सात साडेसातच्या सुमारास शनिवारी सकाळी समीर चा मोबाईल वाजला. "कोण? समीर कुलकर्णी का? मी देवदत्त गद्रे बोलतोय. ओळखलत का? अहो मी सतिशचा बाबा बोलतोय. सतिश गद्रेचा बाबा. आता नक्कीच ओळखले असेल नाही का? आता ओळखणारच तुम्ही.. झोपमोड झाली वाटत? काही हरकत नाही झोपमोड झाली तरी. नाही तरी आमची झोप तुम्ही आणि तुमच्या या नालायक अशिक्षित बहिणिनी उडवलिच आहे. "
समीर व्यवस्थित जागा झाला आणि त्याला बहिण म्हणजे कोण याचा उलगडा व्हायला लागला. एकदम दचकून त्यानी म्हंटले "बोला मिस्टर गद्रे. एवढ्या सकाळी कसा काय फोन केलात आणि माझा नंबर कुठून मिळवलात तुम्ही? " गद्रे म्हणाले, " ते महत्त्वाचे नाही हो. मला आधी एक सांगा तुम्हीच तुमच्या बहिणिचा सगळा तपशिल शादी डॉट कॉम वर टाकला होतात ना? खरे बोला. आता तरी खरे बोला. लाज कशी वाटली नाही हो तुम्हाला असे खोटेनाटे लिहायला? तुमच्या बारावी फेल असलेल्या बहिणिच्या शिक्षणाची तुम्ही सरळ बी. ए. पास अशी माहिती भरलीत? ही आमची फसवणूक आहे शुद्ध." समीर ला क्षणभर काय बोलावे हे सुचेना. अगदी अनपेक्षितपणे आलेला गद्र्यांचा फोन. त्त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून त्याच्या वडिलाना शंका आलीच कि काहीतरी गडबड आहे. ते समीरला खुणेनि विचारीत होते. समीर ने स्पीकर वर हात ठेवून बाबाना सांगितले कि गद्रयांचा फोन आहे. सुट्टिच्या दिवशी गद्रयांचा फोन आणि तोही आपल्याला? त्यातही समीरला?
गद्रे तर एकदम भांडणाच्या मूड मध्येच होते. ते पुढे समीरला म्हणाले " हे असे खोटे लिहून तुम्ही चांगले नाही केलेत. लक्षात ठेवा ही फसवणूक आहे. तुमच्या मामा मामिनि तर ती केलिच पण तुम्ही देखिल त्यात सामिल आहात हे ध्यानात ठेवा. तुझेही लग्न ठरलेलेच आहे ना? तुझ्या बायकोनी जर असे खोटे सांगून तुझी आणि तुझ्या घरच्यांची फसवणूक केली असती तर? आमचा सतीश फार चिडला आहे तुम्हा सगळ्यांच्यावर. आणि तो आता भार्गवीला घराबाहेर काढीन म्हणतो आहे. कोण जवाबदार या सगळ्याला? " समीर काहीच बोलू शकला नाही. त्याच डोक एकदम सुन्नच झाल. सगळा प्रकार त्यानी बाबाना सांगितला. ते देखिल हबकले आणि संतापले सुद्धा. सगळा प्रकार दोघानी आईच्या कानावर घातला.
समीर च्या चुलत मामाच्या म्हणजे प्रकाशच्या मुलीचे (भार्गवीचे) लग्न होऊन जेमतेम दीड महिना झाला होता. मामाची बायको सुनीता मामी म्हणजे एक अतिशय तापदायक प्रकार होता. पण मुंबईत समीरची आई सोडून मामाचे दुसरे कोणी (ज्यांच्याशी मामा मामिंचे पटते असे) जवळचे असे नातेवाइक नव्हते. त्यामुळे बरेच वेळा मनात नसतानाही सुनीता मामीचे तापदयक प्रकार कुलकर्ण्यांच्या घरातील सगळ्यानाच सहन करणे भाग होते. तापदायक म्हणजे सुनीता मामी नेहमी समोरच्याला पाण्यातच पाहायची. तिची मुले म्हणजे विकास आणि भार्गवी बाकिच्यांपेक्षा गोरी आहेत, दिसायला सुंदर आहेत, विकास अभ्यासात फार हुशार आहे, मुले इंग्लिश मिडिअम मध्ये असल्यामुळे मुलांचे इंग्रजी उत्तम आहे, नवरा भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करतो म्हणून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला फर्स्ट क्लासचा पास मिळतो त्यामुळे ते भारतात खूप ठिकाणी फर्स्ट क्लासने फिरून आलेले आहेत, तिच्या माहेरच्या पूर्वजांचे संबंध थेट झाशिच्या राणिच्या घराण्याशी आहेत अशा एक ना अनेक गोष्टिंचा तिला नुसता अभिमानच नव्हता तर या सगळ्या गोष्टी ती मुख्य म्हणजे समीर आणि त्याच्या घरच्याना मुद्दाम ऐकवित असे. त्यामुळे समीर आणि त्याच्या घरच्याना ती अजिबात आवडत नसे. पण तसे तिला तोंडावर सांगणे कधिही समीर आणि त्याच्या कुटुंबियाना जमले नाही.
