अर्जुन विषाद योग (पुढे चालू)

(अर्जुनाला पडलेले प्रश्न, त्याच्या शंका गैर नाहीत, त्या फक्त परिस्थिती संदर्भात योग्य नाहीत. )

असा 'विषाद योगी' विचार करण्यासाठी जीवाची एक उन्नत अवस्था असावी लागते. एखाद्या विचारशील, सत्प्रवृत्त व्यक्तीची परिस्थितीमुळे नाही, तर निव्वळ अनाठायी आणि अवेळी अभद्र विचार करण्याने कशी दारुण स्थिती होते याचे अर्जुन प्रतीक आहे. युद्ध करावे की नाही, तह करावा का, पांढरे निशाण लावावे का, किती विनाश होईल, कुलक्षय होईल का हा सगळा विचार रणांगणात उतरण्याआधीचा. एकदा शंख फुंकल्यानंतर तो करणे हा क्षात्रधर्म नाही. अशा परिस्थितीत पलायन करणाऱ्यांचे आजही कोर्ट मार्शल होते, पुरती नाचक्की होते. विचारांचा गोंधळ, त्यातून येणारी आत्मग्लानी असा प्रवास एकदा सुरू झाला की त्याचा शेवट आत्मघातच. अशी मनस्थिती ज्यांनी अनुभवली, त्यांनाच हे पटेल. सद्गुरू सोडून कुणीही अशा व्यक्तीला मार्ग दाखवू शकत नाही. समजूत घालण्याचे, धीर देण्याचे जे प्रयत्न इतर लोक करतात त्यांचा नेमका विपरीत परिणाम होतो. शिष्याच्या जन्मोजन्मीच्या प्रवासाचे सहचर असणारे सद्गुरू अशा वेळी स्वस्थ राहू शकत नाहीत. अर्जुनाची अशी अवस्था होण्यामागे ईश्वरी संकेत होता. त्याच्या निमित्ताने जगाच्या उद्धारासाठी श्रीहरिना आपले हृद्गत प्रकट करायचे होते. तो काहीसा गूढ असणारा भाग आहे.

लौकिक जगातही निव्वळ अभद्र विचारांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाल्ल्यामुळे जेव्हा सत्शिष्याची अशी केविलवाणी अवस्था होते, तीच सद्गुरूंचे कार्य सुरू होण्याची वेळ असते. आजही तसा प्रत्यय येतो. आई भीक मागू देई ना, बाप जेवू घाले ना अशा कचाट्यात अडकलेल्या आणि आत्मघात करायला प्रवृत्त होऊन गणेशपुरीला निघालेल्या पोरसवदा 'राम' ला नेमके नित्यानंद बाबा भेटतात, 'विलायत जाना, डॉक्टर बन के आना' असा एक वाक्यात आदेश देतात, आणि 'दिव्यस्पर्शी' डॉक्टर राम भोसले जन्माला येतात. सगळी व्यसनं करत 'life enjoy' करत भेलकांडत जाणारे रामभाऊ गंधी स्वामी समर्थांचे गुरुचरण निष्ठेने पकडून ठेवतात, आणि 'तू तो बडा जिंद निकला' म्हणत स्वामीकृपा होते. रामभाऊ गंधी 'द्विज' होतात. सद्गुरू रामानंद बीडकरांचा जन्म होतो. जम्मूच्या निसर्गरम्य परिसरात नादब्रह्माची उपासना करणाऱ्या शिवकुमारच्या हातात पंडित उमादत्त शर्मा एक वाद्य देतात, 'तुला या वाद्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे' हे ध्येय देतात, आशीर्वाद देतात. मोठ्या अपेक्षा घेऊन हा मुलगा मुंबई ला येतो, मैफली करतो. कुत्सित प्रतिक्रिया, हेटाळणी आणि अपमान पदरी पडतो. निराश होऊन तो जम्मू ला परत जातो. पण सद्गुरूचा जो अंकिला, तो कधीच हार मनात नाही असा निसर्गच आहे. पंडित उमादत्त शर्मांचा आशीर्वाद वाया जात नाही. संतूर च्या मर्यादा बऱ्याच प्रमाणात कमी होतात, 'लयकारी' वर आधारित एक नवा 'बाज' जन्माला येतो. शास्त्रीय संगीतात संतूर ला आपलं स्थान मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा 'संघर्ष' सुरू होतो. विजय ठरलेलाच असतो. सद्गुरू सत्ता हि अशी काम करते.

युद्धात स्वजनांचा वध करावा का, त्यांच्या रक्ताने माखलेले हात घेऊन सिंहासनावर बसावं का, त्या पेक्षा संन्यास का पत्करू नये अशा अनेक अनाठायी, अवेळी आणि अप्रस्तुत शंका कुशंकांनी ग्रस्त अर्जुनानं त्यांचंच अस्तित्ववादासारखं भंपक, भोंगळ तत्त्वज्ञान मांडलं नाही. विवेकावर अविचार मात करतो आहे, अशी पुसटशी जाणीव असणारा तो महात्मा आपल्याच भूमिकेवर अडून राहिला नाही. गुरुपदिष्ट असणाऱ्या व्यक्तीला तिच्या व्यक्तिगत मर्यादा आड येत नाहीत. 'मीच शहाणा, आणि माझंच खरं' अशी वृत्ती मात्र घात करते, तशी अर्जुनाची नव्हती. सारथी म्हणून मनुष्य रूपात जो उभा आहे, त्या लीलाधराच्या अपार आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सामर्थ्याची काही अंशी का होई ना त्याला जाणीव होती. त्याला शरण जाऊन आपल्या साऱ्या मनोव्यथा विश्वासाने सांगाव्या इतका प्रांजळपणा त्याच्याजवळ होता.

अशा भूमिकेतला सत्शिष्य अर्जुन, आणि त्याच्या साऱ्या शंका कुशंकांचे निरसन करून त्याला निष्काम वृत्तीने आपले कर्म करायला समर्थ करणारे सद्गुरू श्रीकृष्ण अशी ती अलौकिक जोडी होती. म्हणूनच 'गीता' हा सर्वकल्याणकारी ग्रंथ जन्माला आला. आपल्या 'स्वधर्माची' स्पष्ट जाणीव अर्जुनाला झाली. ती प्रत्येक व्यक्तीला व्हावी हेच श्रीहरीचे खरे मनोगत आहे, गीतेचे प्रयोजन आहे. सद्धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी, आणि दुराचारी प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी अपरिहार्य असणारं प्रलयंकारी महायुद्ध झालं. आपलं सारं औदासीन्य, मालिन्य झटकून टाकलेला आणि श्रीहरिला सर्वभावे शरण गेलेला नरशार्दुल अर्जुन आपलं सर्वस्व पणाला लावून कुरुक्षेत्री झुंजला. 'जय' नावाच्या इतिहासाची गीता हि त्या अर्थाने 'नांदी'च आहे. कल्पांतानंतरही तिची महत्ता अबाधित राहणार आहे.

इति लेखनसीमा.