पहाटे पापण्यांच्या पर्णावरती दव होत साठलं
तेव्हा जवळ तू हवी होतीस अस मला वाटलं
जेव्हा सकाळी कोवळं ऊन होत पडलं
थोडं सांडलं जमिनीवर, थोडं ड़ोंगरामागे दडलं
जेव्हा तुझ्या आठवणींनी येऊन मला गाठलं
तेव्हा जवळ तू हावी होतीस अस मला वाटलं
भर दुपारी कामामध्ये लागत नव्हत मन
मन:पटले व्यापून होते तुझेच विचार गहन
तुझ्या चेहऱ्याने डोळ्यामध्ये घर जेव्हा थाटलं
तेव्हा जवळ तू हावी होतीस अस मला वाटलं
तुझी वाट पाहून जेव्हा थकला होता सूर्य
दमून-भागून पश्चिम क्षितिजाला, टेकला होता सूर्य
अचानक जेव्हा भावनांच आभाळ मनात दाटलं
तेव्हा जवळ तू हवी होतीस अस मला वाटलं
रात्र पडली निद्रेची मी करू लागलो विनवणी
दिवसभराच्या घटनांवरती चालू झाली सुनवणी
जेव्हा बुद्धीनं ओझं चुकांचं मनावरती टाकलं
तेव्हा त्याची बाजू सावरायला...
तू जवळ हवी होतीस अस वाटलं