वास्तविक सुनीताच्या मुलांची आपले इंग्लिश अतिशय उत्तम आहे या आईने निर्माण करून दिलेल्या
गैरसमजामुळे नीट मराठित बोलायची देखिल गोची होती. नाही म्हणायला विकास तसा अभ्यासात हुशार होता. पण भार्गवी मात्र पक्की मट्ठ होती. बरेच वेळा ती शाळेच्या सोप्या इयत्तेत देखिल नापास व्हायची आणि ते सुद्धा इंग्लिश आणि गणितात. पण हे मात्र सुनीता मामी अगदी हटकून लपवायची आणि चक्क खोटे बोलायची. पुढे विकास इंजिनिअरिंगला एका अतिशय साधारण कॉलेजला गेला आणि पहिल्याच वर्षी त्याला ड्रॉप लागला. वर्षभर घरी बसायची वेळ आली. या सगळ्या प्रकारामुळे मामा मामिची चांगलिच नाचक्की झाली कारण आधी मामिनेच सगळीकडे विकास म्हणजे अतिशय हुशार अशी मुक्ताफळे उधळली होति. त्या वेळी समीर आणि त्याच्या घरच्याना वाटले कि आता तरी मामा मामिच्या वागण्यात काहितरी सुधारणा होईल. पण मूळ स्वभाव कसा काय सुटणार. पुढे मात्र विकास कुठेही न आपटता व्यवसथित इंजिनिअर झाला.
भार्गवी मात्र दिवसेंदिवस मठ्ठपणाचा कळसच करीत होती. ती मॅट्रिक तरी पास झाली आहे कि नाही याबद्दल शंकाच होती. पण विचारणार कोण? कारण असे विचारणे हे चारचौघात बरे दिसत नाही हे समीर आणि त्याच्या घरच्याना कळत होते. पुढे भार्गवी घरी बसून बारावीची परीक्षा देणार असे सांगायला मामिनी सुरुवात केली. मग एक दिवस सहजच समीरच्या आईनी मामिला विचारले "काय वहिनी काय म्हणतेय भार्गविचे कॉलेज? आता बारावी आहे ना? अभ्यास असेल ना खूप?" त्यावर मामी म्हणाली "आम्ही ना भार्गविला पाठवतच नाही कॉलेजला. " "का हो, काय झाल? " समीरच्या आईनि विचारले. "काही नाही हो. ही अशी गोरिपान, सुंदर. हल्ली काही सांगता येत नाही हो मुलांचे. नाही म्हणजे ही काही तसे करणार नाही पण मुले नालायक आहेत ना. अहो आत्तापासूनच मागण्या येताहेत आमच्या भार्गविला. सगळे लोक अगदी म्हणतात आम्हाला, 'तुमची मुलगी म्हणजे नक्षत्र आहे. आम्हाला फक्त मुलगी द्या बाकी काही नको. ' अहो समीरची आई, म्हणूनच आम्ही हिला जास्त कुठे बाहेर पडू देत नाही. "
खरे तर मॅट्रिक पास नसल्यामुळे भार्गवीला रीतसर कॉलेजच काय पण प्रायव्हेट बारावी द्यायची सुध्धा मारामारी होती. अशीच दोन तीन वर्षे गेली.
पुढे समीर कामानिमित्त भारताच्या बाहेर गेला.
