अर्जुन विषाद योग (पार्श्वभूमी)

परम कल्याणकारी श्रीहरी आणि श्री सद्गुरूंना मनोभावे प्रणाम करून भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाविषयी चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न करतो.

निव्वळ तत्त्वज्ञान म्हणून गीतेकडे बघणारे लोक गीता दुसऱ्या अध्यायापासून सुरू होते असे मानतात. पहिल्या अध्यायात युद्धासाठी सज्ज असलेल्या कौरव आणि पांडवांच्या सेनेचे आणि अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन आहे. हा तसा गौण स्वरूपाचा अध्याय आहे असा समज होतो. प्रत्यक्षात अठराव्या कलश अध्यायापर्यंतचा गीतामंदिराचा डोलारा या अध्यायाच्या पायावरच उभा आहे.

गीतेत युद्धखोर प्रवृत्तीचे समर्थन नाही. या युद्धाची पार्श्वभूमी असाधारण आहे. युद्धाची हि दुर्दैवी पण अटळ परिस्थिती निर्माण होण्याआधी ते टाळायचे सारे प्रयत्न श्रीहरिनी केले. सुदर्शन चक्र धारण करणाऱ्या साक्षात श्रीविष्णूच्या त्या पूर्ण अवतारांनी अपमान सहन केले, वेळोवेळी माघार आणि पडती बाजू घेतली. आपला न्याय्य हक्क सोडून फक्त पाच गावे घेऊन तडजोड करायला पांडव तयार झाले. अधम वृत्तीच्या कौरवांना ते हि मान्य नव्हते. नीच कौरवांच्या हातात अनिर्बंध सत्ता गेल्यास जग संपूर्ण विनाशाच्या खाईत ढकलले जाईल हे उघड होते. वैदिक मूळ तत्त्वानुसार कल्पांतापर्यंत जे विष्णू तत्त्व विश्वाच्या पालक धर्माने जागृत असणार आहे, त्याला सद्धर्माच्या रक्षणासाठी विनाशकारी महायुद्धाशिवाय पर्यायच राहिला नाही.

या अध्यायाला अर्जुन विषाद योग असे समर्पक नाव आहे. विषाद, वैफल्य या भावनेचा अनुभव प्रत्येक जीवाला कधी ना कधी येतोच. आर्वीकर महाराज ज्याला वारंवार 'भयावह भवसागर' म्हणतात, त्या जगात वावरताना प्रामाणिकपणे सद्गुणांची, सत्प्रवृत्तीची कास धरणाऱ्या विचारी, सुसंस्कृत जिवाचीच जास्ती परवड होते. किरकोळ अपेक्षाभंग किंवा अपयश यांनी खचून जाण्याच्या फारच पुढे गेलेल्या त्या उन्नत जीवापुढे 'धर्मसंकट' उभे ठाकते. सगळ्या गोष्टी ठीकठाक असतानाही त्या तशाच राहतील का म्हणून काळजी करत राहणारे चिंतातुर जंतू, व्यवहारातले सरळ साधे निर्णय घेण्याची क्षमता नसलेले वेडगळ लोक, छोटेमोठे अपेक्षाभंग न पचवू शकणारे आणि जन्म कुंडली घेऊन उठसूठ एखादे 'सेमी समर्थ' किंवा 'बांगडू महाराज' यांचे उंबरठे झिजवणारे आणि त्यांच्या व्यवसायाला बरकत आणणारे महाभाग जो विषाद अनुभवतात, त्याचा 'योग' कधीच होत नाही.

संकटांचा, आव्हानांचा आणि स्वधर्मापासून च्युत करणाऱ्या प्रलोभनांचा सामना तर प्रत्येक जीवाला करावाच लागतो. प्रारब्धाने येणारा तो अटळ भाग आहे. कधी इच्छाशक्ती च्या बळावर, कधी निव्वळ काही काळ जाऊन देऊन, कधी कुणाचा आधार घेऊन, तर कधी सांत्वन करून घेऊन सर्वसामान्य माणसाची पुढची वाटचाल सुरूच राहते. कधी पार कोलमडून पडण्याची आणि अगदी आत्मघाताचीही वेळ येते. अर्जुनाच्या विषादाची मात्र जातकुळीच वेगळी आहे. मोठ्यात मोठ्या संकटांना सहज सामोरं जाण्याची क्षात्रवृत्ती त्याच्यात आहे. कुठलंही आव्हान लीलया परतवून लावता येईल अशी अमोघ अस्त्र त्याच्या भात्यात आहेत. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये या साठी लागणारी इच्छाशक्ती आहे, तसे संस्कार आहेत. इतर वीरांची साथ आहे. साक्षात श्रीकृष्ण त्याच्या रथाचे सारथी आहेत. या श्रीकृष्णार्जुन नरनारायण जोडीच्या वाटेला जायची खरं तर संकटांची बिशादच नाही.

जन्मोजन्मीचा हा सद्गुरू सारथी म्हणून लाभलेला! त्याच्या अवतार कार्यात सहभागी होण्याची, आपला उद्धार आणि जगाचं कल्याण एकत्रच साधण्याची, प्राण पणाला लावून स्वधर्म निभावण्याची वेळ आलेली आहे ही जाणीव सुप्त पणे का होईना अर्जुनाच्या अंतर्मनात आहे. आणि तरीही गात्रांना कंप सुटावा, घशाला कोरड पडावी आणि कसलाच विवेक उरू नये अशी त्याची विमनस्क अवस्था का झाली हे नेमकं लक्षात घेतलं तर या सद्ग्रंथाची पार्श्वभूमी स्पष्ट होते. त्या बद्दल नंतर. इति लेखनसीमा.