगाला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. इतिहासात मह्त्वाच्या नोंदी झाल्या आहेत. जगभरातले नामवंत कलाकार, विचारवंत, नेते, लेखक कवी यांचे पत्रलेखन विविध भाषांमध्ये आणि विपुल प्रमाणात  मुद्रित  स्वरुपात उपलब्ध आहे.  चित्रकार व्हॅन गॉव्ह याचा त्याच्या भावाशी नियमित सुरु होता तो पत्रव्यवहार एका पुस्तकाच्या स्वरूपात आहे. अब्राहम लिंकन यांची पत्रे सुद्धा मला उल्लेखनीय वाटतात.   मराठी कथालेखक जी. ए कुलकर्णी, नवोदित गझलकाराला भरभरून पत्रे लिहिणारे सुरेश भट , आपल्या कवितांचे अर्थ उलगडून सांगणारी कविवर्य ग्रेस यांची पत्रे आवर्जून वाचावी अशी आहेत.  

जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून येणारे इमेल आणि फोन झपाटयाने आज दुसर्‍या टोकाला असणार्‍या खेड्यापाड्यातही पोचू शकतात. मनात आलेल्या चार ओळी, कधीतरी चुकून दाटून आलेल्या भावना, रागलोभ, कोरडा व्यवहार सगळे जे काही पत्राने कळवले जायचे ते आता इमेल आणि फोनवरच सुरू असते.  बदलत्या जीवनशैलीबरोबर संपर्काची साधने वाढत आहेत. पण उत्कटता, हळवेपणा , दोन व्यक्तीमधला प्रत्यक्ष संवाद नकळत कमी होतो आहे का? नॅनो सेंकदात सगळे हवे असण्याची वृत्ती  लोकांमध्ये वाढते आहे.  त्यामुळे एकाच गावात असूनही किमान एक दिवस वाट बघून हाती पडणार्‍या पत्राविषयी किती आस्था आणि उत्सुकता कायम राहील ?कोण एवढी वाट बघेल?

सीमेवर पहारा देणारा जवान, दूरदेशी गेलेला साजण, सासरी गेलेली मुलगी यांना लिहायची पत्रे, त्यातले प्रेम , विरहाचे संदेश केवळ कथा कादंबर्‍या आणि सिनेमातच शिल्लक आहेत का?  अनेक रूढी परंपरा काळाच्या ओघात नाहीश्या झाल्या, अनावश्यक ठरल्या तसेच कदाचित हस्तलिखित पत्राचे होईल का?.
कधीतरी मुलगी धावत जाऊन हातातला कागद पत्रपेटीत टाकते आणि म्हणते ते तुझ्याकरता आहे आई....  हे सुद्धा कमी नाही.
 
संदेसे आते है, हमे तडपाते है..