वर्षभरानंतर समीर परत आला आणि भार्गवीच्या लग्नाची बोलणी चालू झाल्याचे त्याला समजले. एक दिवस मामा मामी भार्गवीला घेऊन समीरच्या घरी आले. मामिनी समीरला म्हंटले "अरे तुझ्याकडे इंटरनेट आहे ना? त्याच्यावर काय ते शादी डॉट कॉम का काय असते ना? त्यावर भार्गविची माहिती भरता येइल ना आपल्याला? तिचे चांगले फोटो पण काढायचे आहेत. तु आत्ता फॉरेन ला गेला होतास तिथून कॅमेरा आणला आहेस ना? त्यानी फोटो काढ ना भार्गविचे. " समीर मनात म्हणाला 'चायला काय माणस आहेत, लग्नासाठी मुलिचा फोटो काढायचा तर एखाद्या चांगल्या फोटोग्राफर कडे जायचे सोडून मला काय सांगताहेत हे फोटो काढायला. जाऊ दे. तेवढाच आपल्याला कॅमेरा जरा मिरवता येईल.' म्हणून समीरनी भार्गविचे फोटो त्याच्याच घरी नवीन घेतलेल्या सोफ्याचे बॅग्राउंड वगैरे घेउन काढले. त्यानंतर ते फोटो शादी डॉट कॉम वर लोड केले.
मग माहिती भरायची वेळ आली. समीरनी मामिला भार्गविचे शिक्षण विचारले. समीरची आई आणि मामा तिथेच बसले होते. मामिनी आधी काही ऐकले न ऐकल्यासारखे केले. समीरने पुन्हा विचारले "काय ग मामी शिक्षण काय लिहू? " मामीनि पुन्हा तुटक आणि अर्धवट उत्तर दिले "अरे इंटरमिडिएट लिही तू." समीरला आधी काही कळलेच नाही. त्यानी मामाकडे बघितले तर मामानी दुसरीकडे तोंड केले. थोड्या वेळात मामिनी पुन्हा सांगितले "अरे थांब थांब एक काम कर बी. ए. पास लिही. " समीर थोडा बावचळलाच आणि विचार करायला लागला. त्याने आईकडे एकदा पाहिले आणि त्याला मनोमन वाटले कि आईचाहि विश्वास बसत नाहीये बहुतेक बी. ए. पास वर. तरी समीरने हिम्मत करून पुन्हा विचारले "बी. ए. पास लिहू ना नक्की? " मामी पुन्हा गोंधळली. तिचे तिलाच कळेना काय सांगुया नक्की ते. तरी पुन्हा तिने चाचरत बी. ए. पासच म्हंटले. शेवटी समीरने नाईलाजाने बी. ए. पास लिहिले.
त्याला सारखे वाटत होते की हे काही खरे नाही. पण काय बोलणार? पुन्हा विचारले तर आमच्यावर अविश्वास दाखवतो असे मामा मामी म्हणणार. मामानी तर मुद्दामच दुर्लक्ष केलेले सरळ दिसत होते. दुर्लक्ष अशासाठी की जाऊ दे ना चायला, बायको बघतेय ना सगळे, मग आपण कशाला मध्ये पडायचे? परस्पर होतेच आहे काय ते. सगळी माहिती टाकून झाली तेव्हा समीरला लक्षात आले कि भार्गवी पण होतिच तिथे. मग तिने नको का खरे काय ते सांगायला? म्हणजे हे सगळे साले एकाच माळेचे मणी आहेत.
मामा मामी आणि भार्गवी गेल्यावर समीरच्या बाबाना सगळा प्रकार कळला. हे सगळे जहागिरदार (समीरच्या आईचे माहेरचे आणि मामाचे आडनाव) लोक कसे नालायक आहेत या तुकड्यानी सुरुवात करून बाबा आणि आईची आपापसातच जुंपली. शेवटी जाऊ दे आपल्याला काय करायचेय असे म्हणून आईनी विषय संपवला. काही दिवस असेच गेले.
