अचानक आयुष्यात माझ्या
प्रवेशलीस तू अशी
तापलेल्या त्या भुईवर
पहिली सर बरसावी जशी
पडलेले मातीत मनाच्या
प्रेमाचे बी मग रुजले
ते अंकुरण्याआधीच मनात
ताटवे फुलांचे बघ सजले
तुझ्या प्रेमाच्या सहाय्ये
मग अंकुरले ते बीज
ते अंकुरल्यावर मला
कसली जाग, कुठली नीज?
अंकुर वाढून रोपे झाली
रोपांना फुटल्या कळ्या
तुझ्या गुलाबी गालांवर
पडणाऱ्या जणू गोड खळ्या
अलगद निघून गेलीस कधी
ते मला कळलेच नाही
प्रेमाचे गुलाब माझ्या
कधी पूर्ण फुललेच नाही
बोचले फक्त काटे पण
उमलल्याच नाहीत पाकळ्या
गेल्या तशाच सुकून माझ्या
प्रीतीच्या गुलाबी, टपोऱ्या कळ्या
तू गेलीस अन् झाल्या
जमिनी मनाच्या मोकळ्या
त्यावर फुलवीन गुलाब आता
ज्याला असतील फक्त पाकळ्या