सुखान्त

मागच्या आठवड्यात 'सुखांत' या
चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र
कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते.
परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित
नव्हत. डॉ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम,
साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत
डॉ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित,
अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर
उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला. हा चित्रपट दयामरण या संकल्पनेवर
आहे. इच्छामरण या संकल्पनेशी साधर्म्य दर्शवणारी गोष्ट असल्याने
माध्यमांनी त्याला इच्छामरणाभोवती गुंफले आहे, परिसंवादाच्या निमित्ताने
चित्रपट व वास्तव यातील साम्य व तफावत याचा उहापोह झाला. एका अर्थाने
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच त्याचे सर्वांगिण परिक्षण. डॉ मोहन
आगाशे यांनी मरण हा अपरिहार्य विषय असला तरी अप्रिय असल्याने त्याचे
विश्लेषण होत नाही. विचार व भावना यांच्या कात्रीत सापडलेला हा विषय आहे.
प्रेक्षकांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर त्याच्या दृष्टीने हा
चित्रपट भावनेला हात घालणारा आहे.मधेच तो विचाराकडे झुकतोय कि काय अस
वाटतानाच तो पुन्हा भावनेकडे वळतो. मुकुंद संगोरामांनी तंत्रज्ञानातील
प्रगतीमुळे जीवनमान हे वाढत आहे म्हणुन मत्युच्या दर्जाविषयी विचार होणे
गरजेचे आहे हा विचार मांडला. संध्या टांकसाळे यांनी हा अप्रिय विषय
साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात घेताना मनात वाचकांच्या प्रतिक्रिया काय
येतील अशी धाकधुक असल्याचे सांगितले.डॉ शिरिष प्रयाग यांनी वैद्यकीय
नितीमत्ते मध्ये हा विषय मांडताना होणारी मतमतांतर व त्यातील व्यवहार्यता
यांची सुरेख मांडणी केली. आयसीयु क्षेत्रातील वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष
असताना त्यांनी दयामरण या संकल्पनेला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी
अनुकुल प्रयत्न केले. अतुल कुलकर्णी हा अभिनेता विषय पटल्याशिवाय भुमिका
स्वीकारत नाही.कायद्याचा गैरवापर होतो म्हणुन कायदाच करायचा नाही का?
प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग होत असतो. दुरुपयोग थांबवण्यासाठी प्रयत्न
केले पाहिजेत असे प्रतिपादन करुन आपण आपल्या घरात, नातेवाईकात माणस जेव्हा
मृत्युच्या बेतात असतात त्यावेळी आपण त्यांना बांधुन ठेवत असतो. आपण
त्यांना का शांतपणे जाउ देत नाही? या चित्रपटाच्या निमित्ताने यावर सखोल
विचार आपली प्रक्रिया चालु झाली. ज्योती चांदेकरांना आईची भुमिका आव्हान
होत. चित्रीकरणात गाडीला ब्रेक लागण्याच्या प्रसंगातुन त्यांना खरच मानेला
धक्का बसला होता. किरण यज्ञोपवित ला कथेच्या निमित्ताने इंटरनेट
पुस्तकाच्या माध्यमातुन सखोल माहिती मिळवुन अभ्यासकाच्याच भुमिकेत जावे
लागले. कथेसाठी त्याच्यातला अभ्यासकाला थोडी तडजोड करावी लागली.
परिसंवादात बोलताना त्याची ही थोडीशी नाराजी जाणवत होती. अनुया म्हैसकर
यांचा ही पहिलीच निर्मिती. आई मुलगा संबंधावर चित्रपट तयार करण्याच्या मुळ
कल्पनेतुन हा विषय घेतला गेला. चाकोरीबाहेरचा चित्रपट तयार करताना घेतलेली
'रिस्क' त्यांनी प्रेक्षकांवर सोपवली आहे.
आपल्या जगण्याशी संबंधित सगळे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे मग
मृत्यूशी संबंधित निर्णय आपला आपल्याला का घेता येऊ नये, असा प्रश्न संजय
सूरकर दिग्दर्शित या सुखांत
नावाच्या उद्या म्हणजे २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्‍या चित्रपटात
मांडला आहे.परिसंवादात प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली
गेली. त्यामुळे परिसंवाद एकतर्फी न होता खर्‍या अर्थाने सुसंवादी झाला.