एक दिवस सुनीता मामिचा समीरच्या आईला फोन आला. एक फार चांगले भरपूर पैसा आणि प्रॉपर्टी असलेले स्थळ भार्गवीला आल्याचे तिने आईला सांगितले. मुलगा फारच उत्तम आहे, कुठल्यातरी फॉरेन लॅंग्वेजचा ट्रान्स्लेटर आहे, मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पगारावर आहे इत्यादी गोष्टी सुनीता मामिनी तिच्या नेहमिच्या स्टाइलनी सांगायला सुरुवात केली. मग गाठिभेटी झाल्या, ठरवाठरवी झाली आणि आमची मुलगी नक्की किती आणि काय शिकली आहे हे सोडून बाकिच्या सगळ्या विषयावर मामिनी मुलाकडच्या लोकाना भरभरून सांगायला सुरुवात केली. मुलगा खरे तर थोडा वयस्करच दिसत होता. त्याने लगेचच जास्ती काही चौकशी न करता होकार दिल्यामुळे भार्गवी दिसायला सुंदर आहे यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे मामी खूष, परस्पर सगळे झाले म्हणून मामाही खूष आणि सख्खा भाऊ असुनही आणि आपण तसेही जास्त आणि प्रत्यक्ष असे कशातच नाही असे समजून विकास तर भारीच खूष.
त्याचप्रमाणे आता आपल्या अर्धवट शिक्षणामुळे लग्नात काहिच अडचण येणार नाही अशी पक्की खात्री झाल्यामुळे भार्गवी सुरुवातिला मुलगा जरासा थोराड वाटूनही पटकन हो म्हणाली आणि साखरपुड्याची तारिख ठरली.
साखरपुडा पार पडला आणि व्याहिभोजनाचा दिवस आला. समीरची आई चुलत नातेवाईक असूनही फक्त तिला आणि कुलकर्णी कुटुंबाला बोलावणे गेले. समीरचे सख्खे मामा (ते पण जहागिरदारच) मुंबईत असून देखिल त्याना बोलावणे गेले नाही असे कळल्यावर समीरची आजी (आईची आई) खूपच चिडली. सुनीता मामिला तसाही बाकी कोणाला बोलावण्यात फारसा रस नव्हताच. कुलकर्णी कुटुंब नाही म्हंटले तरी सुनीता मामिच्या खोटेपणात अप्रत्यक्षपणे का होईना पण सामिल होते. त्यामुळे त्याना न बोलावून कसे चालेल? मामा मामिच्या व्याह्यांच्या सप्मत्तीची आणि धनदौलतीची कीर्ती मामी सारखी ओरडून सांगतच होती. म्हणून मोठया अपेक्षेने समीर आणि त्याच्या घरचे व्याहिभोजनाला गेले. बघतात तर काय, गद्रे मंडळिनी भोजन चक्क एका मध्य रेल्वे उपनगरी स्टेशनच्या समोर असलेल्या कछची डबल रोटी, पाणिपुरी, रगडा पटिस टाईप स्टॉल कम खानावळित आयोजित केले होते.
खरे तर भार्गविच्या साखरपुड्याच्या वेळी मामा मामिनी लोकाना वाटायला म्हणून साधे एक किलो पेढे देखिल आणले नव्हते तेव्हा काय साले कंजुस लोक आहेत असे वाटून समीरला खूप राग आला होता. पण हे गद्रे म्हणजे तर जहागिरदाराना तोडिस तोड होते. त्या दिवशी कुलकर्णी कुटुंबाला गद्र्यांच्या प्रचंड संपतीची आणि धनदौलतिची खरी आणि चांगलीच कल्पना आली!!!!!!
असेच एक दिवस भार्गवीचे लग्नही पार पडले. साखरपुडा आणि लग्नाच्या मध्ये जो काळ होता त्या काळात भार्गवी सतिशला सगळे काही खरे नक्किच सांगू शकली असती. पण तिनेही सावध पावित्रा घेऊन जाणिवपूर्वक तोंड बंद ठेवण्याचेच काम केले. तसेच विकास सारख्या इंजिनिअर झालेल्या म्हणजे शिकलेल्या अशा माणसाची भार्गविचा सख्खा भाऊ या नात्याने खरे काय ते लग्नाच्या आधी मुलाकडच्याना सांगण्याची नैतिक जवाबदारी होती. पण उगच कशाला इन्वॉल्वमेंट घ्यायची म्हणून तोही मूग गिळून गप्पच बसला होता.
