फार वर्षांनी पुन्हा आपला जुना सवंगडी जीवन भेटणार या विचाराने अमित आणि परेश खूपच आनंदात होते. दोघेही सध्या पुण्यातच होते आणि जीवन गेले काही वर्षे पुण्यातच स्थायिक होता. जीवनला कसे सरप्राईझ द्यायचे याचा दोघे विचार करीत होते. त्या काळात मोबाईलचा आताएवढा सर्रास वापर होत नव्हता. त्यामुळे दोघांनी जीवनच्या मुंबईच्या काकांकडून त्याचा पुण्याचा पत्ता आणि लॅंडलाईन नंबर घेतला. पुण्यातच पण शहरापासून दूर एक फार्महाऊस एका रात्रीसाठी भाड्याने घेऊन साधारण रात्री नऊ साडेनऊ वाजता अचानक जीवनला फोन करून बोलावून घ्यायचे असे त्याने ठरवले. छानपैकी जेवण आणि व्हिस्कीचा बंदोबस्त दोघेही करणार होते.
ठरल्याप्रमाणे पार्टीच्या रात्री साडेसात आठच्या सुमारास अमित आणि परेश फार्म हाउस वर पोहोचले. फार्म हाउसचा केअर टेकर भगवान उत्तम स्वयंपाकी असल्यामुळे जेवणाचा प्रश्न मिटला होता. स्कॉच व्हिस्कीच्या बाटल्या घेऊन दोघेही आले होते. फार्म हाउस फार प्रशस्त नसले तरी दोन बेडरूम, मोठा हॉल आणि स्वयंपाकघर असे आटोपशीर होते. त्या दिवशी हवेतही चांगलाच गारवा होता. एकंदरीत पार्टीला पोषक असे वातावरण होते. नऊच्या सुमारास परेश जीवनला फोन करायला जातच होता इतक्यात भगवानने त्याला अडवले. मागील आठवड्यातील पावसामुळे फोन केबल्स उखडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे फोन डेड आहे असे तो म्हणाला. तेवढ्यात नेमके दिवेही गेले. अमित आणि परेशची चांगलीच पंचाईत झाली. एवढ्या रात्री जीवनला आणायला जाणे जवळ बाइक असूनही शक्य नव्हते. पार्टीचा बेत चांगलाच फिसकटला होता. काहीच न सुचल्यामुळे जीवनला सकाळीच जाऊन घेऊन यायचे असे त्याने ठरवले. शेवटी तासाभराने दिवे आले आणि दोघांनी एकेक पेग भरला. दोन तीन पेग झाल्यावर जेवणही करून घेतले. बारा साडेबाराच्या सुमारास दोघेही हॉलमध्येच झोपले.
साधारण दीड वाजता अचानक हॉलमधला फोन खणखणला. परेशला जाग आली आणि डोळे चोळत त्याने फोन घेतला. समोरच्या व्यक्तीचा आवाज फारच बारीक येत होता त्यामुळे परेशला नीट ऐकू येत नव्हते. हळू हळू आवाज स्पष्ट झाला. ति व्यक्ती सांगत होती की 'जीवनच्या गाडीला मोठा अपघात होऊन तो जागीच मरण पावला आहे. त्याचा अंत्येष्टी विधी त्याच्या पुण्याच्या राहत्या घरी सकाळी साडेपाच वाजता होणार आहे. ' पुढे काही संभाषण होण्याआधी फोन डिसकनेक्ट झाला. परेशची झोप पूर्णपणे उडाली आणि भेदरलेल्या अवस्थेत त्याने अमितला बातमी सांगितली. अमितही पुरता भेदरला. आपण काय विचार करून इथे आलो आणि हे काय होऊन बसले असा विचार करीत डोक्याला हात लावून खालीच बसला. आता काय करायचे असा दोघेही विचार करत होते. ताबडतोब जीवनच्या घरी जाण्यासाठी निघावे असे ठरवून ते लगेचच परेशच्या बाइकने जीवनकडे जायला निघाले.
जीवनच्या घरी बरीच गर्दी झाली होती. त्याच्या आईबाबांच्या दुःखाला तर काही सीमाच नव्हती. जीवन त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अमित आणि परेशला बघून दोघांनाही खूपच भडभडून आले. अमित, परेश आणि जीवन अगदी बालपणापासूनचे जीवलग मित्र होते. घरी सगळे गुरुजींची वाट पाहत होते. सगळ्या घाईगडबडीत गुरुजींना कोणी बोलावले आहे की नाही काही कळायला मार्ग नव्हता. पण शेवटी गुरुजी आले. हे गुरुजी खासकरून अंत्येष्टीसाठी म्हणूनच सगळ्यांना परिचित होते. त्यामुळे मृतदेह आणि इतर अपसव्य गोष्टी त्यांना नवीन नव्हत्या. त्यांच्यासाठी हे विधी म्हणजे एक रोजचाच भाग होता. ते अतिशय निर्विकार चेहऱ्याने सर्वकाही करीत होते. जीवनच्या मृतदेहाचे तोंड झाकलेले होते. तोंडावर तुळस ठेवण्यासाठी म्हणून गुरुजींनी त्याच्या चेहऱ्यावरील कपडा बाजूला केला आणि अचानक त्यांना भोवळ येऊन ते कोसळलेच. सगळे जमलेले लोक या प्रकारामुळे एकदम घाबरले. गुरुजींना काय झाले असा आरडाओरडा सुरू झाला. तेवढ्यातच आजूबाजूच्या माणसांनी गुरुजींना उचलून आतल्या खोलीत नेले आणि त्यांच्या तोंडावर पाणी मारायला सुरुवात केली. पंधरा वीस मिनिटांनी गुरुजींना जाग आली. अजूनही ते थरथरतच होते. लोकांनी त्यांना कसेबसे नॉर्मल केले आणि अचानक अशी भोवळ येण्यामागचे कारण विचारले. गुरुजींनी बोलायला सुरुवात करताक्षणी त्यांचा घसा कोरडा पडत होता आणि तोंडून शब्द फुटत नव्हते. शेवटी सगळा धीर एकवटून गुरुजींनी सांगितले की रात्री दीड वाजता जो माणूस त्यांना या अंत्येष्टीसाठी बोलवायला आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून जीवनच होता. इतके सांगून गुरुजींनी जीवनच्या घरून तात्काळ आणि कसाबसा पळ काढला.
