१८ नोव्हेंबरच्या पहाटे सिंह राशीतून नयनरम्य उल्कावर्षाव

येत्या बुधवारी १८ नोव्हेंबर २००९ च्या पहाटे पूर्व आकाशात सिंह राशीतून मोठा उल्कावर्षाव होणार आहे. हा खगोलप्रेमींचा आवडता सुप्रसिद्ध Leonid उल्कावर्षाव. सिंह म्हणजे लिओ. म्हणून याचे नाव लिओनिड. चुकवू नये असेच हे विलोभनीय दृश्य असेल.

१८ तारखेच्या  पहाटे ३ वाजता पूर्वेकडे क्षितीजापासून सुमारे ३५ अंश उंचीवर सिंह रास आली असेल. त्या सिंहाच्या मुखातून म्हणजे मघा नक्षत्रातून उल्का पडताना दिसतील. तसेच आजूबाजूच्या आकाशातूनही पडताना दिसतील म्हणून सर्व दिशांचे आकाश दिसेल असेच ठिकाण निरीक्षणासाठी निवडावे. शुक्राहूनही आधिक तेजस्वी अशा काही उल्का आणि फायरबॉल या उल्कापातात दिसू शकतात. कदाचित तासभर दिसणाऱ्या या उल्कावर्षावात ताशी १५० ते २०० या प्रमाणात उल्का दिसतील असा अंदाज आहे. आदल्या दिवशी शुद्ध प्रतिपदा असल्याने चंद्रप्रकाशाचाही अडथळा असणार नाही. उल्कावर्षाव हा नेहमी दुर्बिणीशिवायच बघायचा असतो.

 सिंह राशीतील उल्कावर्षाव हा दर ३३ वर्षानी सूर्याच्या भेटीस येणाऱ्या  टेंपेल-टटल या धूमकेतुने मागे सोडलेल्या "कचऱ्यामुळे" होत असतो. या वर्षी आपली पृथ्वी टेंपेल-टटलने  १४६६ आणि १५३३ सालातील फेऱ्यांमध्ये सोडलेल्या धूलीकणांच्या मार्गातून जाणार आहे.

याचबरोबर सिंह राशीच्या पश्चिमेस कर्क राशीत लाल रंगाचा मंगळ  तर तासाभराने सिंहेच्या पूर्वेस कन्या राशीत शनीही दिसू लागेल.

फयान वादळानंतर आकाश आता निरभ्र होत चालले आहे. या वेळी आशिया खंड उल्का वर्षावासमोर येत आहे आणि त्याचवेळी या भागात रात्र आहे. पुढच्या वेळेस अशी स्थिती असेलच असे नाही. यातील उल्का या खूप तेजस्वी असल्याने प्रकाश प्रदूषण असले तरी बऱ्यापैकी उल्का दिसू शकतील. म्हणून उल्कावर्षाव बघण्याची ही दुर्मिळ संधी वाया घालवू नये.