प्रेमकाव्य

रक्तिमा गुलाबी तव गालांवरती आली,

नि चुंबण्या तिजला, हवा अधीर ती झाली........

मधुवसंत गाभोळून, झाला आंबटगोड,

जाळीतून हसला, गोड करवंदांचा कोळ,

झुळझुळूनी  कुठुनशी, थंड लहर ती आली,

नि चुंबण्या तिजला........

बोरे रसरसलेली, हलकेच रसा निथळती,

लाल ओठ तुझे मग, आपसूक मला आठवती,

सरोजासम रसिली अंगुलिका ती गाली,

नि चुंबण्या तिजला........