गीता जयंती - मुक्त चिंतन

आज २८ नोव्हेंबर २००९ - मोक्षदा एकादशी, आणि गीता जयंती. गेली काही वर्ष सद्गुरुनी सुचवल्याप्रमाणे भगवदगीता - ज्ञानेश्वरी संदर्भात थोडंफार वाचन झालं. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. काही अनुभव आले. अनुभव हा वैयक्तिक आणि गौण भाग असल्याने वरवर उल्लेख केलेलाच बरा. गीता कोणत्या भूमिकेतून वाचावी या विषयीचं थोडं मुक्त चिंतन, सुचेल तसं...

"वासराच्या मिषे दुध देई गाय, परी होय सोय सर्वांचीच, तैसा अर्जुनाच्या, निमित्ते साचार, जगाचा उद्धार झाला आज" (स्वामी स्वरूपानंद, पावस) या भूमिकेतून गीता या सद्ग्रंथाकडे बघायला हवं. व्यक्ती तितक्या प्रकृती असणार हे गृहीत धरून गीतेत अनेकविध साधना, उपासना मार्गांचे स्पष्टीकरण आले आहे. साक्षात भगवान श्री विष्णूनी कृष्ण या आपल्या पूर्णावतारी रूपात सत्शिष्य अर्जुनाच्या निमित्ताने सकाळ जीवांच्या उद्धारासाठी हि महन्मंगल गाथा प्रकट केली आहे. ती साक्षात भगवंताची शब्दरूप अशी शब्दातीत मूर्ती आहे. तिचा प्रत्येक श्लोक महामंत्र आहे.

प्रत्येक व्यक्तीचा एकमेव असा स्वधर्म (मूळ पिंड, aptitude + attitude) असतो. शिवाय जन्माबरोबरच येणारी आणि मृत्यू पर्यंत न टाळता येणारी स्थळ, काळ आणि परिस्थितीची बंधनं असतात. या दोन्हीची सांगड घालून आयुष्याचं सार्थक कसं करायचं याचं नेमकं मार्गदर्शन हा सद्ग्रंथ करू शकतो. सनातन वैदिक धर्म (ज्याचं सार गीतेत आलेलं आहे) सर्वांगीण विचार करणारा आणि सर्वसमावेशक आहे. एकांगी नाही. काही त्रिकालाबाधित मूळ तत्वांबद्दल तो जितका ठाम आहे, तितकाच व्यवहारी जगाच्या बाबतीत लवचिक पण आहे. तो दिव्य अनुभव, अपरोक्ष अनुभूती वगैरे गूढरम्य गोष्टींवर अधिकारी स्वरूपाची वक्तव्य देतो. त्या बरोबरच माणसांचे एकमेकाशी, सद्गुरूंशी आणि निसर्गाशी कसे संबंध असावेत, आचार विचार आणि आहार विहार कसा असावा, प्रशासन कसे असावे या सारख्या व्यवहारी बाबींवर मोलाची ठरतील अशी उपयुक्त मार्गदर्शक तत्वे पण देतो. गरुडासारखी चिदाकाशात भरारी घेण्याची ताकद देणारा हा धर्म, आपलं मातीशी असणारा नातं विसरू देत नाही. संपूर्ण संन्यस्त व्यक्ती सोडून इतरांना आपली घर, समाज, धर्म, देश या संदर्भात असणारी कर्तव्य चुकत नाहीत. ती टाळणे हा पलायनवाद आहे हे स्पष्टपणे सांगतो. आपण समजतो त्या पेक्षा संचित आणि प्रारब्धाचा भागच या जन्मात मोठा आहे याची जाणीव करून देतो, आणि त्याच वेळी अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांना पर्याय नाही हे हि स्पष्टपणे सांगतो.

गीता समजून घेण्यासाठी विनम्र, लवचिक आणि संयत भूमिकाच हवी. योग्य तो विवेक करायला हवा. धर्म, नीती, न्याय, कर्म कांड इ. बाबतीत एककल्ली, दुराग्रही आणि हेकट भूमिका घेणारा इथे वंचित राहून जातो. उलट स्थळ काळ आणि परिस्थितीशी ताळमेळ साधत कलापूर्ण जीवन जगणारा सर्व सामान्य माणूस सहज पणे बरच काही साधून जातो. सत्य नामक एकच एक गोष्ट आहे, आणि मी सगळ्या जगाला मूर्ख ठरवत एकशिंगी गेंड्यासारखा बरोबर तिथेच धडक मारणार हा अभिनिवेश सर्वथा चुकीचा आहे. बुद्ध, महावीरांनी शून्य म्हणून अनुभवलं... मीरेनी, चैतन्य महाप्रभूनी प्रेम स्वरूपात उपभोगलं... रामकृष्ण, आर्विकारांसाठी भक्तीच्या भावसमाधीत सगुण स्वरूपात प्रकटलं... रमण महर्षींनी ज्ञान स्वरूपात जाणलं... कृष्णामूर्तिनी सजग साक्षीभावात पाहिलं... वासुदेवानंद सरस्वतींनी खडतर संन्यास व्रताचं काटेकोरपणे पालन करून प्राप्त केलं... लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी शक्तीपातानी गुळवणी महाराजांना दिलं... स्वामी स्वरूपानंद, नाशिक च्या गजानन महाराजांनी सोहम ध्यानानी मिळवलं... गोंदवलेकर महाराजांनी नाम स्मरणांनी साधलं... अगदी एडिसन, Einstein नि प्रयोगशाळेत शोधलं ते सत्यच! हे सगळं गीतेत ओघानीच येतं.

शेवटी ज्याचे निश्वासच वेद आहेत त्या श्रीहरिला मनोभावे प्रणाम करतो. इति लेखनसीमा.

|| हरी ओम तत सत ||