लग्नानंतर भार्गविचा हनिमून सिंगापोर, मलेशिया, बॅन्गकॉक असा लग्नाच्या काही दिवस आधी ठरला. पण तिच्याकडे पासपोर्ट नव्हता. त्यामुळे आधी पासपोर्ट काढायला हवा होता. तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी सतिशने तिला तिचे लेटेस्ट डिगरी सर्टिफिकेट घरून आणायला सांगितले आणि त्या वेळी मात्र भार्गविचे हात पाय कापायला लागले. आता काय करायचे? आली का पंचायित! तिने तिच्या आईला फोन करून हकिकत संगितली. तिच्या आईने म्हणजे समीरच्या महान सुनीता मामीने डिगरी सर्टिफिकेट २६ जुलै च्या पावसात वाहून गेले असे भार्गवीला सतिशला सांगण्यास सांगितले आणि महामूर्ख भार्गविने तसे सतिशला संगितले सुध्धा. अर्थात सतिशला तिथे काहितरी घोटाळा आहे असे वाटले आणि त्याने हि गोष्ट त्याच्या वडिलाना म्हणजे देवदत्त गद्रेना सांगितली. मग त्या दोघानी तिला बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला आणायला सांगितले. त्या वेळी देखिल सगळे खरे सांगायची हिम्मत जर भार्गवीने दाखवली असती तर त्रास कमी झाला असता. पण तिला धड काहिच सांगता आले नाही आणि सगळे फासे उलटे पडायला सुरुवात झाली. हनिमूनचे तीन तेरा होऊ नयेत आणि बूक केलेले तिकिट फुकट जाऊ नये म्हणून जास्त काही वाद टाळून सतिश आणि भार्गवी लग्नानंतर तसेच हनिमूनला गेले.
खरे तर सतिशने त्याच वेळी खोलात जाऊन चौकशी केली असती तर पुढिल कटू प्रसंग टळू शकला असता. पण तो देखिल लग्नाकरता जरा जास्तच उताविळ झालेला दिसत होता. त्याच्या अपेक्षेबाहेर दिसयला बरी आणि मुख्य म्हणजे रंगाने गोरी बायको त्याला मिळाली होती. तूर्तास तरी त्याने भार्गविच्या शिक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवला.
हनिमूनवरून परत आल्यावर लगेचच पुन्हा बी. ए. पास चा मुद्दा सतिशने काढला आणि झालेल्या फसवणूकिची चीड आल्यामूळे भार्गवीला त्रास द्यायला सुरुवात केली. तिचे माहेरी फोन करणे बंद करण्यात आले. मामा मामिना तर गद्र्यानी फार खालच्या पातळिवर जाऊन झाडले. त्यानंतर मामिनी भार्गविचा सासरी पैशासठी आणि सोन्यानाण्यासाठी छळ करतात असे उठवायला सुरुवात केली. समीरच्या आईला देखिल मामिने हेच सांगितले. वर आणखी भार्गविच्या शिक्षणाचा मुद्दा हे केवळ दिखाऊ नाटक आहे आणि गद्र्यानी आता त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे असेही पसरवायला सुरुवात केली.
गद्रे कुटुंबिय स्वभावानी हलकट होते हे खरे मानले तरी त्यांची फसवणूक झाली ही गोष्ट खोटी नव्हती.अचानक एक दिवस सुनीता मामिचा समीरच्या आईला फोन आला कि सतिश भार्गविला माहेरी पाठवण्याचा विचार करतो आहे. शेवटी न राहवून समीरच्या आईने मामिला विचारले '' वहिनी, नक्की भार्गवी बी. ए. पास झाली आहे का हो? '' निदान या वेळी तरी सुनीता मामी खर सांगेल असे समीरच्या आईला वाटले. पण खरे तर सोडाच, मामी म्हणाली '' अहो फक्त बी.ए.फायनल इयरला बसली नाही इतकच. सेकण्ड इयर पास झाल्यावरच तिला खूप जॉब्स येत होते. खडवलिच्या डॉन बॉस्को शाळेत तर दहाविच्या मुलाना सायन्स आणि मॅथ्स शिकवायला तिला प्रिन्सिपल स्वतः बोलवित होते. पैसा नुसता तिच्यामागे धावत होता. मग आम्ही विचार केला, आत्ता कशाला फायनल इयरची घाई करायची? नंतर बघू लग्न वगैरे झाल्यावर. '' हे ऐकल्यावर समीरच्या आईला फक्त भोवळ यायची बाकी होती.
म्हणजे आधी इंटरमिडिएट मग बी. ए. पास त्यानंतर बी. ए. सेकण्ड इयर पास आणि आता देवदत्त गद्रे यांच्या फोन वर बारावी फेल असे ऐकल्यावर समीरला आणि त्याच्या घरच्याना काहिच सुचेना. वर गद्रे तर कुलकर्णी देखिल जहागिरदारान्बरोबर या फसवणुकीत सामिल आहेत असे तोंडावर म्हणत होते.