सुखांत ची कथा थोडक्यात अशी आहे . एक अत्यंत
कर्तृत्ववान पण असाध्य आजारामुळे अंथरुणाला खिळलेली सीता बाई गुंजे ही
स्त्री ( ज्योती चांदेकर) आणि तिला आदर्श मानणारा, तिच्यावर नितांत प्रेम
करणारा तिचा मुलगा (अतुल कुलकर्णी) यांच्यातल्या नात्याची ही गोष्ट आहे.
लोळागोळा होऊन जगण्याच्या सक्तीपेक्षा मृत्यूचा अधिकार या कथेतल्या आईला
हवी आहे. सीताबाई गुंजे ही खरं तर एक खेडेगावातली बाई आहे. पण अत्यंत
कर्तृत्वशाली आहे. लघुउद्योगाच्या माध्यमातून आपलं हे कर्तृत्व तिने सिद्ध
केलेलं आहे. आपल्या वकील मुलाशी असलेलं नातं अतिशय भावनिक व वैचारिक आहे.
त्याला तीनेच कष्टाने शिकवून मोठं केलेलं आहे. आयुष्याच्या एका वळणावर
तिला कार मधे प्रवास करताना ब्रेक मारल्यावर मानेला हिसका बसुन अपघात
होतो. त्यातुन 'क्वाड्रीप्लेजिया' नावाची व्याधी जडते.( उच्चारताना जीभेशी
फारच झटापट करावी लागते) अतिशय दुर्धर अशा या व्याधीमध्ये रुग्णाचं
मानेपासून खालचं शरीर लुळं पडतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टीं परावलंबी
बनतात.पण मेंदूचं काम मात्र सुरळीत चालू असल्याने हे परावलंबित्व जाणवत
राहतं.भावना व विचार यांच द्वंद्व चालु रहात. सीताबाई गुंजेसारख्या
आत्माभिमानी बाईला आपल्यामुळे लोकांना होणारा हा त्रास आणि स्वत:चा
स्वत:लाही होणारा त्रास पाहवत नाही . म्हणून ती मृत्यूची मागणी करते; ती
मान्य व्हावी म्हणून मुलाला कोर्टात लढायला लावते.
चित्रपटात वकील मुलाची भूमिका करणारा अतुल कुलकर्णी हा प्रताप सिताबाई
गुंजे या आपल्या नावात आईचे नांव लावतो यातच त्याची मातृभक्ती आली .हा
मुलगा, तिनेच केलेली मृत्यूची मागणी पूर्ण करण्यासाठी कोर्टात बाजू मांडत
आहे, दयामरणाच्या बाजूने कोर्टात आपली बाजू मांडण्याचा निर्णय हा एका
विचारावर आधारलेला आहे. हे पात्र त्याच्या आईसारखंच अत्यंत कणखर आणि
तर्कनिष्ठ आहे. आणि तर्काच्या कसोटीवर घासूनच त्याने हा निर्णय घेतला आहे.
त्याचं हे प्रतिपादन जगभरातल्या विविध खटल्यांवर आधारलेल आहे.
 परिसंवाद संपल्यावर अनुया म्हैसकर यांना भेटुन अधिक माहिती घेतली. मिपा,
उपक्रम, मायबोली, मनोगत इत्यादी सारखी मराठी संकेत स्थळांवर गप्पा
टप्पांसोबत एक विचारमंथनही चालू असत असे सांगुन त्यांना या चित्रपटावर
आम्ही जरुर चर्चा करु असे सांगितले. http://finalwishthefilm.com या संकेत स्थळावर त्यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया जरुर द्या असे सांगितले.

असो! हा विषयच असा आहे कि नसलेली/ नको असलेली जवळीक आयुष्यात कधी ना कधी विचार करायला भाग पाडते. मंडळी, आपल्याला काय वाटतं?