रात्र मंतरलेली

अवकाश व्यापलेली, चांदणे अंथरलेली
आळवीत तुज आहे, ही रात्र मंतरलेली

थंडी झोंबते तरू देही, जणू फुलवीत शहारे
निजली अखंड सृष्टी पांघरून तारे
मग नेत्रद्वयी का, झोप ती रुचेना?
कल्पना सोबतीची, अन्य काही सुचेना
पाहून हाल माझे, मनात बावरलेली
आळवीत तुज आहे, ही रात्र मंतरलेली

धुके गोठले गुलाबी, उब साठवत आहे
मम मन मात्र वेडे, तुज आठवत आहे
कल्पून साथ तुझी, हौस ती फितेना
डोळ्यात गोठलेले, शब्द ओठी फुटेना
सोबतीस माझ्या इथेच थांबलेली
आळवीत तुज आहे, ही रात्र मंतरलेली

पाहिला आपण होता, जो चंद्र हसलेला
आज का असा तो, दिसतो त्रस्त ग्रासलेला?
हरवला कुठे तो, रातराणीचा गंध?
गीतांच्या कुपी का, भासती सूर बद्ध?
तुजवीण मला जी उदास भासलेली
आळवीत तुज आहे, ही रात्र मंतरलेली

श्वानमुखीही आता एक आर्त हाक आहे
किरकिरीत किड्यांच्या, दुःखाची झाक आहे
छळते मना अतीव, स्वप्न रंगलेले
लवून चटक तुझी, क्षणात भंगलेले
बनून एक काटा सदैव बोचलेली
बोलवीत आहे, ही रात्र जागलेली

read more @ http://mazikalpana.blogspot.com