भार्गवी खरोखरच बी. ए. पास आहे कि नाही अशी शंका असून देखिल आपण बी. ए. पास असे का लिहिले याचेच समीरला नवल वाटत होते आणि मामीचा रागही येत होता.
सतिश गद्रेने त्याची धमकी खरी करून दाखवली होती. भार्गवी खरच माहेरी राहायला आली होती. गद्र्यांच्या अवेळी आणि अनपेक्षित आलेल्या फोन मुळे डिस्टर्ब झालेले कुलकर्णी कुटुंब आता आपण काय करायला हवे याचा विचार करित होते. शेवटी त्यांचा निर्णय झाला. मामा मामिंकडे जाऊन खरे खोटे काय याचा सोक्षमोक्ष लावायचा असे ठरले आणि ते बरोबरही होते. उद्या जर गद्र्यानी फसवणूक केली म्हणून कायदेशीर मार्गाने काही केले असते तर मामा मामी जहागिरदार यांच्याबरोबर समीरही गोत्यात आला असता आणि हा त्याच्या भविष्याचा प्रश्न होता. शनिवारी दुपारिच आई, बाबा आणि समीर तिघेही मामा मामिंकडे जाण्यासाठी निघाले. तिकडे जाऊन बघतात तर काय, त्याना धक्काच बसला! मामा, मामी, भार्गवी आणि विकास चौघेही आरामात हसत खिदळत हिंदी सा रे ग म प पाहात होते. चौघानिही अगदी काहिही घडले नाही अशा आविर्भावात कुलकर्ण्यांचे स्वागत केले. नंतर जेवणही झाले. शेवटी न राहावून समीरच्या बाबानी विषयाला हात घातला आणि अचानक मामा त्याचे कपडे आवरण्यात बिझी झाला. भार्गवी मोबाईल वर गेम खेळायला लागली. विकास समीरला बाहेर चक्कर मारायला जाऊ असे म्हणू लागला आणि मामी रात्रिच्या जेवणासाठी तांदूळ निवडित बसली. क्षणाक्षणाला हा प्रकार पाहून समीरचा संताप वाढतच होता.
पुन्हा एकदा समीरच्या आईनी सकाळी आलेल्या फोनबद्दल सगळ्याना सांगितले आणि समीर या भानगडीत उगाचच अडकू शकेल असेही सुचवले. त्या वेळी कधिही मुद्दाम न बोलून शहाणा राहणारा प्रकाश मामा हसत हसत निर्लज्जपणे म्हणाला ''काही नाही हो सुनितानी सहज चेष्टेने म्हंटल असेल बी. ए. पास आहे म्हणून. ते काही एवढे महत्त्वाचे नाही. त्याच्यावर जास्त विचार करून काय उपयोग? हा हा हा हा हा.........'' मामी, भार्गवी आणि विकास ने मामाला उत्स्फूर्तपणे दाद दिली. शेवटपर्यंत आपण धादान्त खोटे बोललो हे मामा, मामी, विकास आणि भार्गवी यापैकी कोणिही मान्य केले नाही. यावर कुलकर्ण्यांकडे मात्र काहीच उत्तर नव्हते. थोडा वेळ निरर्थक औपचारिक गप्पा मारून आणि स्वतःचे डोके फिरवून घेऊन कुलकर्णी घरी जायला निघाले.
घरी आल्यावर समीर आणि त्याच्या आई बाबानी बराच विचार केला आणि शेवटी समीर म्हणाला, ''चायला आत्तापर्यंत आपल्याला वाईट माणसांचे बरेच अनुभव आले आहेत. पण स्वतःच्या मुलीचे खोटे शिक्षण लोकांकडून लिहून घेणे म्हणजे निव्वळ चेष्टा मस्करी आहे असे म्हणणारे लोक कधी कोणावर उलटतील आणि इकडच्या बोटाची थुंकी तिकडच्या बोटावर फिरवतील याचा नेम नाही. हे साले आपलेच नातेवाईक आहेत हेच दुर्दैव आहे. यापुढे मी या माणसांकडे फारसा जाणार नाही.'' ''खरे आहे रे बाबा. '' आई बाबा एकदम म्हणाले.