ज्या वेळी अमित आणि परेशने हा प्रकार पाहिला तेव्हा दोघांची पाचावर धारण बसली. असंख्य विचार त्यांच्या डोक्यात वादळासारखे उठू लागले. हा सगळा नक्की काय प्रकार आहे काहीच कळेना. जीवन जर अपघातात गेला तर गुरुजींना ज्याने बोलावणे केले तो कोण असावा हा विचार करून दोघांना वेड लागायची पाळी आली होती. घरी हजर असलेल्या नातेवाईकांनी झाला प्रकार बघून गुरुजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अथवा त्यांना वेड लागले आहे असा निष्कर्ष काढून दुसऱ्या गुरुजींना बोलावणे केले आणि विषय तिथेच सोडून दिला. पण अमित आणि परेशसाठी हा विषय एवढ्यावर संपत नव्हता. एक वेळ विषय संपलाही असता पण बरोबर दीड वाजता त्यांना आलेला फोन कुणाचा होता? जरी कोणाचाही असेल तरी दोन आठवड्यापासून बंद असलेला फार्म हाउस वरील फोन अचानक चालू कसा काय झाला? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रात्री आलेला फोन हा जीवनचा तर नसेल? असे एक ना अनेक प्रश्न दोघांनाही पडत होते. एका बाजूला जीवलग मित्र कायमचा सोडून गेल्याचे दुःख होते आणि दुसऱ्या बाजूला पडलेले हे असे अनुत्तरित गूढ प्रश्न.
तूर्तास तरी या फोनच्या भानगडीबद्दल कुठेही आणि मुख्य म्हणजे जीवनच्या आईबाबांना काहीही न सांगणे हेच योग्य आहे असा विचार दोघांनीही केला आणि गप्प बसले. काही दिवसानंतर अमित आणि परेश गुरुजींच्या घरी अधिक माहिती मिळवण्याच्या हेतूने गेले. त्यावेळी गुरुजींच्या बायकोने गेले काही दिवस गुरुजी सततच्या येणाऱ्या जीवघेण्या तापामुळे खंगून गेले आहेत असे त्यांना सांगितले. तरीसुद्धा एकदा गुरुजींची समक्ष भेट झाल्यावर दोघांनीही त्यांना फोनच्या घटनेबद्दल सांगितले. त्यावर गुरुजी म्हणाले, 'हे बघा मुलांनो, तुम्ही चांगल्या घरचे दिसता म्हणून सांगतो, वडिलकीच्या नात्याने सांगतो, पुन्हा कधीही या गोष्टीच्या जास्त खोलात शिरण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ते परवडणार नाही आणि तुमचा तो प्रांतही नाही. तुमच्या व्यक्तिगत आयुष्याकडे जास्त लक्ष द्या. सगळी कोडी सोडवण्याचा तुम्ही काही मक्ता घेतलेला नाही. याहून महत्त्वाचे म्हणजे पुन्हा या गोष्टीसंदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी इथे येण्याची तसदी घेऊ नका. या तुम्ही. ' गुरुजींच्या शब्दांना अशी काही विलक्षण धार होती की दोघांनाही त्यांना प्रतिप्रश्न करण्याचा धीरच झाला नाही. दोघेही निघाले.
पुढे काही दिवसांनी त्यांना बातमी मिळाली की गुरुजींनी रात्री साडेआठनंतर अंत्येष्टीची कामे करणे थांबवले आहे आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती सुधारण्यापलीकडे बिघडत चालली आहे आणि काही महिन्यातच गुरुजी निवर्तल्याची बातमी आली. तोपर्यंत अमित आणि परेश झालेला प्रकार हळू हळू विसरत होते पण गुरुजी वारल्यानंतर एकदा भेटल्यावर हा विषय परत निघाला आणि अमित परेशला म्हणाला, ' जाऊ दे रे, कदाचित जे आपल्यावर आले असते ते बहुतेक गुरुजींवर निभावले. जीवनचे नक्की काय झाले आणि आपल्याला त्या रात्री आलेला फोन कुणाचा हे प्रश्न जरी तसेच असले तरी तो मेल्यावर का होईना आणि त्याच्या अंत्येष्टीचा निमित्ताने का होईना, आपली आणि त्याची भेट हि अटळच होती'...........
वाचकहो, ही कथा खरी का खोटी हे सांगणे कठीण आहे. एका व्यक्तीने मला ही कथा जशी सांगितली ती तशीच्या तशी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे...... धन्यवाद, दिलसे